“अच्छा सिला दिया ” म्हणत भारताला रडवणारा हिरो आजही हजारो कोटींचा मालक आहे
१९९५ साली बेवफा सनम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट एक म्युझिकल सिनेमा होता. पण भारतात हा चित्रपट इतका चालला कि त्याकाळी या चित्रपटाच्या गाण्याच्या तब्बल १ करोड पेक्षा अधिक कॅसेट विकल्या गेल्या होत्या. सिनेमाच्या गाण्यांनी सगळा माहोल दर्दी करून टाकला होता. आशिक आणि दर्दी लोकांची नस या चित्रपटाने पकडली होती, आणि या चित्रपटातल्या गाण्यांनी प्रेमवीरांच्या आठवणी जाग्या केल्या होत्या.
या चित्रपटातल्या सिनेमाचा हिरो हातात पिस्तूल घेऊन रस्त्यावरून पळत असतो, बॅकग्राऊंडला अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का हे गाणं वाजतंय, हा सिन लोकांत प्रचंड लोकप्रिय झाला होता.
पण हा हिरो नक्की कोण होता आणि या चित्रपटानंतर तो पुढे कुठेच दिसला नाही, तर आपण या हिरोविषयी जाणून घेऊया.
बेवफा सनम या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला होता क्रिशन कुमार. क्रिशन कुमारच्या अपोझिट होती त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर. या जोडीने हा चित्रपट प्रचंड हिट केला आणि प्रसिद्धीचा कळस गाठला. क्रिशन कुमार हा प्रसिद्ध संगीतकार आणि गायक गुलशन कुमार यांचा भाऊ होता.
पाकिस्तानचे सुफी गायक अत्ताउल्लाह खान यांच्याविषयी तेव्हा एक अफवा उठली होती कि ते प्रेयसीच्या सोडून जाण्याने इतके दुखी झाले होते कि त्यांनी प्रेयसीच्या लग्नात जाऊन तिचा खून केला होता. याच गोष्टीला धरून गुलशन कुमार यांनी बेवफा सनम हा चित्रपट दिग्दर्शित केला आणि त्यात आपल्या भावाला लीड रोल दिला.
बेवफा सनम हा चित्रपट क्रिशन कुमारच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला आणि रातोरात तो बॉलिवूडचा स्टार बनला होता.
चित्रपटातील गाणी सुपरहिट होती. या चित्रपटातील गाणी अगदी टपरी, टमटम, काळी पिवळी टॅक्सी, पिठाची गिरणी अशा प्रत्येक ठिकाणी वाजत होती.
चित्रपट रिलीज होण्याअगोदर प्रोमो यायचे. या प्रोमोमध्ये प्रेयसीने दिलेल्या धोक्यामुळे प्रियकर बंदूक घेऊन लग्नात जातो आणि तिला गोळ्या घालतो असा सीन दाखवण्यात आला होता. लोकांमध्ये या सीन वरून चित्रपट बघण्याची उत्सुकता वाढली गेली होती. संगीताने परिपूर्ण असलेला हा त्यावेळी प्रचंड गाजला आणि क्रिशन कुमार लोकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला. त्याने केलेल्या अभिनयाला बघून लोकांना असं वाटू लागलं होतं कि त्याचं खरंच ब्रेकअप झालं होतं कि काय.
बेवफा सनम हा चित्रपट आजवरचा सगळ्यात दर्दी असलेला पिच्चर मानला जातो. या चित्रपटात असलेली गाणी अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का, दिल तोड के हसती हे वो मेरा, वफा ना रास आई तुफ्फान लोकप्रिय झाली होती.
या चित्रपटामुळे सोनू निगम हा नवोदित आणि उत्तम गायक बॉलीवूडला मिळाला.
दोन करोड बजेट असलेल्या या चित्रपटाने त्यावेळी ३.९ करोडचा व्यवसाय केला होता आणि वर्ल्डवाईड कलेक्शन हे नऊ करोड होतं. क्रिशन कुमारने मात्र पुढे जास्त काही काम केलं नाही.
गुलशन कुमार यांच्या हत्येमुळे त्यांना प्रचंड धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या भावाची कॅसेट कंपनी त्यांनी सांभाळली.
कसम ‘तेरी कसम, शबनम, पगला कही का (अल्बम)आणि पापा दि ग्रेट अशा चित्रपटांतून तो झळकत राहिला. २००० साली आलेल्या पापा दि ग्रेट हा चित्रपट क्रिशन कुमारने केलेला शेवटचा चित्रपट होता. पुढे त्याने आपल्या पुतण्याच्या बरोबर म्हणजे भूषण कुमारला जोडीला घेऊन चित्रपट निर्मिती करण्याचं काम तो करू लागला. आजवर त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात रेडी, एअरलिफ्ट, दे दे प्यार दे, मनमर्जीया आणि तानाजी अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
नव्वदच्या दशकात जितके काही म्युझिकल अल्बम असलेले चित्रपट आले त्यात क्रिशन कुमारच्या बेवफा सनमचा मोलाचा वाटा होता, चित्रपटातील दर्दी गाणी प्रत्येक वर्गातल्या प्रेक्षकाला भावली, तरुणाईने हि गाणी चांगलीच डोक्यावर उचलून धरली.
लोकांमध्ये आजही तो एक दर्दी नायक म्हणून प्रसिद्ध आहे. जास्त प्रसिद्धीच्या झोतात न राहता तो चित्रपट निर्मितीच काम करत आहे.
गुलशन कुमार यांची ही कॅसेट कंपनी आज युट्युब आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म वर राज्य करते. क्रिशन कुमार आपल्या पुतण्या बरोबर होत असलेल्या वादामुळे गाजत असले तरी सहज ती सिरीज मधूनअब्जावधी रुपयांचे मालक तर सहज आहेत.
हे हि वाच भिडू :
- गुलशन कुमार म्हणाले, पैसे वैष्णोदेवीच्या अन्नछत्रावर खर्च करेल पण तुम्हाला दमडी देणार नाही
- बारमधली आशिकी असो किंवा ट्रॅक्टरवर वाजणारा राझ, नव्वदीची पिढी त्यांना विसरणार नाही..
- घरच्यांनी शिकवून मेकॅनिकल इंजिनियर बनवलं आणि हा सगळं सोडून बी ग्रेड सिनेमाचा व्हिलन बनला
- सोनू निगम धमकी देतोय तो मरिना कंवरचा व्हिडीओ नेमका काय आहे?