गांगुलीच्या आधी लॉर्ड्सच्या बाल्कनीत स्वॅग दाखवणारा कार्यकर्ता म्हणजे के. श्रीकांत

२५ जून १९८३, एकही क्रिकेटवेडा आयुष्यात ही तारीख विसरू शकत नसतोय. एक कपिल देव सोडला, तर कुणालाच वाटलं नव्हतं की भारत त्यादिवशी बलाढ्य वेस्ट इंडिजला हरवून वर्ल्डकप फायनल जिंकू शकतो. पण जिगरबाज कार्यकर्त्यांनी इतिहास घडवून दाखवलाच. आजही त्या वर्ल्डकप फायनलच्या आणि त्या सामन्यात खेळणाऱ्या प्लेअर्सच्या आठवणी आपण विसरू शकलो नाही.

या स्पर्धेवर आधारित ’83’ सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झाला. या ट्रेलरमध्ये एक सिन आला आणि बघता बघता चेहऱ्यावर हसू फुटलं. भारतीय टीमची नेट प्रॅक्टिस सुरू आहे, मदन लाल बॉलिंग टाकतोय आणि समोरचा बॅटर आपल्याला हाणतोय हे बघून मदन लाल चिडून म्हणतो, ‘ओय आरामसे मार ना चीका, भाई नेट प्रॅक्टिस है.’ समोरुन द्रविडी लहेजा असलेल्या हिंदीत उत्तर येतं, ‘हमको ये चुम्मा टुकू टुकू खेलना नही आता.’

त्या ट्रेलरमधली चीकाची हिंदी, त्याचा अतरंगी अंदाज आणि चक्क ब्रिटनच्या राणीला मारलेला डोळा या गोष्टी कित्येक चाहत्यांना नॉस्टॅल्जीक करुन गेल्या. हा चीका म्हणजे भारताचा ओपनिंग बॅटर कृष्णमाचारी श्रीकांत.

१९८३ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये भारतानं फक्त १८३ रन्स केले होते. गावसकर, अमरनाथ, यशपाल शर्मा, संदीप पाटील अशी तगडी बॅटिंग हिरव्यागार विकेटवर ढेपाळली होती. एकट्या श्रीकांतनं ३८ रन्स करत किल्ला लढवला होता. समोरच्या टीममध्ये स्वतः व्हिव रिचर्ड्स, गॉर्डन ग्रिनीज, क्लाईव्ह लॉईड असले कर्दनकाळ असूनही त्यांना १८३ रन्स चेस करता आले नाहीत. त्या मॅचमधली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या श्रीकांतच्या बॅटमधून आली.

श्रीकांतनं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केलं. भारताच्या अंडर-१९ संघात त्याची निवड झाल्यावर त्यानं खतरनाक कामगिरी केली. त्याची डोमेस्टिक क्रिकेटमधली कामगिरी बघून त्याची भारतीय टेस्ट संघात वर्णी लागली, पण पहिल्याच मॅचमध्ये गडी रनआऊट झाला. पण पुढं मात्र भावानं सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्यानं भारताकडून वनडेमध्ये चार तर कसोटी क्रिकेटमध्ये दोन शतकं झळकावली.

ओपनिंग बॅटिंग करणाऱ्या श्रीकांतनं बॉलिंगमध्येही आपली कमाकल दाखवलीये. अनेक मोठ्या बॉलर्सला जे जमलं नाही, ते त्यानं वनडे क्रिकेटमध्ये दोन फाईव्ह विकेट्स हॉल घेऊन साध्य करुन दाखवलं. त्याचं बोलणं, स्टाईल आणि आक्रमक बॅटिंग या गोष्टींमुळं तो कायमच लक्षात राहणार हे नक्की.

पण श्रीकांतबाबत आणखी एक वांड किस्सा आहे-

लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंड म्हणजे क्रिकेटची पंढरी. गोऱ्या साहेबांच्या शिस्तीचं प्रतीक म्हणजे या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडची बाल्कनी. इकडं येताना काय कपडे घालायचे, काय खायचं, काय प्यायचं, काय करायचं आणि काय नाही… अशा अनेक बाबतीत प्रचंड नियम आहेत. आपल्या गांगुलीनं तिथं टीशर्ट काढून घुमवला होता आणि फ्लिंटॉफसकट सगळ्या इंग्लंड क्रिकेटचा माज मोडला होता.

आता गांगुलीनं विषय केला २००२ मध्ये. त्याच्याआधी १९८३ मध्ये श्रीकांतनं सगळ्या जगाला आपला स्वॅग दाखवला होता. झालं असं की वर्ल्डकप जिंकल्यावर भारतीय खेळाडूंच्या आनंदाला उधाण आलं होतं. जवळची शॅम्पेन संपली म्हणून कपिलपाजी विंडीजच्या ड्रेसिंग रुममधून शॅम्पेनच्या बाटल्या घेऊन आले होते. त्याही बाटल्या चाहत्यांना वाटण्यात संपल्या.

या सगळ्या गोंधळात श्रीकांत मात्र एकदम निवांत होता. कारण गडी लॉर्ड्सच्या पांढरपेशा बाल्कनीत उभा राहून आरामात सिगरेटचे झुरके घेत होता. तिथली शिस्त-बिस्त बाजूला ठेवून भाऊ एकदम निवांतमध्ये धूर सोडत होता. एका मुलाखतीत श्रीकांत स्वतःच हसत हसत सांगतो, की ‘ती आपल्या आयुष्यातली सगळ्यात भारी मोमेंट होती.’

हे ही वाच भिडू:

Webtitle : 83 world cup: Krishnamachari Shrikkant light a cigarette in lords balcony

Leave A Reply

Your email address will not be published.