कुतुबमिनार, विष्णूस्तंभ की सन टॉवर, “टॉप टू बॉटम” समजून घ्या हा वाद आहे तरी काय.?

मशिदींतुन येणाऱ्या आवाजावरून मुद्दा सुरु झाला तो आता मशिदीच्या अस्तित्वावर येऊन ठेपला आहे. देशातील मोठ्या आणि प्रसिद्ध मशिदींच्या दारात बुलडोजर आणून उभं करत राजकारण सुरु झालंय. काशीतील ज्ञानवापी मशीद झाली की मथुरेतील ईदगाह मशिदी समोर आली.

हा मुद्दा हळूच मुस्लिम वास्तूंवर गेल्याचं दिसलं जेव्हा आग्र्याच्या ताज महालाचा वाद समोर आला. 

सगळ्या वास्तूंशी हिंदू संबंध दाखवत उत्खननाची मागणी करणाऱ्या याचिका कोर्टाच्या रांगेत उभा असलेल्या दिसत आहेत. आता यात अजून एक नाव सामील होताना दिसतंय. ते म्हणजे दिल्लीतील कुतुबमिनार. 

कुतुबमिनारचं नाव बदलून ते ‘विष्णूस्तंभ’ असं करण्यात यावं, ही मागणी करण्यात आली होती तेव्हा वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर यात अनेक दावे-प्रतिदावे झाले. मात्र आता एक नवीन दावा समोर आला आहे, ज्याने राजकीय वादंग निर्माण होणार असं दिसतंय.

हा दावा म्हणजेच कुतुबमिनार सन टॉवर आहे.

आता या नवीन दाव्याची काय पार्श्वभूमी आहे? तो कुणी केलाय? आणि याने वातावरण कसं तापू शकतं? हे जाणून घेण्यासाठी आधी कुतुबमिनारचा संपूर्ण वाद माहिती असायला हवा. म्हणून संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊ…

सुरुवात करूया कुतुबमिनारच्या सध्या ज्ञात असलेल्या इतिहासापासून. 

कुतुबमिनार बांधण्याचं श्रेय कुतुबुद्दीन ऐबकला दिलं जातं. कुतुबुद्दीन हा मुहम्मद घौरीचा सेनापती होता ज्याने पृथ्वीराज चौहानचा पराभव केला. त्याच्या हातात दिल्ली आणि अजमेरची देऊन घौरी परतला होता. कुतुबुद्दीनने कुतुबमिनारचं बांधकाम सुरु केलं. ११९९ ते १२२० हा कुतुबमिनारच्या उभारणीचा कालखंड मानला जातो. 

बांधकाम कुतुबुद्दीन ऐबकने सुरू केलं मात्र तेव्हा ते पूर्ण झालं नाही म्हणून कुतुबुद्दीनचा उत्तराधिकारी इल्तुतमिशने बांधकाम पूर्ण केलं. 

पुढे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीने जेव्हा कुतुबमिनाला हानी पोहोचली तेव्हा अनेक शासकांनी त्याची गरजेनुसार डागडुची केली. जसं की, १५०५ मध्ये सिकंदर लोधीने त्याच्या वरच्या दोन मजल्यांचा विस्तार केला. तर १८१४ मध्ये ब्रिटिश-भारतीय सैन्याच्या मेजर रॉबर्ट स्मिथने त्याची दुरुस्ती केली.

प्रश्न येतो त्याच्या नावाचा.

कुतुबुद्दीनने बांधलं म्हणून त्याचं नाव कुतुबमिनार पडलं असं सांगितलं जातं तर काही ठिकाणी प्रसिद्ध मुस्लिम सूफी संत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या नावावर त्याचं नाव पडलं, असाही दावा काही जण करतात. मात्र कुतुबमिनारचं नाव नक्की कसं पडलं याचे ठोस पुरावे कुठेच सापडत नाहीत. 

सुमारे २३८ फूट उंचीचा हा दगडी स्तंभ आज हे कुतुबमिनार दक्षिण दिल्लीच्या मेहरौली भागात आहे. जयला भारतातील सगळ्यात उंच दगडी स्तंभ म्हटलं जातं. त्याच्या आजूबाजूला इतर अनेक स्मारक आहेत म्हणून या संपूर्ण संकुलाला कुतुब मिनार कॉम्प्लेक्स असं म्हणतात. 

भारताच्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये त्याचं मोठं योगदान असून सुमारे ३० लाख पर्यटक दरवर्षी या वास्तूला भेट देतात. 

मात्र कुतुबमिनारचा हा सगळा इतिहास खरा नाहीये, यावरून नेहमीच कुतुबमिनार वादग्रस्त राहिलेलं आहे. सध्या देखील त्याच्या बांधणीच्या इतिहासावरूनच वाद निर्माण झाला आहे. ज्याची सुरुवात झाली एप्रिलमध्ये. 

एप्रिलमध्ये, राष्ट्रीय संग्रहालय प्राधिकरणाने ASI ला कुतुबमिनार परिसरातील गणेशजींच्या दोन मूर्ती काढण्यात याव्या आणि त्यांना राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्याची मागणी केली. मात्र ASI ने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने वाद कोर्टापर्यंत पोहोचला. तेव्हा या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत मूर्ती संकुलातून हटवू नये, असे आदेश दिल्ली न्यायालयाने दिले.

या प्रकरणात मग विश्व हिंदू परिषद आली.

त्यांच्या दाव्याने तर डायरेक्ट कुतुबमिनारच्या ओळखीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘कुतुबमिनार हा खरंतर विष्णूस्तंभ’ असल्याचा दावा परिषदेने केला आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी दावा केला की, हिंदू शासकांच्या काळात भगवान विष्णूच्या मंदिरावर ही ऐतिहासिक वास्तू बांधण्यात आली होती.

प्रत्यक्षात तो विष्णू मंदिरावर बांधलेला विष्णूस्तंभ होता.

कुतुबमिनारची निर्मिती मुस्लिम शासकांनी नाही तर हिंदू राज्यकर्त्यांनी केली होती. मात्र जेव्हा मुस्लिम शासक इथे आले तेव्हा त्यांनी २७ हिंदू आणि जैन मंदिरं पाडली आणि त्याचे काही भाग पुन्हा बांधले. आणि त्याचं नामकरण ‘कुव्वत-उल-इस्लाम मशीद’ असं करण्यात आलं.

याचा दावा याच परिसरातील एका शिलालेखाच्या आणि काही मूर्तींच्या आधारे केला जातो. हा शिलालेख आजही इथे कायम आहे.

म्हणून हा मूलथः ‘विष्णूस्तंभ’ असल्याने त्याचं नाव बदलावं आणि इथल्या २७ मंदिरांचं पुनर्निर्माण करावं, इथे हिंदू धर्मियांच्या देवाचं वास्तव्य असल्याने पुन्हा मूर्ती स्थापन करून पूजेला परवानगी द्यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

तर त्याला ‘विष्णूस्तंभ’ असं नाव देण्यात यावं अशी मागणी करत काही हिंदुत्त्ववादी संघटनानी दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच १० मे रोजी या परिसरात आंदोलन आणि हनुमान चालिसा पठण केली होती. याचक्षणी मूळ वातावरण तापलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी कुतुबमिनार परिसरातील सुरक्षा बंदोबस्त वाढवला.

या परिसरातील कुव्वत-उल-इस्लाम मशिदींच्या भिंतींना लागूनच काही गणेशमूर्ती आजही दिसतात. मात्र या गणपतीच्या मूर्ती उलट्या असल्याने त्यांचाही जीर्मोध्दार करावा,अशी मागणी करून हिंदू संघटनांनी रोष व्यक्त केला आहे. 

यासंदर्भात युनायटेड हिंदू फ्रंटनेही याच दाव्याला दुजोरा देणारी याचिका दाखल केली आहे.

कुतुबमिनार वाद प्रकरणी दिल्ली साकेत कोर्टात सुनावणी सुरू आहे.

कुतुबमिनारमध्ये हिंदू बाजूने पूजा करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर एएसआयने साकेत कोर्टात दाखल केलेल्या उत्तरात म्हटलं आहे की, कुतुबमिनार हे एक स्मारक आहे आणि इथे पूजेला परवानगी दिली जाऊ शकत नाही. कुतुबमिनार संरक्षणात घेतल्यापासून इथे पूजा होत नव्हती. अशा परिस्थितीत हिंदू बाजूच्या याचिका कायदेशीरदृष्ट्या वैध नाहीत. कुतुबमिनारची ओळख बदलली जाऊ शकत नाही.

यावर हिंदू पक्षाकडून अयोध्या प्रकरणाचा दाखला देण्यात आला. हिंदू पक्षाकडून बाजू मांडणारे वकील हरीशंकर जैन आणि रंजना अग्निहोत्री म्हणले की, अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेही देवी-देवता नेहमी उपस्थित असतात, असं म्हटलं होतं.  त्यांचं पूर्ण विधिवत विसर्जन होईपर्यंत ते तिथेच वास्तव्यास असतात. अयोध्या निकालातील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानेही हे मान्य केल्याचं वकिलांनी सांगितलं.

त्यावर साकेत कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी न्यायाधीश म्हणाले की, जर देवदेवतांचे अस्तित्व ८०० वर्षे पूजेविनाच असेल तर तसंच राहू द्यावं. तरी यावर ९ जून रोजी निकाल येणार आहे. शिवाय हिंदू मूर्तींच्या याचिकेवर न्यायालयाने म्हटलं की, तिथे काही अवशेष असले तरी ते जतन करण्याचा आदेश आहे. 

तर दुसरीकडे कुतुबमिनारच्या मुघल मशिदीत गेल्या अनेक दशकांपासून नमाज पठण होत आहे मात्र हा वाद पुढे आल्यापासून १३ मे पासून एएसआयने तिथे नमाज बंद केली आहे, असा आरोप कुतुबमिनारच्या मशिदीच्या मौलानांनी केला होता. मौलानांनी वक्फ बोर्ड, दिल्ली पोलिस आणि इतर अनेकांना नमाज पुन्हा सुरू करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. नमाज लवकर सुरू झाली नाही, तर न्यायालयात दाद मागू, असं त्यांचं म्हणणं आहे.

मात्र यालाही एएसआयने हिंदूंच्या पूजेच्या याचिकेला दिलेलं उत्तर लागू होतं. एएसआयने सांगितलं की, कुतुबमिनारला १९१४ मध्ये संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं आहे. पुरातत्व संरक्षण अधिनियम १९५८ अंतर्गंत, संरक्षित स्मारकात फक्त पर्यटकांना परवानगी आहे. कोणत्याही धार्मिक कार्यांना नाही, असं पुरातत्व विभागाने म्हटलं आहे.

दरम्यान मिनारच्या परिसरात उत्खननाची मागणी देखील करण्यात आली आहे मात्र न्यायालयाने अजून तसा आदेश दिला नाहीये.

असा हा संपूर्ण वाद सुरु असताना आता यात भर पडली आहे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या एका माजी अधिकाऱ्यानं कुतुबमिनारबाबत केलेल्या धक्कादायक वक्तव्याची.

एएसआयचे माजी प्रादेशिक संचालक धर्मवीर शर्मा यांनी दावा केला आहे की, कुतुब मिनार हा राजा विक्रमादित्य याने बांधला होता.

पाचव्या शतकात राजा विक्रमादित्य याने सूर्याची दिशा कशी बदलते, हे पाहण्यासाठी कुतुबमिनार बांधला होता. म्हणून तो २५ इंच झुकलेला आहे. २१ जूनला सूर्य आकाशात आपली जागा बदलतो, तेव्हाही कुतुबमिनारची सावली त्या जागेवर अर्धा तास पडत नाही. हे एक विज्ञान आणि पुरातत्त्व तथ्य आहे.  यासंदर्भात त्यांच्याकडे भरपूर पुरावे असल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे. 

कुतुबमिनार ही संपूर्णपणे वेगळी इमारत आहे. जवळच्या मशिदींशी त्याचा काही संबंध नाही. कुतुबमिनारचा दरवाजा उत्तरेला आहे, तो रात्रीच्या वेळी ध्रुवीय तारे पाहण्यासाठी तयार करण्यात आला होता, असाही दावा शर्मा यांनी केला आहे.

शर्मा यांनी नुकताच केलेला दावा इतरांनी केलेल्या दाव्यांच्या अगदीच विरुद्ध आहे. त्याचमुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.