राजाने आईचे दागिने गहाण ठेवले आणि राज्यातलं सर्वात मोठं धरण बांधून पूर्ण केलं..

भारतात पर्यटन स्थळांची कमतरता नाही. इथंली मंदिरं, किल्ले, राजवाडे, बागा आपल्या इतिहासामुळं किंवा त्यांच्या रचनेमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. दरम्यान, या पर्यटन स्थळांच्या यादीत एका धरणाचाही नंबर लागतो. तो म्हणजे कृष्णराज सागर धरण.

कृष्णराज सागर धरण आणि वृंदावन गार्डन ही दोन्हींनी म्हैसूर जवळची फेमस पर्यटन स्थळ. जी पाहायला लोक लांबून- लांबून येतात. पण हे धरणं बांधण्यामागची इंटरेस्टिंग स्टोरी फार कमी लोकांना माहितेय.

तर तो काळ होता २० व्या शतकाचा. म्हैसूरच्या एका राजनं भारताच्या ‘अभियांत्रिकीचे जनक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर एम. विश्वेश्वरैया यांच्या सोबत मिळून त्यावेळचे भारतातील सर्वात मोठे धरण बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला, ज्यामुळे म्हैसूर संस्थानचे भाग्य बदलले.

कावेरी नदीवरील हे केसीआर धरण भारतातील सर्वात प्रतिष्ठित धरणांपैकी एक आहे, ज्याचे नाव म्हैसूरचे महाराजा कृष्णा राज वाडियार चौथा यांच्या नावावर आहे, ज्यांच्या कारकिर्दीत ते बांधले गेले होते.

वाडियार राजवंशाचे म्हैसूर संस्थान कावेरी नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून होते. मात्र,म्हैसूरच्या तत्कालीन संस्थानाला 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले.

1874 मध्ये, या प्रदेशात अतिवृष्टी झाली, ज्यामुळे कापणी केलेली सर्व पिके नष्ट झाली. अजून या आपत्ती सावरतोय ना सावरतोय तर एक वर्षानंतर येथे सर्वात भीषण दुष्काळ पडला. 1875 ते 1900 दरम्यान, प्रदेशात इतका भीषण दुष्काळ पडला की, सुमारे वीस टक्के लोकसंख्या त्यांना बळी पडली आणि बहुतेक लोक रोजगाराच्या शोधात आसपासच्या भागात गेली.

जरी 1902 मध्ये कावेरीच्या शिवसामुद्रम धबधब्यावर जलविद्युत बांधकाम करण्यात येऊन नदीच्या प्रवाहाचा वापर वीजनिर्मितीसाठी केला गेला, परंतु वीज उत्पादन चढ -उतार होत राहिले. येथून कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील प्रसिद्ध सोन्याच्या खाणीला वीज पुरवली गेली, जी अपुरी होती. याव्यतिरिक्त, कावेरीवरील अनेक लहान धरणे संपूर्ण राज्यासाठी पुरेशी नव्हती, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सिंचनाची गरज जाणवली.

याच सुमारास कृष्णराज वाडियार चौथा याने अधिकृतपणे राज्याची सूत्रे हाती घेतली.

म्हैसूरचे चोविसावे महाराजा कृष्ण राज वाडियार हे भारतातील सर्वात प्रगतिशील शासकांपैकी एक होते, ज्यांना म्हैसूरला एक आदर्श आधुनिक राज्य बनवण्याचे श्रेय दिले जाते. त्यांच्या प्रशासकीय सुधारणांमुळे महात्मा गांधींनी त्यांना “राजश्री” तसेच “ऋषी राज” ही पदवी दिली होती.

1909 मध्ये प्रसिद्ध अभियंता सर एम. विश्वेश्वरय्या यांना म्हैसूर संस्थानचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले जे ‘भारतीय अभियांत्रिकीचे जनक’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी लगेच योजना आखली.

त्यांचा असा विश्वास होता की धरण “शेती उत्पन्न, उद्योग आणि बांधकामांसह लोकांची उत्पादक शक्ती वाढवेल, त्यामुळे राज्याच्या महत्त्वाचे मार्ग खुले होतील.”

प्रकल्पाची सुरुवातीची अंदाजे किंमत 253 लाख रुपये होती. काही सरकारी अधिकाऱ्यांना या योजनेवर शंका होती, आणि प्रकल्पावर एवढी मोठी रक्कम खर्च करण्याच्या विरोधात होते, कारण राज्याने यापूर्वी इतक्या मोठ्या रकमेवर कधीच खर्च केला नव्हता. परंतु या योजनेला म्हैसूर राज्याचे राजा आणि त्यांचे दिवाण टी. आनंदा राव यांनी मनापासून पाठिंबा दिला आणि राजाने कोणताही बदल न करता प्रकल्पाला मंजुरी दिली.

मांड्या जिल्ह्यातील कन्नंबरी गाव म्हैसूर शहरापासून सुमारे 12 मैल दूर या धरणाच्या बांधकामासाठी निवडण्यात आले होते, म्हणून या धरणाला ‘कन्नमबाडी कट्टा’ असेही म्हणतात. मांड्या प्रदेश नैसर्गिक संसाधनांनी संपन्न आहे आणि कावेरी, लोकपावनी आणि इलामावती या तीन प्रमुख नद्या येथे वाहतात, ज्यात आर्थिक विकासाची प्रचंड क्षमता आहे.

पण धरणाच्या बांधकामात आणखी एक अडथळा आला. याच सुमारास मद्रास प्रेसीडेंसीचे वसाहती प्रशासक कन्नमबाडी येथे बांधल्या जाणाऱ्या धरणाच्या सुमारे 60 मैल खाली मेटूर येथील कावेरीवरील जलाशयासाठी त्यांचा प्रकल्प तयार करत होते. प्रशासक चिंतित होते कारण त्यांना विश्वास होता की कन्नंबरी धरण त्यांच्या प्रकल्पात अडथळा आणू शकते आणि त्यांना आवश्यक तेवढे पाणी मिळणार नाही. या व्यतिरिक्त, त्यांना वाटले की, त्यांना डिझाइन देखील बदलावे लागेल. दोघांनी अखेरीस एक करार केला आणि लवकरच महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम सुरू झाले.

एम. विश्वेश्वरय्या यांच्या देखरेखीखाली कावेरी आणि त्याच्या उपनद्या हेमावती आणि लक्ष्मणतीर्थ यांच्या संगमाखाली नोव्हेंबर 1911 मध्ये धरणाचे बांधकाम सुरू झाले.

राजाने संपूर्ण प्रकल्पाची काळजी घेतली. धरणाच्या बांधकामात सुमारे एक हजार कामगार कार्यरत होते. मान्सूनमुळे प्रभावित झालेल्या या कामगारांपैकी बरेच जण म्हैसूर णि मांड्या येथील विस्थापित लोक होते. धरणाच्या बांधकामामुळे त्यांना रोजगार मिळाला.

धरणाच्या बांधकामादरम्यान हजारो बेघर लोकांना पुनर्वसित करण्यात आले आणि सरकारने त्यांना आसपासच्या भागात लागवडीसाठी जमीन दिली.

महत्त्वाचं म्हणजे त्या काळात सिमेंट आयात करावे लागायचे, कारण तेव्हा भारतात सिमेंट बनवले जात नव्हते. एम. विश्वेश्वरय्या यांनी सिमेंटच्या आयातीवर होणारा शासकीय खर्च वाचवण्यासाठी सिमेंटऐवजी सुर्की नावाच्या गाऱ्याचा वापर केला.

पण लवकरच धरणाच्या बांधकामावर आर्थिक संकट येऊ लागले. धरण बांधण्यासाठी सुमारे 2.75 कोटी रुपये खर्च आला, तर म्हैसूर राज्याचे उत्पन्न सुमारे 2.32 कोटी रुपये होते. पण राजा आपल्या लोकांच्या कल्याणासाठी बांध बांधण्यात इतका समर्पित होता की त्याने मुंबईतील राजघराण्याच्या खाजगी तिजोरीतून दागिने विकले.

 त्याची आई राणी कामराजम्मानी यांनीही धरणाच्या बांधकामासाठी तिचे मौल्यवान सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते.

असे म्हटले जाते की,राजघराण्याचा त्याग पाहून राज्यातील इतर लोकांनीही त्यांच्या क्षमतेनुसार धरणासाठी देणगी देणे सुरू केले. 

हे धरण 1931 मध्ये पूर्ण झाले आणि अशा प्रकारे भारतातील सर्वात मोठा जलाशय बनला. हा जलाशय हा एक बहुउद्देशीय प्रकल्प होता आणि या कारणास्तव विश्वेश्वरय्या यांनी अमेरिकेच्या टेनेसी व्हॅली अथॉरिटी योजनेचे हे एक संक्षिप्त रूप मानले.

कृष्ण राज सागरचे बांधकाम या प्रदेशासाठी महत्वपूर्ण ठरले. हे अनेक शहरे आणि गावांसाठी तसेच प्रसिद्ध कोलार गोल्ड फील्ड (केजीएफ) आणि म्हैसूर आणि बेंगलोर या प्रमुख शहरांसाठी वीज पुरवठ्याचे स्रोत बनले.

म्हैसूर आणि बंगळूरू शहरांसाठी हा पाण्याचा प्रमुख स्त्रोत आहे. धरणाला सिंचनासाठी एक लाख एकरपेक्षा जास्त जमीन मिळाली. हा ऊस समृद्ध भाग पूर्वी दुष्काळाने प्रभावित झाला होता. धरणामुळे येथे उसाची भरपूर लागवड सुरू झाली. उसाची लागवड आणि वीज पुरवठ्यामुळे म्हैसूर साखर कारखाना उद्योग स्थापन झाला, जो भारतातील सर्वात मोठा उद्योग होता. साखर कारखान्यांव्यतिरिक्त, धरणाने म्हैसूर आणि बंगळूरूमध्ये कापूस गिरण्या आणि इतर उद्योग चालवण्यासाठी वीज निर्माण केली.

कृष्णा राज सागर जवळील प्रसिद्ध वृंदावन बाग हे या धरणाचे वैशिष्ट्य आहे. ही उद्याने म्हैसूरचे दिवाण सर मिर्झा इस्माईल यांनी बांधली होती. असे म्हटले जाते की दिवाणला बागांची आवड होती आणि ते काश्मीरच्या मुगल गार्डनच्या धर्तीवर बांधले गेले होते. गार्डनचे बांधकाम 1932 मध्ये पूर्ण झाले.

शतकानंतरही कृष्णा राज सागर धरण आजही लाखो शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या जीवन रक्षकाची भूमिका बजावतेय.

हे ही वाचंं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.