इतिहासातली एक गोष्ट ज्यामुळे विश्वजीत कदमांनी कृष्णा कारखान्याची निवडणूक मनावर घेतलेय…

पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याच्या निवडणूकांपुढे आमदारकीच्या निवडणूका झक मारतात. राजकारणातले सगळे कोणत्या एका निवडणूकीत टाकले जात असतील तर ते कारखान्याच्या निवडणूकीत..

अशीच एक निवडणूक सध्या पश्चिम महाराष्ट्रात लागल्या.

निवडणूक आहे कृष्णा कारखान्याची…

कृष्णा कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठ्ठा कारखाना आहे. पन्नासच्या दशकात सहकार महर्षी यशवंतराव मोहिते यांच्या पुढाकारातून कारखाना उभारला गेला. कृष्णा कोयनेच्या माध्यमातून हा नदीपट्टा ऊसाने भरून गेला. ऊसाला भाव मिळाला आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांकडे पैसा खेळू लागला.

एका कारखान्याची आणि त्यासाठी झटलेल्या सहकारमहर्षी यशवंतराव मोहितेची ही कमाल होती…!

सध्या याच कारखान्याची निवडणूक रंगात आलेय. जयवंतराव भोसले यांच सहकार पॅनल सध्या सत्तेत आहे. विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले त्यांच्याविरोधात कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या “संस्थापक पॅनल” आणि इंद्रजित मोहिते यांच्या “रयत पॅनलचे” आव्हान उभारलय..

अविनाश मोहिते आणि इंद्रजित मोहिते या दोन्ही गटांचे मनोमिलन व्हावे म्हणून जवळपास सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले.

या सर्व घडामोडी घडत असताना एक नाव आघाडीवर होतं ते म्हणजे विश्वजीत कदम…

इंद्रजीत मोहिते यांच्यासाठी फिल्डींग लावताना कराड आणि वाळवा तालुक्यातील सर्व गावे पालथी घालण्याचं काम विश्वजीत कदम करत आहेत. निवडणूक जशी जशी जवळ येवू लागलेय तसं विश्वजीत कदमांच नाव चर्चेत आलय, एकट्याच्या जोरावर विश्वजीत वारं फिरवतील यावर चर्चा झडू लागल्यात…

साहजिक इतिहास माहित नसणारी लोकं विचारू लागलेत विश्वजीत कदमांना इतका इंटरेस्ट का?

हा इंटरेस्टचं शोधण्यासाठी आपल्याला भूतकाळात जायला लागतय….!

पतंगराव कदमांचा सांगली जिल्ह्यातील सोनसळसारख्या दुष्काळी व काहीशा दुर्गम परिसरात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्म झाला. गावात कोणतीही शिक्षणाची सोय नसल्यामुळे प्राथमिक शाळेत जाण्यासाठी ते दररोज पाच किलोमीटरची पायपीट करीत. त्यांनी कुंडल गावी वसतिगृहात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या गावातील ते पहिलेच मॅट्रिक.

कॉलेजचं शिक्षण पतंगरावांनी रयतमध्ये कमवा व शिका या योजने अंतर्गत घेतलं. चांगला मुलगा म्हणून यशवंतराव चव्हाणांच्या ते संपर्कात आले. पुढे पुण्यात आले. पुण्यात आले तेव्हा पतंगराव कदमांकडे भांडवल म्हणून मॅट्रिक पास आणि टिडी चं शिक्षण होतं. जून्या काळी शिक्षक होण्यासाठी टिडीची परिक्षा पास होण्याची आवश्यकता असायची.

याच भांडवलावर वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी सदाशिव पेठेत १० बाय १० च्या एका खोलीत भारती विद्यापीठाची स्थापना केली.

या संस्थेचे संस्थापक होते पतंगराव कदम. संस्थेत एक क्लार्क होता त्याच नाव पतंगराव कदम आणि संस्थेत एक शिपाई देखील होता त्याचं नाव देखील पतंगराव कदम. थोडक्यात काय तर वन मॅन आर्मी काम चालू होतं. सगळं काम पतंगराव स्वत: करायचे.

याच काळात पतंगराव कदमांचा संपर्क लोकनेते यशवंतराव मोहिते यांच्याशी आला. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची धडपड करणारा हा मेहनती हरहुन्नरी तरुण यशवंतरावांच्या नजरेत भरला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पतंगराव कदमांनी सामाजिक व राजकीय जीवनात पाऊल टाकलं.

यशवंतराव मोहिते यांना पतंगरावांनी आयुष्यभरासाठी आपला गुरु मानलं.

१९६८ मध्ये यशवंतराव मोहिते परिवहन मंत्री झाले. त्यांची इच्छा होती कि पतंगराव कदमांना एसटी महामंडळाचे संचालक बनवायचे. तेव्हा पतंगरावांचं वय फक्त २३ वर्षे इतकं होत. त्यांच्या नावावर वाद होऊ शकतो म्हणून यशवंतराव मोहितेंनी पक्षश्रेष्ठींची परवानगी घेण्याचं ठरवलं. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते सांगलीचे लोकनेते वसंतदादा पाटील.

यशवंतराव मोहिते दादांना म्हणाले,

‘‘दादा, तुमच्या जिल्ह्यातील खानापूर तालुक्‍यातील हा तरुण मुलगा आहे. त्याला एस.टी. बोर्डावर घ्यायचा माझा विचार आहे. तुमची संमती हवी.’’

वसंतदादा म्हणाले,

‘‘भाऊ, तुम्ही म्हणताय मग तो नक्कीच चांगला मुलगा असणार.’’

सांगली जिल्ह्यातील असूनही वसंतदादांच्या पतंगराव कदमांशी कधी संपर्क आला नव्हता. त्यांनी त्यांची माहिती घेण्यासाठी खानापूरचे तत्कालीन काँग्रेसचे आमदार संपतराव माने यांना विचारले. त्यानंतर संपतरावनानांनी पतंगरावांची ओळख दादांना सांगितली. परंतु, दादांनी पतंगराव कदम यांची ओळख आपण का विचारत आहोत, याबाबत काहीही नानांना सांगितले नाही. दादांनी ते अचूक टाळले.

फक्त २३ वर्षे वयाच्या या तरुणाला यशवंतराव मोहितेंनी १ जुलै १९६८ रोजी एस. टी. महामंडळाचे संचालक केले.

त्याकाळात राज्यातले मोठमोठे दिग्गज नेते एसटीचे संचालक असायचे. त्यांना महामंडळाची इम्पाला गाडी दिली असायची. अशा या स्थानावर तरुण मुलाला संधी देणे म्हणजे अनेकांची भुवया उंचावल्या होत्या. पण यशवंतराव मोहिते आणि वसंतदादा पाटील यांच्या सारख्या नेत्यांच्या पाठिंब्याने या संधीचे सोने करीत पतंगरावांनी गाव तिथे एसटी सुरू केली. ग्रामीण व दुष्काळी भागातील हजारो तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. १९६८ ते १९७३ अशी पाच वर्षे ते संचालक राहिले.

एकेकाळी सोनसळ ते शेणोली असा पाच किलोमीटरचा प्रवास रोज पायी करून शिक्षण पूर्ण केलेल्या या तरुणाने आपल्याच गावात नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात एसटी नेली. वाहतुकीच साधन नाही म्हणून कोणाचं शिक्षण अडू नये हे स्वप्न त्यांनी पाहिलेलं. परिवहन मंत्री यशवंतराव मोहिते डोंगराप्रमाणे पाठीशी राहिल्यामुळे त्यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं.

भारती विद्यापीठाला मान्यता मिळाली तेव्हा त्या सभेत यशवंतराव मोहिते यांची उपस्थिती सर्वात महत्वाची होती.

पुढे पतंगराव कदमांनी निवडणुकीच्या राजकारणात आपलं पाऊल टाकलं. काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळालं नसल्यामुळे पतंगरावांनी १९८० साली भिलवडी वांगी येथून विधानसभा लढवली. मात्र त्यांचा फक्त पोस्टल मतांमुळे अगदी निसटता पराभव झाला. त्याच वर्षी यशवंतराव मोहितेंना देखील मुख्यमंत्रीपद चालून आलं होतं पण त्यांनी ते नाकारलं.

पुढे पतंगरावांनी आपल्या राजकीय वाटचालीत मोठी प्रगती केली. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री म्हणून मोठा ठसा उमटवला. गाव तिथे एसटीप्रमाणेच राज्याच्या प्रत्येक तालुक्यात आयटीआय सुरु केले. ग्रामीण भागातील तरूणतरुणींना रोजगार मिळावा म्हणून पतंगराव कदमांनी उचललेलं हे पाऊल होतं.

अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात गाजूनही मात्र आपल्या गुरूंप्रमाणे त्यांना कधी मुख्यमंत्रीपदाला गवसणी घालता आली नाही. पण यशवंतराव मोहितेंच्या प्रमाणेच पतंगरावांनी कधी जनतेच्या कामासाठी  पदाचा विचार केला नाही.

यशवंतराव मोहिते हे अखेर पर्यंत भारती विद्यापीठाचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर अध्यक्ष कोण व्हायचं यावर चर्चा झाली. काहीजण पतंगरावांना अध्यक्ष व्हा असं म्हणाले त्यावर ते म्हणाले,

“जोवर मोहिते भाऊ यांच्या उंचीचा मोठा माणूस भेटत नाही तोवर हे पद रिकामं राहील.”

आणि आजही भारती विद्यापीठाचे अध्यक्षपद रिकामं आहे.

या दोन्ही थोर नेत्यांच्या आपलेपणाचा वारसा कदम मोहिते कुटुंबाच्या पुढच्या पिढ्यानी देखील चालवला आहे. मध्यंतरी विश्वजित कदम यांनी यशवंतराव मोहिते यांचे सुपुत्र इंद्रजित मोहिते यांची भेट घेतली होती.

त्यावेळी ते म्हणाले होते,

“पतंगराव कदम आणि यशवंतराव मोहिते यांचे गुरु-शिष्याचे नाते होते. कदम आणि मोहिते कुटुंबाचे ऋणानुबंध कायम राहतील. डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या सहकारातील अभ्यासाचा माझ्या कार्यात मी उपयोग करेन”

जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा एक चांगला धडपडणारा तरूण म्हणून यशवंतराव मोहिते हे पतंगराव कदमांच्या बाजूने उभे राहिले होते. काळ लोटला आत्ता हे दोन्हीही नेते जगात नाही. पण विश्वजीत कदमांनी मात्र ती जाणीव ठेवली आहे, म्हणूनच आज एकट्याच्या हिम्मतीवर वारं फिरवलं जात आहे…

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.