लॅक्मे नव्हे लक्ष्मी. नेहरुंनी सांगितलं, टाटांनी बनवलं

“आम्हा भारतीयांना ना स्वदेशीची किंमतच नाही. आता हे करीना कपूरसारखे सेलिब्रिटी भारतीय ब्रँड सोडून आपल्याला लुटणाऱ्या लॅक्मेसारख्या अमेरिकन वस्तूंच्या जाहिराती का करत असतात कोण जाने”

एफसी रोड वर चहा पीत होतो तेव्हा एक सुबक ठेंगणी आपल्या हातातला स्वदेशी मेकअप प्रोडक्ट कोणाला तरी खपवत होती. आम्ही ते ऐकलं. (शोधपत्रकारीतेतला पहिला नियम डोळे आणि कान सदैव उघडे ठेवा).

आईनं लहानपणी आमच्या तोंडाला गुलाबी डब्ब्यातलं पावडर आणि काजळाची तीट लावली त्या नंतर मेकअपचा आणि आमचा तसा दूर दूरचा पण संबंध आला नाही. लॅक्मेसारखे प्रोडक्ट भारताची लुट करतात हे ऐकून माझा देशाभिमान जागा झाला. मग शोधपत्रकारीतेचा दुसरा नियम आठवला. मिळालेली इन्फोर्मेशन दोन वेळा चेक करून खात्री करून घ्या.

उत्सुकतेने लॅक्मे कंपनीची माहिती घेतली तेव्हा मात्र आम्ही चाट झालो. खरं तर लॅक्मे अमेरिकन नाही तर भारतीय कंपनी आहे . सुबक ठेंगणी लोकांना गंडवत होती तर !!

लॅक्मेची जन्मकहाणीही खूप इंटरेस्टिंग आहे.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा नव्या स्वप्नांचा काळ होता. नवीन भारताची उभारणी सुरु होती. धरण बांधली जात होती. आयआयटी सारख्या शैक्षणिक संस्था उभारण्यात येत होत्या. आण्विक तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान याचा अभ्यास करण्यासाठी संस्था उभारल्या जात होत्या.

पंडीत जवाहरलाल नेहरू एखादा संसारी माणूस जसा आपल घर उभारत असतो तसा आपला देश उभारत होते. चुका होत होत्या पण त्यातनचं शिकत देश पुढ जात होता.

प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भरता मिळवणे हे देशासमोरचे पहिले आव्हान होते. दोन चाकी चार चाकी गाड्या पासून ते विमान जहाजपर्यंत प्रत्येक गोष्टीची निर्मिती भारतात केली जावी हे उद्दिष्ट नेहरूंनी डोळ्यासमोर ठेवलं होत. मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया चा पहिला अविष्कार होता तो.

एक दिवस कोणीतरी नेहरुंना लक्षात आणून दिले की भारतात सौंदर्यप्रसाधने मोठ्या प्रमाणात परदेशातून आयात केली जातात. नुकताच गेलेल्या ब्रिटिशांनी भारत सोडून जाताना उच्चभ्रू कुटुंबातल्या महिलांना ब्रँडेड सौंदर्यप्रसाधनाची सवय लावली होती. पण बरेच विदेशी चलन यामध्ये खर्च होत होते. यावर उपाययोजना करणे गरजेचे होते. बंदी घालणे हा काही दीर्घकालीन उपाय नव्हता.

नेहरूंच्या लक्षात आले की जर उत्कृष्ट दर्जाचे सौंदर्यप्रसाधने जर भारतात बनवली तर याच्यावरील परकीय चलनाचा खर्च थांबेल. स्वदेशी सौंदर्यसाधने बनवण्याची विनंती नेहरूंनी एका भारतीय उद्योगपतीकडे केली. नाही नाही पतंजली नाही. ती कंपनी होती टाटा. 

तेव्हा जेआरडी टाटा हे कंपनीचे सर्वेसर्वा होते. त्यांच्या कझिनची पत्नी म्हणजेच नवल टाटा यांची पत्नी सिमॉन टाटा यांनी नुकतीच कंपनी जॉईन केली होती.

सिमॉन या मुळच्या स्वित्झर्लंडच्या. पाश्चात्य आणि भारतीय सौंदर्यसंकल्पनाची त्यांना जान होती. उष्ण कटीबन्धात येणाऱ्या भारतात महीलांच्या त्वचेच्या गरजा नेमक्या काय असतील याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यानुसार सौंदर्य उत्पादने बनवली.

आता प्रश्न आला नावाचा.

असं म्हणतात की जवाहरलाल नेहरूंनी सौंदर्य उत्पादनाचे नाव संपत्ती आणि सौंदर्याची देवता लक्ष्मी हिच्यावरून ठेवावे अशी विनंती टाटांच्याकडे केली होती. जे आरडी टाटांनी ते नाव सिमॉन यांना सांगितले. सिमॉन यांना हे नाव तितकं काही पसंत पडले नाही. त्यांच्या मते परदेशी सौंदर्यप्रसाधनांच्या शौकीन महिला या आपल्या टार्गेटेड ग्राहक आहेत. त्यांच्या स्पर्धेत आपले उत्पादन टिकवायचे असेल तर नाव सुद्धा काही तरी मॉडर्न ठेवावे लागेल.

खूप विचार केल्यावर सिमॉन यांना आठवले त्या फ्रान्स मध्ये असताना त्यांनी एक ऑपेरा शो पहिला होता,”लॅक्मे”.

पारतंत्र्याच्या काळात भारतात ब्रिटीश सरकारच्या आशीर्वादाने ख्रिश्चन मिशनरीनी सक्तीने धर्मांतर करवून आणले होते याबद्दलची कहाणी या फ्रेंच ओपेरा मध्ये सांगितली होती. ओपेराच्या नायिकेचं नाव असते लक्ष्मी जिचा फ्रेंच उच्चार लॅक्मे असा करण्यात आला होता.

आपल्या सौंदर्यप्रसाधनाचे नाव सिमॉन टाटा यांनी लॅक्मे हेच फायनल केले. नेहरूंच्या इच्छेखातर देवी लक्ष्मीचा ही त्यात उल्लेख होता आणि लक्मेच्या उच्चारावरून फॅशनच्या दुनियेतल्या फॅशन प्रमाणे फ्रेंच नावाचा आभास होत होता.

जेआरडी टाटानी आपल्या टाटा ऑईल मिलची १००% सबसिडरी कंपनी म्हणून लॅक्मेचे १९५२साली रजिस्टरेशन केले.टाटांनी आपला दर्जा या लॅक्मे ब्युटी प्रोडक्ट्स बनवतानाही सांभाळला शिवाय किंमत परदेशी सौंदर्यप्रसाधनापेक्षा खूप कमी होती. लॅक्मे भारतात प्रचंड गाजली. १९९६मध्ये हिंदुस्तान युनीलिव्हर ने टाटांच्याकडून २०० कोटींना हि कंपनी खरेदी केली.

आजही लॅक्मे भारताची सर्वात पहिल्या क्रमांकाची सौंदर्यप्रसाधने बनवणारी कंपनी आहे. आम्हाला भेटलेल्या सुबक ठेंगणी प्रमाणे अनेकांना गैरसमज असतो की लॅक्मे भारतीय नाही. आता परत कधी दिसली आणि आमचं पण धाडस झालं तर आम्ही तिचा गैरसमज दूर करून द्यावं म्हणतो.

हे ही वाच भिडू

2 Comments
  1. Dr Ratnakar Khemnar says

    Nice article….

  2. Rahul Giridhar Bhalerao says

    हो, हे खर आहे. मुंबई मध्ये गोवंडी इथे टाटा यांनी Lakme चा कारखाना उभारला. आज कारखाना जरी बंद असला तरी ती जागा landmark आहे. आणि ह्याच vishayacha एक प्रश्न KBC मध्ये 50 लाख रुपये साठी विचारला होता.
    तुमची माहिती अभ्यासपूर्ण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.