घाणेकर, लागूंनी नाकारलेला सखाराम बाईंडर निळूभाऊंनी अजरामर केला….
निळकंठ कृष्णाजी फुले म्हणजे आपले सगळ्यांचे आवडते निळूभाऊ. आपल्या अभिनयाच्या जोरावर निळूभाऊंनी महाराष्ट्रातल्या घराघरात नाव कमावलं होतं. त्यांच्या खलनायकी भूमिकेमुळे बायका त्यांच्या नावाने बोटं मोडायच्या, शिव्या घालायच्या हीच निळूभाऊंच्या कामाची पावती होती. सिनेमात येण्याआधी निळूभाऊंनी नाटकाच्या माध्यमातून महाराष्ट्र गाजवला होता.
नाटकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने अशी वचक बसवली होती कि त्यांच्या एंट्रीशिवाय नाटकाला रंग चढत नसायचा. असंच एक नाटक मराठी नाट्यसृष्टीत भयंकर वळण आणणारं होतं सखाराम बाईंडर. नाटकाचे लेखक होते विजय तेंडुलकर.
विजय तेंडुलकरांच्या लेखणीतून हा भन्नाट सखाराम अवतरला होता. वाईमधल्या एका खानावळीत ओरिजनल सखाराम तेंडुलकरांना भेटला होता त्याची बोलण्याचालण्याची पद्धत आणि एकदम खरं बाण्याची त्याची विशिष्ट स्टाईल बघून तेंडुलकरांनी या सखाराम पात्राला समोर ठेवून नाटक लिहिलं.
नाटक लिहून झालं होतं. कमलाकर सारंग हे नाटक दिग्दर्शित करणार होते. हे नाटक श्रीराम लागू किंवा काशिनाथ घाणेकर या दोघांपैकी कोणीतरी करावं अशी लेखक-दिग्दर्शकाची इच्छा होती. कारण लागूंसोबतच्या झालेल्या चर्चेत विजय तेंडुलकरांना या सखाराम पात्राचा धागा मिळाला होता.
लागूंनी दुसऱ्या नाटकाचे प्रयोग आहेत म्हणून सखाराम बाईंडरला नकार कळवला तर दुसरीकडे काशिनाथ घाणेकर हे सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी जमणार नाही असं सांगितलं.
आता प्रश्न होता सखाराम बाईंडरची भूमिका कोण करणार ? त्याकाळात निळूभाऊंनी साकारलेला झेले अण्णा प्रसिद्ध झालेला होता. शेवटी निळू फुलेंचं नाव सखारामसाठी फिक्स झालं.
निळूभाऊंना सुरवातीला हे पात्र नक्की काय आहे हेच समजत नव्हतं, विजय तेंडुलकरांचे विशिष्ट लयीतले संवाद या सगळ्यांमुळे निळूभाऊ गोंधळून गेले. शेवटी त्यांनी तेंडुलकरांशी चर्चा करून हे पात्र जगण्याच्या चौकटीत न बसणारं पण खरं बोलणारं आहे हे समजून घेतलं.
नाटकाचे प्रयोग सुरु झाले आणि सुरवातीला निळूभाऊंनी नाटकाचा जो ग्राफ उंचावर नेला तो बघून प्रेक्षक प्रचंड दाद देऊ लागले. या नाटकातले संवाद निळूभाऊंनी उत्तमरीत्या वठवलें. सखाराम बाईंडर म्हणजे निळूभाऊ हे समीकरण एकदम फिट्ट झालं होतं.
गांजा म्हणजे काय घरंदाजांची रखेल वाटली कि काय ? सगळा मामला गुपचूप….!
हा राजाचा महाल नव्हे सखाराम बाईंडरचं घरये
अशा बहारदार आणि खोचक ओळींनी नाटकाला हळूहळू प्रसिद्ध व्हायला आणि विरोध व्हायला सुरवात झाली. अनेक ठिकाणी या नाटकाचे प्रयोग बंद पाडण्यात आले. काही काळानंतर सुरूही करण्यात आले.
सखाराम बाईंडरचा मंचावरचा प्रवेश आणि त्यानंतर निळूभाऊंनी चालणारी संवाद मालिका हे नाटकाचं मोठं यश मानलं गेलं. विजय तेंडुलकरसुद्धा अशाच सखारामच्या शोधात होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खुद्द सखाराम बाईंडर पाहायला आले होते. निळूभाऊंचा अभिनय बघून ते सुद्धा खुश झाले होते.
फक्त नाटकच नाही तर सिनेमांमध्ये सुद्धा निळूभाऊंसारखा खलनायक साकारणं कोणाला जमलं नाही. बर्लिनच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये लोकांनी उभं राहून निळूभाऊंना मानवंदना दिली होती. सामना, सिंहासन, एक गाव बारा भानगडी अशा अनेक सिनेमांमधून निळूभाऊंनी आपल्या अभिनयाचं नाणं दाखवून दिलं होतं.
मराठी नाटकांमध्ये टॉपच्या भूमिकामध्ये निळूभाऊंनी साकारलेला सखाराम बाईंडर हा कायम वरच्या रांगेत असतो. निळूभाऊ गेल्यानंतर पुढे सयाजी शिंदे, चिन्मयी सुमित आणि सोनाली कुलकर्णी यांनी हे नाटक जोमाने पुढे चालू ठेवलं होतं.
निळूभाऊंनी साकारलेला सखाराम बाईंडर या नाटकाचा फक्त एक दीड मिनिटांचा भाग युट्यूबवर आहे. मात्र ज्या लोकांना हे नाटक बघण्याचं भाग्य मिळालं ते विशेष होतं. लागूंनी आणि घाणेकरांनी नाकारलेला सखाराम बाईंडर निळूभाऊंनी इतका मोठा केला कि ते पात्र अमर आणि आयकॉनिक पात्र म्हणून ओळखलं गेलं.
हे हि वाच भिडू :
- पत्रकार म्हणाला, ‘हे काहीतरी भयंकर नाटक आहे, नाटकातली महिला स्टेजवर साडी बदलते वैगरे’
- ४१ वर्ष झाली तरिही “सिंहासन” सारखा राजकीय सिनेमा करणं कोणाला जमलेलं नाहीए
- फिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.
- आणि बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये निळू फुलेंना लोकांनी उभे राहून मानवंदना दिली..