अवकाळीने बाजार उठवला होता. आता हिवाळ्यात छळायला ‘ला निना’ आलंय.

आता ऑक्टोबर सुरु झालाय. पुढचा महिना नोव्हेंबर, आणि मग लागलीच थंडीचे दिवस. म्हणून म्हंटल दुकानात जाऊन स्वेटर घेऊन येऊ. मग काय पुण्याच्या लक्ष्मीरोड वरच्या एका दुकानात गेलो. तर तिथं एक पाटी लावली होती. पाटीवर लिहिलं होत,

आमच्याकडे स्वेटरला प्लास्टिक लावून मिळेल. 

अहो आश्चर्यम या थाटात मी दुकानदाराला विचारलं, भाऊ असं का लिहिलंय ते. त्यावर दुकानदार उत्तरला, साहेब

ला निना आलाय, ला निना..

निना गुप्ता ऐकलं होत गड्या, हे ला निना काय आहे ? तुम्हाला ही माहित नसेल भिडू तर हे वाचायलाच लागतंय.

तर ला निना हे अचानक येणारी गोष्ट नाही तर दरवर्षी येणारी गोष्ट आहे. नैऋत्य मोसमी पावसाने अद्याप देशातून निरोप घेतलेला नसतानाच प्रशांत महासागरात ला निना स्थिती निर्माण झालीय.

ला निना हा स्पॅनिश शब्द असून लहान मुलगी असा त्याचा अर्थ आहे. पूर्व प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान नेहमीपेक्षा जास्त थंड होणं म्हणजे ला निना स्थिती. ला निना स्थिती असताना विषुववृत्तीय पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा ३ ते ५ अंश सेल्सियसने कमी असतं. या थंड पाण्यामुळे पूर्व प्रशांत महासागरावर जास्त दाब तयार होतो. अल निनोमध्ये नेमकी याच्या उलट स्थिती असते.

परिणामी भारतात सातत्याने ढगाळ हवामान, गारपीट, अवकाळी पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते. यामुळे यंदाचा हिवाळा हिव’साळा’ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

ही ला निना ब्याद किती दिवस असणारे भारतात..

तर अमेरिकेच्या नॅशनल क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरच्या अहवालानुसार मध्य विषुववृत्तीय प्रशांत महासागरात ला निना स्थिती निर्माण झाली आहे. सद्य:स्थिती पाहता डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत ला निना स्थिती राहण्याची शक्यता ८७ टक्के आहे. मार्च-एप्रिलमध्येही ला निनाला अनुकूल स्थिती राहील.

फेब्रुवारी २०२२ पर्यंत भारतात सततच ढगाळ हवामान राहून अवकाळी पाऊस, गारपिट होण्याची शक्यता आहे. दर महिन्याला अवकाळी पाऊस, जानेवारी-फेब्रुवारीत गारपिटीची शक्यता असून हिवाळा सौम्य राहील. मार्चनंतरही ला निना स्थिती अनुकूल राहिली तर उन्हाळाही सौम्य राहील. मान्सूनपूर्व काळात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आधी गति आलं, मग निवार, बुरेवी, तौकते, अम्फान, निसर्ग आणि आता मागोमाग ला निना अशी चक्रीवादळांची रांगच लागलीय. राज्यातील बहुतांश भागांत सप्टेंबरमध्ये मान्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला, त्याचा फटका काढणीला आलेल्या खरिपाच्या पिकांना बसला. मान्सूनने राज्यातून निरोप घेतला असला तरी दक्षिण भारतात नैऋत्य मान्सून अद्याप सक्रिय आहे. त्यामुळे रब्बीचा पेरा लांबण्याची शक्यता आहे.

आता दर महिन्याला एक-दोन अवकाळी पाऊस होण्याची शक्यता यामुळे लोकांच कंबरडं मोडणार आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.