त्यादिवशी सेहवागचं बोलण ऐकलं नसत तर बिचाऱ्या अनिल कुंबळेचं शतक झालं असत.

२००८सालचा तो भारताचा कुप्रसिद्ध ऑस्ट्रेलिया दौरा. दोन्ही संघाच्या रायव्हलरीचा हायेस्ट पॉइंट. भारताचा कॅप्टन होता शांत सज्जन अनिल कुंबळे तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता खडूस रिकी पोंटिंग. दोन्ही टीम तगड्या होत्या. सचिन,गांगुली,द्रविड,लक्ष्मण, कुंबळे हे दिग्गज अजून टीममध्ये होते आणि फॉर्ममध्ये होते.

फक्त सेहवाग त्या टीम मध्ये नव्हता. गेली सहा महिने झाले अपेक्षेप्रमाणे कामगिरी होत नसल्यामुळे त्याला बाहेर बसवलेल. पण कुंबळेने सिलेक्टर्सनां सांगितलं की या सिरीजमध्ये काहीही झालं तरी मला सेहवाग संघात हवा. फक्त कॅप्टन रिक्वेस्ट करतोय म्हणून सेहवागला टीमबरोबर ऑस्ट्रेलियाला आणण्यात आलं पण सुरवातीला त्याला प्लेयिंग इलेव्हन मध्ये घेतलं नव्हतं. 

दोन्ही साईडच्या मिडीयाने दौऱ्याच्या आधीच वातावरण तापवून ठेवलेलं. मॅचच्या वेळी सुद्धा जोरात भांडणे झाली. अंपायरींग सुद्धा खराब चालेल. दुसऱ्या कसोटीमध्ये तर हरभजन आणि सायमंड्सच्या वादाने टोक गाठलं. दौरा रद्द होतो की काय अशी वेळ आली होती. पण अखेर काही तर करून वाद शमवण्यात आले. पुढच्या मॅचसाठी अंपायर बदलण्यात आले .

सेहवागला खेळण्याची खूप इच्छा होती. तो खूप दिवस झालं एक चान्स द्या म्हणून कुंबळेच्या मागे मागे फिरायचा. पण सेहवागला खेळवायचं तर  कोणाला बाहेर काढायचं हा प्रश्न कुंबळे पुढे होता. अखेर सिडनी कसोटी मध्ये फेल गेलेल्या युवराजला बाहेर बसवण्यात आलं आणि सेहवागला चान्स मिळाला.

पर्थच्या सुपरफास्ट पीच वर खूप त्वेषाने खेळलेल्या त्या मॅचमध्ये भारताने विजय मिळवला. पण सेहवाग या पण मॅॅॅच मध्ये खूप भारी खेळू शकला नाही. कुंबळेने त्याला अॅडेलेड मध्ये होणाऱ्या पुढच्या मॅचच्या आधी सांगितलं,

“देख विरू ये तेरा आखरी मौका है. इसके आगे मै तेरी कोई हेल्प नही कर सकता.”

भारताने टॉस जिंकून पहिली बॅटिंग स्वीकारली. सेहवागने चांगली सुरवात केली. त्याने ६३ धावा बनवल्या. फॉर्ममध्ये असलेल्या तेंडूलकरने या सिरीजमधलं दुसर दीडशतक साजर केलं आणि आउट झाला. तो पर्यंत भारताच्या ३५९ धावा स्कोरबोर्डवर दिसत होत्या. जास्तीतजास्त ४००चं टार्गेट आपल्याला मिळणार या हिशोबात ऑस्ट्रेलियन टीम होती. पण सचिन आउट झाल्यावर आलेल्या कुंबळेने चिवट लढा सुरूच ठेवला.

त्याने आणि हरभजनने फिफ्टी मारली. पण त्यानंतर लगेच हरभजन आउट झाला. पण कुंबळे आणि अकरा नंबर वर आलेला इशांत शर्मानी इनिंग जिवंत ठेवली. दोघांची पन्नास धावांची पार्टनरशिप झाली होती.

चहाचा ब्रेक झाला तोवर भारताच्या सव्वापाचशे धावा झाल्या होत्या. कुंबळे ८७ वर नॉट आउट होता. दोघेही दमलेले फलंदाज ब्रेकसाठी पव्हेलीयन मध्ये आले. सगळी टीम या दोघांच्या जिगरबाज खेळी साठी कौतुक करत होती. तिथे सेहवाग पण बसला होता. कुंबळे त्याच्या शेजारी चहासाठी आला तेव्हा विरू त्याला म्हणाला,

“अरे अनिल भाई कितना स्लो खेल रहे हो. चौका छक्का लगाव और अपनी सेंच्युरी कम्प्लीट करो. क्या आपको इशांत पे भरवसा है? वो कभीभी आउट हो सकता है.”

कुंबळे काही बोलला नाही. पण त्याच्या पण डोक्यात विचार आला. सेहवाग म्हणतोय ते बरोबर आहे. लवकर लवकर शॉट्स मारून शतक पूर्ण करू.

टीब्रेक संपल्यावर त्याच नादात आणि जोशात कुंबळे ग्राउंडवर आला. समोर होता मिचेल जॉन्सन. त्याने एक थोडासा ऑफ स्ट्म्पच्या बाहेर बॉल टाकला. सेहवागने सोडलेला किडा डोक्यात असलेल्या कुंबळेने ऐटीत कव्हर ड्राईव्ह मारायचा प्रयत्न केला आणि दुर्दैवाने गिलख्रिस्टकडे कॅच देऊन आउट झाला. त्याच शतक थोडक्यात हुकल. यापूर्वी त्याने एकदा शतक मारलेल पण ऑस्ट्रेलियामध्ये आणि अशा प्रेशर सिच्युएश्न मध्ये कप्तान असताना शतक मारण्याची मज्जाच काही और असते.

आता सेहवागला टेन्शन आल. बिचाऱ्याचं कधी नव्हे ते शतक झालं असत पण आपल्यामुळे गंडल. आता आपली टीममधली जागा नक्की जाणार. मग त्याने ठरवलं की आता आपल्याला सिरीयस खेळावं लागेल. पुढच्या इनिंग मध्ये त्याने धडाक्यात १५१ धावा कुटल्या आणि आपली टीम मधली जागा वाचवली.

पण सेहवागची ही खोड कधी मोडली नाही.

त्याचं ऐकून अनेक जण नव्वदपेक्षा जास्त रनवर असताना आउट झाले आहेत, यात सचिन तेंडूलकरचा ही समावेश होतो. त्यानी तर अनेकांना अनुभवाचा सल्ला दिला होता की बॅटिंग करत असताना कधीही सेहवागशी बोलायचं नाही नाही तर तुमच शतक काही होत नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.