एकेकाळी बार मध्ये गाणाऱ्या सानूला जे काही मिळालं ते मुंबई मुळे मिळालं !

आशिकीच्या पाट्या पडत असतात. पडद्यावर अंधार. बार मधलं धुंद वातावरण. स्टुलवर गिटार घेऊन बसलेल्या हिरोची दिसणारी प्रोफाईल. मागून प्रकाश. हळूहळू नदीम श्रवणचं सुरु होणारं संगीत आणि कुमार सानुचा मधुर आवाज कानात घुमतो, 

 “सासोंकी जरुरत है जैसे जिंदगी के लिए बस इक सनम चाहिये आशिकी की लिए.”

कुमार सानू म्हणजे रोमान्स. साधा नव्हे तर नव्वदच्या दशकातला दर्द. आजही हा दर्द अनेकांना ग्लासात उतरवतो. तो काय रफी किशोर सारखा महान गायक नाही. पण एका पेग बरोबर गाणी ऐकताना त्याच्या आवाजाची देखील नशा चढते असं म्हणतात.

असा हा कुमार सानू याच्या गाण्याची सुरवात देखील  आशिकीप्रमाणे मुंबईच्या एका रेस्टोरंट बार पासून झाली होती.

त्याचं खरं नाव केदारनाथ भट्टाचार्य. मूळचा कलकत्त्याचा. त्याला सगळे घरचे सानू म्हणायचे.

त्याचं कुटुंब म्हणजे बंगालमध्ये शास्त्रीय संगीतातलं गाजलेलं घराणं. वडील, आई, बहीण सगळे भद्रसंगीताचे जाणकार. पट्टीचे गवय्ये. त्यांची गाणी ऐकत ऐकत सानू मोठा झाला. तो मात्र गायचा नाही. शास्त्रीय संगीत आपल्या आवाजाला झेपत नाही हे त्याला ठाऊक होतं. म्हणून सानू तबला वाजवायचा. मोठमोठ्या लोकांच्या साथीला तबला वाजवायला जायचा.

एकदा अशाच कुठल्या तरी कार्यक्रमात स्लॉट भरून काढायसाठी म्हणून त्याला गाण्यासाठी उभं करण्यात आलं. समोर जमा झालेलं बावीस हजार लोकांचं पब्लिक बघून घाबरलेल्या सानूने वेळ मारून नेण्यासाठी किशोर कुमारचं वादा तेरा वादा हे गाणं गायलं. पब्लिकला तुफान आवडलं.

बदली सिंगर इतरांच्या पेक्षा जास्त भाव खाऊन गेला.

इथून सानुला कॉन्फिडन्स आला. किशोर कुमारची गाणी सेम त्याच्या स्टाईलमध्ये आपण गाऊ शकतो हे त्याला कळलं होतं. कलकत्त्यामध्ये सानूच्या किशोरदा नाईट्स फेमस झाल्या. आता आपण खरचं किशोर झालो असं समजून सानूने बंगाली सिनेसृष्टीचे दरवाजे ठोठावायला सुरु केले. पण तिथे त्याला अक्षरशः धक्के मारून हाकलून देण्यात आलं.

सानुने पोटापाण्यासाठी कलकत्त्याच्या एका बार मध्ये नोकरी पकडली. महिना चार हजार पगार होता. पण त्याच स्वप्न सिनेमात गाणी गाण्याचे  होते. पण बंगाली बाबू मोशाय त्याला दाद लागू देत नव्हते. शेवटी एकदा एका बांगलादेशी सिनेमात का होईना त्याने गाणं मिळवलं, ते तिथं सुपरहिटदेखील झालं.

त्यानंतर मात्र सानूने ठरवलं; आता जीवाची मुंबई करायचीच.

साल होतं १९८६. सानू मुंबईला आला. मित्रांच्या बरोबर वाशीला एका हॉस्टेलमध्ये राहिला. तिथून त्याचा खरा स्ट्रगल सुरु  झाला.

बॉलिवूडमध्ये ट्राय करण्या आधी त्याने बार मध्ये नोकरी शोधण्यास सुरवात केली. चेंबूरला आराधना म्हणून हॉटेल होते. तिथे तो गेला. रविवारी संध्याकाळची वेळ होती. त्या हॉटेलचे अशोक सेठ म्हणून मालक होते. सानू थेट त्यांच्या ऑफिसमध्ये घुसला. त्यांनी त्याला खालपासून वर पर्यंत पाहिलं आणि म्हणाले,

“क्या करते हो ?”

सानू म्हणाला

गाता हूं. आपके यहां नोकरी करना चाहता हूं.

अशोक सेठनी त्याला थेट आपल्या हॉटेलच्या बार सेक्शन मध्ये घेऊन गेले. तिथे ऑलरेडी एक बँड होता. शेठजींनी सानुला एक गाणं म्हणायची संधी दिली. त्याने देखील या संधीच सोनं केलं. मौका भी है और दस्तुर भी अस म्हणत सानूने गुलाम अलींची गझल गायली,

“हंगामा क्यूँ है बरपा थोडीसी जो पिली है”

या गाण्याने त्याने मुंबईचं रसिक पब्लिक खिशात टाकलं. पैशांची बरसात झाली. त्या बार मध्ये अस दृश्य या पूर्वी कधी पाहायला मिळालं नव्हतं. त्या गाण्यावर तब्बल १४ हजार रुपये टीप गोळा झाली. अशोक सेठ खुश झाले. त्यांनी कुमार सानुला एकच गोष्ट सांगितलं,

आज तो गाना गाते ही रहो और कल से तुम्हारी नौकरी पक्की है

मुंबई कोणाला उपाशी पोटी झोपू देत नाही हे सानुला खऱ्या अर्थाने पटलं.  या मायानगरीत पाऊल टाकल्या टाकल्या ६ दिवसात त्याचे सगळे आर्थिक प्रश्न सुटले होते. रोज संध्याकाळी गायचं, महिना ४हजार पगार. वरून टीप जी मिळते त्यात १०% वाटा. सानूसाठी म्हणजे ही छप्पर फाड के ऑफर होती. दिवसभर स्टुडिओचे चक्कर काढायचे आणि रात्री खोऱ्याने पैसे कमवायचे.

एकदा असंच फिरता फिरता सानू मुंबईत सुपर कॅसेटच्या ऑफिस मध्ये जाऊन धडकला. तिथे काही काम मिळत का विचारत होता. तेव्हा त्या ऑफिसमध्ये एक सुशील नावाचा मुलगा आला. त्याने नाव विचारलं. सानू म्हणाला, “सानू भट्टाचार्य” हे नाव ऐकून सुशीलला झटका बसला.

त्याने सानुला थेट आपल्या बॉसच्या ऑफिस मध्ये नेलं. ते बॉस म्हणजे टी सिरीजचे मालक गुलशन कुमार.

जय माता दी च्या मंगलमय वातावरणात बसलेले गुलशनजी म्हणाले

“अरे सानू भट्टाचार्यजी आप यहां है और हं आपको कलकत्ता में ढुंढ रहे है !!”

टी सिरीज किशोर कुमार कि आवाज में नावाचं कॅसेट प्रदर्शित करणार होती आणि त्यांना सानू त्यासाठी हवा होता. मुंबईमध्ये सानुला आलेला हा दुसरा सुखद अनुभव. टीसीरिजसाठी त्याने तीन दिवसात किशोर कुमारची ३० गाणी गायली. त्याला गुलशन कुमारने भला मोठा चेक दिला. सानू कडे बँक अकाउंटदेखील नव्हतं. गुलशनजी म्हणाले,

“अकाउंट खोल दो. अब तो बहुत पैसा आनेवाला है.”

ते खरच  ठरलं. एकामागून एक गाणी मिळू लागली. कॅसेट अल्बम वर त्याचं नाव झळकू लागलं. एकदा असच वेस्टर्न आउटडोअर स्टुडिओला गाणी गाण्यासाठी सानू गेला होता. तिथे प्यार मांगा है तुम्हीसे हे गाणं गात असताना त्याला म्युजिक अरेंजरने बाहेर बोलावलं.

तिथे साक्षात गझल सम्राट जगजीत सिंग उभे होते.

या आवाजाच्या जादूने त्यांना थक्क करून सोडलं होतं. ते फक्त भालो आवाज भालो आवाज इतकंच म्हणत होते. जगजितसिंगनी सानुला दुसऱ्या दिवशी एकेठिकाणी भेटायला बोलावलं. सानू तिथे गेला. तो कल्याणजी आनंदजी या सुपरस्टार संगीतकारद्वयीचा बंगला होता.

जगजीतसिंगनी कल्याणजी भाईंना सानूचा आवाज ऐकवला. त्यांनी सानूच्या पाठ थोपटली.

तुम्हारा आवाज जबरदस्त है मगर तुम्हारी टेस्ट पब्लिक के सामने होगी असं सांगितलं.

षण्मुखानंद हॉलमध्ये भरलेल्या पब्लिक समोर सानुने आपला सुप्रसिद्ध किशोर कुमारचा यॉर्डलिंगचा आवाज दाखवला. सिनेमा सृष्टीतले मोठमोठे कलाकार तिथं हजर होते. त्यांनी सानुला डोक्यावर घेतलं. त्या दिवशी सानूचं आयुष्य बदलून गेलं होतं.

ज्यांच्या आवाजात तो गाणी गायचा त्या किशोर कुमार यांच्या मृत्यू नंतर अमिताभ बच्चनच्या जादूगर सिनेमात त्याचा आवाज व्हायची त्याला संधी मिळाली. या सिनेमात कल्याणजी भाईंनी त्याला किशोर कुमारच्या नावावरून नवीन नाव दिले.

“कुमार सानू ”  

कल्याणजी आनंदजी आणि जगजीतसिंह यांच्या मुळे सानुचा मुंबईत दुसरा पुर्नजन्म झाला. पुढे नदीम श्रवण यांच्या सोबत आशिकी नंतर तर त्याने इतिहास घडवला.

आज कुमार सानू जे काही आहे ते मुंबईने दिलेल्या आधारामुळे. याच गावाने त्याला रोजीरोटी मिळवून दिली, स्टारडम दिलं. हिंदी गाण्यांपासून ते मराठी गाण्यांपर्यंत सगळी गाणी सानूने गायली. त्याच्या टॅलेंटच मुंबईत चीझ झालं. मुंबईला आला फेमस झाला म्हणून त्याला एकेकाळी स्टुडिओमधून हाकलणारे बंगाली संगीत दिगदर्शक त्याच्या दारात आठ आठ दिवस वाट बघू लागले.

आज जर त्याचा मुलगा मराठी भाषेवर मुक्ताफळे उधळत असेल तर ते तो बापाला मोठं करणाऱ्या गावाचं उपकार विसरतोय हे नक्की.

हे हि वाच भिडू

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.