कुंभमेळा समाप्तीची घोषणा करण्याचा अधिकार नेमका कोणाला?

मागच्या पंधरा दिवसांपासून कुंभमेळा आणि वाद हे जणू समीकरणचं बनलं होतं. कोरोनाच्या वाढत्या साथीत देखील या कुंभमेळ्याचं आयोजन केल्यामुळे चारी बाजूंनी टिका होतं होती. यात अनेक जण पॉझिटिव्ह देखील सापडले. त्यानंतर अखेर काल निरंजन आखाड्यानं कुंभ समाप्तीची घोषणा केली. त्यानंतर कुंभ समाप्त होईल असं वाटतं असतानाच निरंजन आखाड्याला हा अधिकार नसल्याचं सांगितलं गेलं. त्यावरून बराच वाद देखील झाला.

आज नरेंद्र मोदी यांनी देखील साधूंना कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीनं करण्याचं आवाहन केलं. म्हणजेच त्यांनी थेट आदेश न देता केवळ आवाहन केलं.

त्यामुळे कुंभ समाप्त करण्याच्या घोषणेचा अधिकार नेमका कोणाला आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

निरंजनी आखाड्यानं काय घोषणा केली?

काल निरंजनी आखाड्यानं कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेत कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली. या आखाड्यातील देखील अनेकांना कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्या पार्श्वभुमीवर निरंजनी आखाड्याचे सचिव रवींद्र पुरी यांनी सांगितलं की,

मुख्य शाही स्नानाचा कार्यक्रम संपला आहे. त्यामुळे आमच्यासाठी कुंभमेळा समाप्त झाला आहे.

आनंद आखाड्यानं देखील अशीच भुमिका मांडली. त्यांनी देखील सांगितलं कि निरंजनी आखाड्यासोबत आम्ही देखील १७ तारखेपासून कुंभमेळा संपला असं समजू.

मात्र या दोन आखाड्यांच्या घोषणेनंतर दुसऱ्या वादाला तोंड फुटलं

निर्वाणी अणि अखाड्याचे अध्यक्ष श्रीमहंत धर्मदास महाराज यांनी निरंजनी आखाडयाची घोषणा फोल ठरवत, हा अधिकार त्यांना नसल्याचं स्पष्ट केलं. सोबतच निरंजनी आखाड्याच्या या घोषणेमुळे जगभरात चुकीचा संदेश गेला असल्याचं सांगत त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे असं देखील धर्मदास महाराज म्हणाले

निरंजनी आखाड्याच्या घोषणेनंतर जगभरातील भाविकांना वाटत आहे कि हरिद्वार कुंभ समाप्त झाला पण अजून देखील हा चालू असून रामनवमी आणि चैत्र पौर्णिमा सोबत बाकी स्नान होणं अद्याप बाकी आहे. त्यामुळे कोणताही एक आखाडा निर्णय घेऊन तो जाहीर करू शकत नाही. 

तर श्रीमहंत कृष्णदास महाराज म्हणाले कि कुंभ संपत्तीच्या घोषणेमुळे सनातन धर्माचा अपमान झाला आहे. निरंजनी आणि आनंद आखाड्याच्या संतांनी सांगायला हवं की, त्यांनी कोणत्या अधिकारात हि घोषणा केली आहे. जर निरंजनी आखाड्यानं आपल्या घोषणेबाबद्दल माफी मागितली नाही तर वैष्णव आखाड्यांकडे संबंध तोडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.

श्रीमहंत राजेंद्रदास महाराज म्हणाले कि, वैष्णव आखाड्यांचे मुख्य स्नान अजून बाकी आहे. ते २७ एप्रिल रोजी होणार आहे. त्यांच्याकडून नियमांचं अगदी योग्य पालन केलं जात आहे. आणि राहिली गोष्ट समाप्तीची तर कुंभमेळा कोण्या एका संप्रदायाचा नाही. ३० एप्रिल पर्यंत सरकारनं केलेल्या घोषणेनुसार कुंभमेळा चालू राहणारच आहे. 

तर जगद्गुरु शंकराचार्य यांचे शिष्य आणि स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी घोषणा केली कि कुंभ आपल्या ठरलेल्या वेळेनुसारच म्हणजे ३० एप्रिल पर्यंत पार पडेल आणि संपेल. कुंभ कोण्या एका संस्थेचा किंवा आखाड्याचा नाही.

यातुन २ स्पष्ट अर्थ निघतात. एक म्हणजे एकट्या निरंजनी आखाड्याला कुंभ समाप्त करण्याचा अधिकार नाही, आणि कुंभ ३० एप्रिल पर्यंत चालूच राहणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

हरिद्वारमधील कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जुना आखाडाचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांना कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीनं करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,

“दोन शाही स्नान झाले आहेत आणि कोरोनाच्या संकटामुळे कुंभमेळा आता प्रतिकात्मक पद्धतीने व्हावा. यामुळे संकटाशी लढण्याला ताकद मिळेल”

म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी प्रतीकात्मक कुंभसाठी केवळ आवाहन केलं आहे. त्यांनी कुंभ समाप्त करण्यासाठी कोणतीही घोषणा केली नाही, किंवा तसा आदेश देखील दिलेला नाही. त्यामुळे त्यांना देखील हा अधिकार नसल्याचं दिसून येत. 

मग हा अधिकार असतो कोणाला?

निर्वाणी आखाड्याचे अध्यक्ष श्रीमहंत धर्मदास महाराज यांनी सांगितलेल्या प्रक्रियेनुसार हा अधिकार २ जणांना आहे. एक त्या संबंधित राज्याचे मुख्यमंत्री. आणि दोन कुंभमेळा प्रशासन आणि आखाडा परिषद. 

मुख्यमंत्री या कुंभमेळ्याच्या कालावधीची घोषणा करतात. यानंतर तेच कुंभमेळा सुरु झाल्याचं सांगतात आणि कालावधी संपला कि अधिकृतरित्या तेच कुंभमेळा संपल्याचं जाहीर करतात. त्यानुसार धर्मदास महाराज म्हणाले, ३० एप्रिलला मुख्यमंत्री कुंभ संपल्याची घोषणा करतील.

त्यानंतर म्हणजे आखाडा परिषद. आता हे आखाडा परिषद काय आहे, अगदी सोप्या आणि सुटसुटीत भाषेत सांगायचं आखाडा म्हणजे अनेक साधू-संतांचा मान्यताप्राप्त गट किंवा संस्था.

आपल्या देशात एकूण १३ मान्यता प्राप्त आखाडे आहेत. यात सात शैव, तीन वैष्णव आणि तीन उदासीन (सिक्ख) अखाडे अशी रचना आहे.

सात शैव आखाड्यांमध्ये – जूना आखाडा, निरंजनी आखाडा, महानिर्वाणी आखाडा, आवाहन आखाडा, अटल आखाडा, आनंद आखाडा आणि अग्नि आखाडा. यातील जुना आखाड्यामध्ये किन्नर आखाड्याचा समावेश होतो. आज पंतप्रधान मोदी याच आखाड्यातील आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी बोलले.

तर ३ वैष्णव आखाड्यांमध्ये – दिगंबर आखाडा, निर्वाणी आखाडा, निर्मोही आखाडा यांचा समावेश आहे.

३ उदासीन (सिक्ख) आखाड्यांमध्ये – निर्मोही आखाडा, मोठा उदासीन आखाडा, नवीन उदासीन आखाडा यांचा समावेश आहे.

अशा या १३ आखाड्यांची एक आखाडा परिषद असते. हि परिषद सामुदायिक रित्या कुंभमेळ्यासंबंधीचे सर्व निर्णय घेत असते.

हे हि वाच भिडू.  

Leave A Reply

Your email address will not be published.