अपहरण झालेल्या पोराला शोधायला वडील स्वत: गुप्तहेर बनले पण…

व्योमकेश बक्षी, शेरलॉक होम्स, गेलाबाजार आपल्या सीआयडीतले एसीपी प्रद्युमन, हे पोलिस आणि गुप्तहेर लोक गुन्हेगारांना कसं शोधतात, या गोष्टीचं आपल्याला जबरदस्त फॅसिनेशन असतंय. म्हणजे कुणी छोटे छोटे पुरावे गोळा करुन आंबा पाडतंय, तर कुणी दयासारखा असतोय जो एका कानपट्ट्यात विषय मोकळा करत असतोय. आपण दोन्ही बघतोय आणि मग उगा भलत्या गोष्टींमध्ये डीप मिनिंग शोधायला जातोय.

शाळेत असताना वर्गावर हल्ला झाला की, आपल्या डावाला कसं वाचवायचं हे सगळ्यांचं इमॅजिन करुन झालेलं असतं, पण जेव्हा खरंच संकट येतं तेव्हा थोडीच लोकं अशी असतात जी संकटांना तोंड देऊ शकतात.

आग्र्यात किराणा दुकान चालवणारा गब्बर सिंह नावाचा माणूस या थोड्या लोकांपैकी एक, खरं त्याचं नाव जितकं फिल्मी आहे, तितकीच त्याची स्टोरीही.

गब्बर सिंहचा ९ वर्षांचा मुलगा कुलदीप संध्याकाळी खेळायला जातो म्हणून बाहेर गेला. संध्याकाळची रात्र झाली, रात्रीचा दिवस झाला.. पण कुलदीप काय घरी आला नाही. गब्बरनं आजूबाजूला शोध घ्यायला सुरुवात केली, आपल्या आणि पोराच्या मित्रांची घरं पालथी घातली. पण उपयोग शून्य.

इतका वेळ झाला तरी पोरगा घरी येईना म्हणून त्यानं पोलिसांकडे एफआयआर नोंदवली. आता पोलिसांनीही तपास सुरु केला. त्यांनी गब्बरलाही काही प्रश्न विचारले की, खंडणीसाठी कुणाचा फोन आला का ? कुणाशी शत्रुत्व आहे का ? तुमच्या मुलावर कुणाचा राग आहे का ? सगळ्याचं उत्तर एकच आलं, नाही…

साहजिकच पोलिसांनाही काही ठोस पुरावा मिळेना, तपासाची दिशा ठरेना. त्यांनी गब्बरच्या आजूबाजूची गावं पालथी घातली, तरी कुलदीपबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. दिवस उलटत होते, पण कुणाचा खंडणीसाठीही फोन येत नव्हता. पोलिसांनी अंदाज लावला की, जर किडनॅपिंग झालं असेल, तर आजवर खंडणीसाठी एक तरी फोन आला असता. त्यामुळं कदाचित कुलदीपच रागाच्या भरात कुठंतरी निघून गेला असावा.

पण त्यांनी या बाजूनं तपास करण्याआधीच उत्तरप्रदेशच्या निवडणुकांचं वातावरण तापलं, पोलिसांना इलेक्शन ड्युटी लागली आणि या सगळ्यात कुलदीपच्या तपासाकडं दुर्लक्ष झालं.

गब्बर सिंहच्या गावातल्या लोकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकायचा निर्णय घेतला, गावात आंदोलन उभं राहिलं. पण तरीही पोलिसांकडून तपासाची चक्र वेगानं फिरत नव्हती. कुलदीप गायब होऊन आठवडा उलटत आला होता.

या सगळ्यात एक माणूस होता, ज्यानं काहीही झालं तरी कुलदीपला शोधायचंच असं ठरवलं आणि त्या दृष्टीनं पावलंही उचलली. हा माणूस होता, गब्बर सिंह… कुलदीपचा बाप.

जिथं पोलिसांना काही सुगावा लागत नव्हता तिथं गब्बर सिंहला उघडपणे काही सापडणं अशक्य होतं. त्यामुळं त्यानं आपली ओळख लपवून मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानं आपल्या आणि आजूबाजूच्या भागात पोस्टर्स लावली आणि त्यावर लिहिलं शोधून देणाऱ्याला ५ लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं. हीच पोस्ट सोशल मीडियावरही व्हायरल झाली. पण तरीही तपास लागत नव्हता.

इतके दिवस अपहरणाची फक्त शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र ९ फेब्रुवारीला गब्बर सिंहच्या घरी एक पत्र आलं…

या पत्रात लिहिलेलं की, ‘जर मुलाची सुटका हवी असेल, तर ३५ लाख रुपये गावाजवळच्या शिसमाच्या झाडावर नेऊन ठेवावे.’ गब्बर ज्या लोकांसोबत कुलदीपचा तपास करत होता, त्यांच्यासोबत त्यानं ही गोष्ट बोलली, पण त्याचं म्हणणं होतं की… ‘३५ लाख ही मोठी रक्कम होती आणि कशावरुन कुलदीप त्यांच्या ताब्यात असेल…?’

काही दिवस गेले आणि गब्बरच्या घरी ११ फेब्रुवारीला आणखी एक पत्र आलं. पण यावेळी त्यात एक बदल झाला होता, पत्रात सुटकेची रक्कम २५ लाख होती आणि सोबतच कुलदीपनं घातलेली एक टोपीही होती. त्यामुळं गब्बरचा विश्वास वाढला. पण तरीही तो सावध पावलं उचलत होता.

तेवढ्यात १३ फेब्रुवारीला त्याच्या घरी तिसरं पत्र आलं, यात लिहिलेलं की पैसे लवकर मिळाले नाहीत तर मुलाची डेड बॉडी मिळेल.

आता मात्र गब्बरचे धाबे दणाणले, त्यानं ओळख बदलून तपास करायला सुरुवात केली. अशातच त्याचा संशय गेला आशु नावाच्या एका नातेवाईकावर. कारण ज्या शिसमाच्या झाडापाशी खंडणी द्यायला सांगत होते, हा आशु तिथंच राहायचा. त्यात गब्बरसोबत कुलदीपचा तपास करणाऱ्यांमध्ये आशूही असायचा. 

गब्बर एकदा आशुकडे त्याची गाडी भाड्यानं हवी आहे हे कारण घेऊन गेला, मात्र आशु चपापला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि साहजिकच गब्बरला त्याच्यावर संशय आला.

तो ओळख बदलून आशु जवळ गेला आणि त्याचवेळी आशु कुणाला तरी फोनवर सांगत होता, की ‘आत्ता गब्बर माझ्याजवळ आला होता आणि तो माहिती काढायचा प्रयत्न करत होता, पण मी काही सांगितलं नाही.’

ओळख लपवून वावरणाऱ्या गब्बरला हा एवढा पुरावा बास होता, त्यानं ही टीप पोलिसांना दिली आणि पोलिसांनी आशूला आपल्या पद्धतीनं खाक्या दाखवला आणि मग उलगडली मर्डर मिस्ट्री.

मुकेश आणि कन्हैय्या, ही दोघं जण गब्बरच्या आजुबाजुलाच राहायची. यातला मुकेश तर गब्बरचा भाडेकरु होता. पण त्याचे गब्बरशी जुने वाद होते. तर कन्हैय्याला एकदा गब्बरमुळं मार खावा लागला होता. या दोघांचा गब्बरवर राग होता… त्यामुळं त्यांनी त्याला धडा शिकवायचं ठरवलं. आशुचा या सगळ्याशी काहीच संबंध नव्हता, मात्र त्यानं या दोघांची साथ द्यायचं ठरवलं.

यातूनच त्यांनी २३ जानेवारीला कुलदीपला किडनॅप केलं, रागाच्या भरात त्याचा खून केला आणि बॉडी पुरुन टाकली. संशय येऊ नये म्हणून त्यांनी गब्बर सोबतच तपास करायला सुरुवात केली, त्यामुळेच रक्कम जास्त असण्याचं बोलणं ऐकल्यावर त्यांनी खंडणीची रक्कम कमी केली आणि जिवंत असल्याचा खोटा पुरावा म्हणून मुलाची टोपीही दाखवली.

शेवटी पोलिस आणि गब्बर कुलदीपपर्यंत पोहोचले… पण हाती लागला तो त्याचा मृतदेह. एका बापानं आपल्या मुलाच्या शोधासाठी प्रयत्न केले, मात्र या प्रयत्नांचा शेवट फार दुर्दैवी झाला….

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.