ब्रिटीश सरकार जीव तोडून कवी कुसुमाग्रजांना शोधत राहिली..

कुसुमाग्रजांचा जन्म नाशिकचा. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. पण घरात सगळे त्यांना तात्या म्हणायचे. पुढे तात्याचं तात्यासाहेब झालं.

त्यांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, तात्यासाहेबांचे बालपण येथेच गेले. त्यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती,

एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी काव्यलिखाणासाठी धारण केले. 

तात्यासाहेबांचं शिक्षण नाशिकच्या हं. प्रा. ठाकरसी महाविद्यालयात झालं. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांचा ओढा लिखाणाकडे होता. त्याकाळी रत्नाकर मासिकात त्यांच्या कविता छापून यायच्या. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली होती.

स्वातंत्र्यलढ्याच्या आंदोलनांनी भारावलेला हा काळ. देशभरातील तरुण कोणत्या ना कोणत्या रूपात या लढ्याशी जोडले जात होते. याच्या सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक चळवळ देखील जोर पकडत होती. चवदार तळ्याच्या आंदोलनानंतर त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन सुरु केले होते.

कॉलेजमध्ये असलेल्या तात्यासाहेबांनी आपल्या मित्रांसह या काळाराम मंदिराच्या आंदोलनात भाग घेतला. क्रांतीची खुमखुमी त्यांच्यात सुरवातीपासून होती. त्याकाळातल्या अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढे देखील त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.   

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी वगैरे शोधण्याच्या फंद्यात न पडता काही काळ त्यांनी सिनेमाच्या पटकथा लिहिणे, त्यात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. मात्र यात अपयश आल्यामुळे अखेर पत्रकारिता क्षेत्रात उडी घेतली.

१९३८ ते १९४६ या काळात त्यांनी सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी या वर्तमानपत्रे, साप्ताहिकात पत्रकार म्हणून काम केलं. याच काळातली गोष्ट.  

ते वर्ष होतं १९४२. भारतात चले जावं आंदोलनाने पेट घेतला होता. इंग्रज सरकारने देशातील सर्व मोठ्या नेत्यांची धरपकड केली होती. कोणीही मोठा नेता नसताना जनतेने हे आंदोलन आपल्या शिरावर घेऊन आपल्या पद्धतीने चालवलं होतं. देशाच्या कानाकोपऱ्यात हि आंदोलने होत होती.

तात्यासाहेब तेव्हा पुण्याच्या दैनिक प्रभात मध्ये उपसंपादक होते. अजून त्यांचं लग्न झालं नव्हतं. रात्रपाळी झाल्यावर त्याच ऑफिसमध्ये फाईलींची उशी करून झोपणाऱ्या शिरवाडकरांचा हा संघर्षाचा काळ होता.

आपल्या आसपास इंग्रजांच्या विरुद्ध एवढं मोठं आंदोलन पेटलंय आणि आपण बातम्यांच्या कंटाळवाण्या गोष्टी प्रसारित करण्यापुरते उरलोय याची खंत त्यांना कायम वाटत असायची. कविता हे त्यांचं पहिलं प्रेम होतं. क्रांतीची प्रेरणा त्यांना शांत बसू देत नव्हती.

याच मनाच्या घुसमटीतून त्यांनी समोर पडलेल्या कागदावर एक कविता लिहिली,

कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटता प्रेते
उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

फक्त कविता लिहिलीच नाही तर कुसुमाग्रज हे टोपणनाव वापरून दैनिक प्रभातमध्ये छापून देखील आणली.

दुसऱ्या दिवशी प्रभात जेव्हा घराघरात पोहचला तेव्हा पुण्यात खळबळ उडाली. थेट इंग्रज सरकार विरुद्ध क्रांतीची ललकारी देणारी ही जहाल कविता तरुणाईत प्रचंड गाजली. पोलिसांच्या पर्यंत जेव्हा या कवितेची बातमी पोहचली तेव्हा त्यांचे धाबे दणाणले. या कवितेच्या निर्मात्याचा शोध घेत इंग्रज पोलीस दैनिक प्रभातच्या ऑफिस मध्ये येऊन धडकले.

कोण आहे हा कुसुमाग्रज? विचारणा सुरू झाली.

प्रभातच्या कार्यालयात काम करणा-या एकूण सर्व कर्मचाऱ्यांच्या नावाचे रजिस्ट्रर पुण्याच्या पोलीस प्रमुखाने तपासले, पण त्या रजिस्ट्ररमध्ये कुसुमाग्रज हे नाव कुठेच नव्हते. कारण रजिस्ट्ररमध्ये त्यांच नाव लिहिले होते, वि. वा. शिरवाडकर. पोलिसी खाक्या दाखवत दरडावून कोण कुसुमाग्रज असे विचारले. पण साळसूदपणाचा आव आणत सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांनाच कुसुमाग्रज कोण हा प्रश्न विचारला.

पोलीस हात हलवत परत गेले.

फक्त त्या दिवशी प्रभातच्या ऑफिसमध्येच नाही तर संपूर्ण पुण्यात हा कुसुमाग्रज कोण ही चर्चा सुरु होती.

या कवितेच्या यशामुळे तात्यासाहेबांना आत्मविश्वास आला. त्यांनी विशाखा हा आपला पहिला काव्यसंग्रह त्याच वर्षी प्रसिद्ध केला. त्यावर रसिकांच्या प्रचंड उद्या पडल्या. पहिल्या तीन महिन्यात विशाखाच्या सहा आवृत्त्या निघाल्या. मराठीत असा विक्रम करणारा हा एकमेव कविता संग्रह असावा.

साहित्याने प्रत्यक्ष क्रांती होत नसली तरी, क्रांती ही साहित्याची प्रेरणा होऊ शकते हे कुसुमाग्रजांचे शब्द आजही खरे ठरतात.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.