स्वतःशीच लग्न, विषय चिडवण्याचा नाही तर समजून घ्यायचा आहे ; सायकॉलॉजिस्ट काय सांगतात…

तुम्ही सकाळपासून न्यूज चॅनेल्स किंवा सोशल मीडियावर एक बातमी वाचली असेल, ती म्हणजे वडोदऱ्यातली एक मुलगी लग्न करतीये. आता पळून जाऊन लग्न करणाऱ्या दोस्तांसाठी सह्या करणाऱ्या आणि लग्नात हजार ताटांचं जेवण घातलेलं असल्यानं आपल्याला लग्न म्हणजे काय लय विशेष गोष्ट वाटत नाही. पण तरीही क्षमाचं लग्न विशेष आहे. कारण तिच्या लग्नात फेरे आहेत, सिंदूर भरण्याचा कार्यक्रमही आहे, कुठली गोष्ट नाहीये तर वरात आणि नवरा.

आता तुम्ही म्हणाल नवरा नाही, तर लग्न कुणाशी करणारे..? तर स्वतःशी. स्वतःशी लग्न का करणार ? कशासाठी करणार ? या लग्नाला नेमकं काय म्हणतात ? हे सगळं जाणून घेऊ.

बरेच भिडू असे असतील, ज्यांनी ही बातमी पाहिली किंवा वाचलीच नसेल. त्यांच्यासाठी धावता आढावा घेऊयात. तर वडोदऱ्यातली २४ वर्षांची क्षमा बिंदू लग्न करतीये. तिच्या लग्नात इतर लग्नांसारखे विधी असतील, पण नवरा नसेल. कारण क्षमा स्वतःशी लग्न करणार आहे. एवढंच नाही, तर लग्न झाल्यानंतर ती २ आठवडे गोव्याला हनिमूनलाही जाणार आहे. अर्थात एकटीच.

या लग्नामागचं कारण सांगताना क्षमा माध्यमांशी बोलताना म्हणाली की, “मला कधीच लग्न करायचं नव्हतं, पण नवरीसारखं नटायचं होतं. त्यामुळं मी स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला.कदाचित स्वतःबद्दलच्या प्रेमाचं उदाहरण देणारी मी भारतातली पहिलीच मुलगी असू शकते.”

“स्वतःशी लग्न करणं म्हणजेच स्वतःला आहोत तसं स्विकारणं, स्वतःसाठी उपलब्ध असणं. लोकं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्याशी लग्न करतात, माझं स्वतःवर प्रेम आहे म्हणून मी ‘सेल्फ मॅरेज’ करतीये. यातून मला हे सुद्धा सांगायचंय की महिलाही महत्त्वाच्या आहेत.”

सगळ्यात आधी जाणून घेऊ की हे सेल्फ मॅरेज काय असतं? 

तर साध्या भाषेत स्वतःशी लग्न करणं. यालाच सोलोगॅमी असंही म्हणतात. यात स्वतःवर प्रेम असणारी लोकं स्वतःलाच लग्नाबाबत कमिटमेंट देतात. कधी स्वतःशी लग्न करण्याचा मोठा सोहळाही करतात, स्वतःला गिफ्ट देतात. 

बघायला गेलं तर स्वतःशी लग्न केल्याचं कुठलंच बंधन नसतं, त्यामुळे पुढे जाऊन आयुष्यात कुणी आल्यास त्या व्यक्तीसोबतही नातं जोडता येतं.

क्षमाच्या निमित्तानं भारतात हा ट्रेंड येण्याची शक्यता असली, तरी पाश्चात्य देशांमध्ये मात्र अशी लग्न मोठ्या प्रमाणावर होत आहेत. २०१८ मध्ये युगांडामधल्या लुलु जेमीमाह या ३२ वर्षीय महिलेनं स्वतःशी लग्न केलं होतं, या घटनेची जगभर चांगलीच चर्चा झाली होती. 

सप्टेंबर २०२१ मध्येही सेल्फ मॅरेजची जोरदार चर्चा झालेली. कारण ब्राझीलमधल्या ख्रिस गॅलेरा नावाच्या एक महिलेनं थाटामाटात स्वत:शी लग्न केलं, कारण ती एकाच पुरुषावर अवलंबून राहण्यास कंटाळली होती. पण ९० दिवसानंतर तिनं स्वतःला घटस्फोट दिला कारण तिला जोडीदार भेटला होता.

 सोलोगॅमीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढला तो लॉकडाऊनमध्ये.

 कारण बरेच लोकं एकाच जागेवर अडकून राहिले होते. सिंगल असलेल्या किंवा डेट करणाऱ्या लोकांना मोबाईलवर बोलण्यापलीकडे कुठलाच पर्याय नव्हता. बराच वेळ असल्यानं लोकं तो स्वतःला देऊन लागले आणि त्यातून सेल्फ लव्हच्या भावनेला नवी उभारी मिळाली. आपण एकट्यानं आनंदानं वेळ घालवू शकतो, स्वतःसाठी वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो, ही भावना रुजत गेली आणि कित्येकांनी स्वतःशीच लग्न करायला सुरुवात केली.

या लग्नांमध्ये कसलंच बंधन किंवा नियमांची चौकट नसल्यानं कित्येकांनी हा पर्याय निवडला, असं सांगण्यात येतं. 

क्षमा बिंदूच्या निमित्तानं भारतात सोलोगॅमीचा ट्रेंड येण्याची शक्यता वाढली असली, तरी सोलोगॅमीबद्दल सायकोलॉजिस्ट नेमकं काय सांगतात हे जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे.

यासाठी बोल भिडूनं सायकोलॉजिस्ट डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे यांच्याशी संपर्क साधला,

त्या म्हणाल्या,

“भारतात कुणीतरी स्वतःशी लग्न करत असल्याचं जाहीर करतंय, हे पहिल्यांदाच ऐकायला मिळालं. स्व-सहजीवन या जुन्या संकल्पनेचं हे टोक म्हणता येईल. लग्न झालेली किंवा न झालेली व्यक्ती स्वतःशी किती संवाद साधते, स्वतःकडे कसं लक्ष देते यातून स्व-सहजीवनाची संकल्पना पुढे आली होती. स्वतः बरोबर वेळ घालवणं, स्वतःच्या विचारांना वेळ देणं यात काहीच चुकीचं नाहीये.

स्वतःशी लग्न किंवा स्वतःसोबत जगणं याचा प्रॅक्टिकल अँगल पाहिला, तर तो लिव्ह फॉर युवरसेल्फ असाच आहे किंवा सेल्फ एक्स्प्लोरेशनचाच एक पुढचा टप्पा आहे असं म्हणता येईल. मीच माझी पार्टनर आहे, तर स्वतःला आणखी शोधता येईल, हे त्यामागचं कारण असू शकतं. 

स्वतःशी लग्न करण्याचा विचार हा आजार असू शकत नाही. ही फार वेगळी कन्सेप्ट आहे, जी सायकोलॉजिकल असण्यापेक्षा जास्त फिलॉसॉफिकल आहे, असं मला वाटतं.

पोलोगॅमीचे आणखी कंगोरे उलगडण्यासाठी स्वतःशी लग्न करणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधणं, त्यांच्याकडून नेमकी कारणं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सेल्फ एस्टीम किंवा सेल्फ लव्हबद्दल बोलायचं झालं तर, सेल्फ लव्ह आणि सेल्फ एस्टीमला तेव्हाच महत्त्व प्राप्त होतं जेव्हा लोक समूहात राहत असतात, एकट्यानं राहणाऱ्या माणसांकडून आपसूकच सेल्फ लव्ह होतं. 

स्वतःशी लग्न करताना मला कुणी नकोय असा बेसिक विचार असला, तरी मग भावंडं, कुटुंब, मित्र सुद्धा नकोयत का? याबाबतही म्हणणं जाणून घ्यायला हवं. स्व-सहजीवनात समूहात राहून काही दिवस स्वतःसोबत घालवायला हवेत, असा विचार होता. 

त्यापेक्षा स्वतःशी लग्न करण्याची कल्पना वेगळी आहे, पण वाईट नक्कीच नाहीये. ती किती काळ टिकेल? किती डेप्थमध्ये जाऊन त्यांनी हा निर्णय घेतलाय, ते त्यांच्याशी बोलूनच ठरवावं लागेल. पण हा कुठला आजार आहे, असं म्हणता येणार नाही.”

थोडक्यात क्षमानं या लग्नाआधी नेमका काय विचार केलाय? तिचं हे स्वतःसोबतचं लग्न यशस्वी होईल का? असे बरेच प्रश्न आहेत. पण तिच्या या लग्नामुळं भारतात सोलोगॅमी म्हणजेच सेल्फ मॅरेजचं प्रमाण वाढेल का? तुम्हाला सेल्फ मॅरेज योग्य वाटतं की अयोग्य? कमेंट करुन नक्की सांगा. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.