पुण्यात CA बनायचं स्वप्न पाहणाऱ्या कुणाल गांजावालाने ‘भिगे होंट तेरे’ गाऊन धमाका केला होता ….

2004 साल होतं. नाईनटीजच्या राड्यारोड्यात अडकलेले नौजवान एकविसाव्या शतकात आले होते. उदित नारायण,अभिजित, कुमार सानु ही दर्दी मंडळी जाऊन नवीन गाणी मार्केटमध्ये येऊ लागली होती. शान, सोनू निगम ,लकी अली आणि केके या चौघांनी रोमँटिक गाण्यांचा धमाका आणला होता. पण या सगळ्यांवर एक आवाज भारी पडला होता जो अजूनही आपल्या कानात दीर्घकाळ रेंगाळतो आणि त्या गायकाच्या गाण्याचा व्हिडिओ लागला रे लागला की आपण आजूबाजूला आधी बघतो कुणी पाहत तर नाहीए ना…

भिगे होंट तेरे प्यासा दिल मेरा
लगे अब्र सा मुझे तन तेरा….

हे गाणं गायलं होतं कुणाल गांजावालाने. त्यावेळी या गाण्याने जो बाजार उठवला होता. 21 शतकात काय धामधूम असणार आहे याचं मार्केट सुरू केलं ते म्हणजे कुणाल गांजावालाच्या आवाजात असलेल्या या भिगे होंट तेरे या गाण्याने. इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांना त्या काळात विविध टॅग लागले खरे व हे गाणं तेव्हाच्या भारत भरातल्या तरुण पोराचं फँटसी गाणं बनलं होतं. त्याला खरा साज चढवला तो म्हणजे कुणाल गांजावालाच्या आवाजाने.

पण इतकं जबऱ्या गाणं इंडस्ट्रीला देऊन अचानक कुणाल गांजावाला गायब कुठं झाला. मराठी इंडस्ट्रीला कुणाल गांजावाला बद्दल अतोनात प्रेम आहे कारण त्याने अजय अतुल सोबत गायलेलं गाणं म्हणजे वाऱ्यावरती गंध पसरला, नाते मनाचे…हे गाणं कित्येक शहरात आलेल्या लोकांचं आवडतं गाणं बनलं. अजूनही काही खंडेराव हे गाणं गावाकडे एसटीतुन परतताना खिडकीतून डोकं बाहेर काढून शांतपणे प्रवास अनुभवतात,गावाच्या आठवणीने आतून चिंब होऊन जातात. ही जादू आहे कुणाल गांजावालाच्या आवाजाची.

कुणाल गांजावाला मूळचा महाराष्ट्रतला. 1972 साली पुण्यात त्याचा जन्म झाला. खरतर आपल्याला गायक बनायचंय हे त्याच्या मनिध्यानी सुद्धा नव्हतं त्याला बनायचं होतं सीए. पण पहिल्यांदा कॉलेजमध्ये एका फंक्शनला त्याला स्टेजवर गायला लावलं आणि लोकांकडून चांगली दाद त्याला मिळाली. यानंतर बरेच फंक्शन त्याने गाजवले आणि भरपूर बक्षीस मिळवले.

कुणाल गांजावाला म्युझिक शो सारेगमपाच्या पहिल्या सीझनमध्ये दिसला होता. शो नंतर तो म्युझिक डिरेक्टर रंजित बरोटसोबत जोडला गेला आणि संगीतातल्या बारीकसारीक गोष्टी शिकू लागला. 2002 साली बॉलिवूडमध्ये कुणाल गांजावालाला पहिला ब्रेक मिळाला तो अब के बरसया सिनेमातून व हा सिनेमा आणि त्यातले गाणे काय चालले नाही. यानंतर साथीया सिनेमातील ओ हमदम सुनियो रे गायलं या गाण्याने कुणाल गांजावालाला रातोरात सुपरस्टार बनवलं.

2004 मध्ये मर्डर सिनेमा आला आणि भिगे होंट गाणं आलं आणि त्या वर्षीचे बेस्ट सिंगरचे सगळे अवॉर्डस त्याला मिळाले होते.

आता सध्या कुणाल गांजावाला कुठे आहे ?

एका इंटरव्ह्यूमध्ये कुणाल गांजावालाने रेकॉर्डस् लेबल्सवर गंभीर आरोप केले होते की ज्यामुळे सिंगर लोकांचं मोठं नुकसान होत आहे. रेकॉर्डस् लेबल्स गाणं गाऊन घेतात पण सिंगर लोकांचं पेमेंट लटकावून ठेवतात असे आरोप त्याने केले होते.

गायकीमध्ये कुणाल गांजावालाला ना पैसे मिळत होते ना गाणे म्हणून त्याने स्वतःचा व्यवसाय करायचं ठरवलं आणि एक यू ट्यूब चॅनल सुरू केलं ज्यावर तो आपले गाणे टाकत असतो.बऱ्याच लोकांची इच्छा आहे की कुणाल गांजावालाला भिगे होंट तेरे सारखं भारी गाणं मिळावं आणि तो परत बॉलिवूडमध्ये परतावा.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.