लोहगडाचे ‘लखीशाह बंजारा’ आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.

बंजारा समाज म्हणजे पाठीवर संसार घेऊन वणवण भटकत आपला चरितार्थ चालवणारा समाज. पण एकेकाळी याच समाजातील एक माणूस अख्ख्या आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होता.

लख्खीराय बंजारा!

लख्खी राय बंजारा यांचा जन्म 1580 साली सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील मुजफ्फरनगर येथे झाला. अकबराच्या काळापासून त्यांचे कुटुंब मुघल सैन्याला सप्लाय पुरवत होते.

लख्खी राय यांनी हा व्यापार प्रचंड वाढवला. विशेषतः कापूस, चुना पावडर आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड या गोष्टी ते मुघलांना पुरवायचे.

मध्य आशियातून भारतात होणारा व्यापार लखीराय यांच्या माध्यमातून व्हायचा.

त्यांच्याकडे 4 तांडे होते. प्रत्येक तांड्यामध्ये 5 हजार बैल गाड्या आणि रक्षणासाठी 1 लाख सैन्य होतं. लाखो गाई म्हैशी, खेचर, घोडे, हत्ती यांच्या तांड्यात होते.

हे तांडे एखाद्या शहरापेक्षा मोठे असायचे. या लाखो जणांचं पोट लखी राय यांच्यावर अवलंबून होतं.

लख्खीराय यांचा तांडा ज्या भागातून फिरायचा तेथे रस्ता तयार व्हायचा. याच व्यापारी प्रवासात त्यांनी उत्तर भारतात शेकडो तळी, विहिरि बांधल्या. धर्मशाळा उभारल्या. किल्ले बांधले.

दिल्लीमधल्या सुप्रसिद्ध लाल किल्ल्याच्या बांधकामाचे ते मुख्य कंत्राटदार होते.

दिल्ली शहरातील मालदा, रायसीना, बहारखंबा आणि नरेला ही चार गावे मुघलांनी त्यांना बक्षीस दिली होती. लखीराय यांची संपत्ती एवढी प्रचंड होती की त्यांच्या एवढा मोठा व्यापारी त्याकाळात जगभरात कोणी नसावा.

शहाजहान आणि औरंगजेब यांच्या दरबारात लख्खी शाह म्हणून त्यांना मान मिळायचा.

जगातला सर्वात मोठा किल्ला म्हणून ओळखला जाणारा हरियानाचा लोहगड किल्ला देखील त्यांचाच अधिपत्याखाली होता. हाच लोहगड किल्ला शिख साम्राज्याचा मुख्य कणा म्हणून ओळखला गेला.

लखीशाह बंजारा यांच्या कुटुंबाने पहिले गुरू नानक यांच्या प्रभावातून शीख धर्माचरण सुरू केले होते.

लोहगडच्या आसपास त्यांनी 80 शीख गावे वसवली. शस्त्रास्त्रांचे कारखाने उभारले. अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांच्या मुघल साम्राज्यात असलेल्या वजनामुळे औरंगजेब बादशाहच्या कट्टर सैनिकांनाही तिथे काही गोंधळ घालता येत नव्हते.

याचंच उपयोग महान शीख योद्धा बंदासिंग बहादूर यांनी करून घेतला आणि खालसा साम्राज्याची पहिली राजधानी लोहगड येथे उभा केली.

जेव्हा शिखांचे गुरू तेग बहादूर यांची औरंगजेबाने दिल्लीच्या चांदणी चौकात शीर कापून हत्या केली तेव्हा 90 वर्षांचे लखीराय व त्यांचं सैन्य मुघलांवर चालून गेलं.

लखीराय यांच्या सैन्याने पराक्रम करून मुघलांना पळवून लावलं आणि तेग बहादूर यांच्या शरीराची विटंबना होण्या पासून रोखलं. लखी राय यांनी गुरूंच शीर भाई जगजीवन राम याना सोपवलं तर धड रायसीना या गावात नेलं.

लखीशाह यांनी व त्यांच्या मुलांनी गुरू तेग बहादूर यांचे पार्थिव आपल्या स्वतःच्या घरात ठेवलं आणि अख्ख घर पेटवून त्यांचे अंत्यसंस्कार पार पाडले.

पुढे याच जागेवर गुरू साहिब हा गुरुद्वारा उभा करण्यात आला.

वयाच्या शंभराव्या वर्षी लखीराय बंजारा यांचे निधन झाले. त्यांच्या मुलांनी हा शीख धर्मप्रसाराचा वसा पुढे नेला. दहावे व शेवटचे शीख गुरू गोविंदसिंह यांची त्यांनी शेवटपर्यंत साथ दिली.

आनंदपूर येथे झालेल्या युद्धात लखीशाह बंजारा यांचे तीनही सुपुत्र गुरू गोविंद सिंह यांच्या सोबत लढले व शहीद झाले.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. विजय ख.राठोड says

    खुपच छान माहिती मिळते

Leave A Reply

Your email address will not be published.