अस्सल राज्यपाल नियुक्त : लक्ष्मण माने

कला, साहित्य, विज्ञान, क्रिडा, सहकार, समाजसेवा अशा क्षेत्रामधील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून विधानपरिषदेत राज्यपालांमार्फत १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लहानपणापासून नागरिकशास्त्राच्या पुस्तकात आपण हेच वाचत आलेलो आहोत.

महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० साली झाली. महाराष्ट्रात द्विस्तरीय विधीमंडळ आहे. पैकी विधानपरिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, विधासभेतील आमदारांचे, पदवीधरांचे, शिक्षकांचे प्रतिनिधी निवडून जातात तर राज्यपालांकडून विविध क्षेत्रातील १२ सदस्यांची कलम १७१/ नुसार नियुक्ती होते.

हे सगळं झालं नागरिकशास्त्र, जे आपण विसरून टाकू आणि प्रॅक्टिकल मुद्यांवर येवू…

महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर दर सहा वर्षांनी जे १२ सदस्य निवडले जातात अशा व्यक्तींची आजतागायत एकूण संख्या होते १०६. आत्ता गंम्मत अशी की या १०६ पैकी १२-१३ व्यक्तीच वास्तविक त्या त्या क्षेत्राशी संबधित होत्या.

१०६ मधून निवडक १५-१६ वजा केले तर उर्वरीत ९० जण फक्त राजकीय पुर्नवसनासाठी आमदार झालेले.

असो तर अशाच १५-१६ जणांची माहिती घेण्यासाठी आपण ही सिरीज सुरु केली आहे.

याच नाव आहे अस्सल राज्यपाल नियुक्त.

या सिरीजमधलं नववे नाव आहे जेष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने

दलित साहित्यकार, “उपरा” नावाच्या पुस्तकामुळे “उपराकार” या बिरुदावलीवरून ओळखले जाणारे, आणि आपल्या लेखणीतून पद्मश्री पुरस्कार मिळवलेले जेष्ठ साहित्यिक लक्ष्मण बापू माने.

जन्म १ जून १९४९ रोजी कैकाडी समाजात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात सोमंथळी ह्या लहानश्या गावी झाला. लहानपणापासून सामाजिक विषमता, गावातील जातीय भिंती यामुळे ते व्यतित होत. यातुनच त्यांची जडणघडण भटके विमुक्त लोक व मागासवर्गीय ह्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्या कल्याणासाठी कार्य करण्याच्या दिशेने झाली.

त्यांच्या उपरा या आत्मचरित्रपर साहित्यकृतीचे पुढे हिंदीत “पराया” ह्या नावाने भाषांतर झाले. तसेच गुजराथी, तमिळ, मल्याळम, फ्रेंच व इंग्रजी भाषेत लेखील ह्या पुस्तकाचा अनुवाद प्रकाशित झाला आहे. ह्या त्यांच्या पुस्तकासाठी १९८१ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारा मिळाला होता.

यानंतर त्यांनी साहित्यक्षेत्रात १९८४ साली बंद दरवाजा, उध्वस्त, खेळ साडेतीन टक्क्यांचा, पालावरचं जग, प्रकाशपुत्र, भटक्याचे गारुड, क्रांतिपथ, विमुक्तायन असे विपुल योगदान दिले आहे.

दलित साहित्यासोबतच ते सातारा आणि पुणे इथे असलेल्या आश्रम शाळांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी देखील ते ओळखले जातात.

विधानपरिषदेवर आमदार…

त्यांच्या या साहित्याच्या आणि समाजसेवेच्या कार्याची दखल १९९० साली घेतली गेली. या ज्ञानाचा उपयोग अवघ्या महाराष्ट्राला व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी साहित्य क्षेत्रातून त्यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शिफारस केली, आणि ती मंजूर झाली.

सभागृहात त्यांची जागा तत्कालिन अर्थराज्यमंत्री श्रीकांत जिचकार यांच्या शेजारी होती. त्यामुळे त्यांना बजेटच वाचन आणि ते समजावून घेता येवू लागले. तर विधीमंडळातील प्रॅक्टिस आणि प्रोसिजर यासाठी रा. सु. गवई यांच्याकडे जाण्याचा दंडक होता.

एकदा तत्कालिन सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी धनगर आणि वंजारी समाजाचा समावेश भटक्या विमुक्त जातींमध्ये करण्याचा निर्णय केला. लक्ष्मण माने यांनी मात्र धनगर आणि वंजारी समाजाची बाजू उचलून धरत या निर्णयाला विरोध केला. आणि सभागृहातच आंदोलन चालू केले.

सभागृहाचा त्यावेळी काही आमदारांनी असाही समज करुन दिला की, वंजारी आणि बंजारी या दोन्ही जाती एकच आहेत. पण माने यांनी पुराव्यानिशी हे सिद्ध केले की या दोन्ही जाती वेगळ्या आहेत. पुढे सभापती जयवंतराव टिळक यांच्या मध्यस्थीने माने आणि मुख्यमंत्री शरद पवार, मंत्री रामदास आठवले यांच्यातील वाद मिटवण्यात आला

वंजारी – बंजारीच्या वादावर कमिशन नेमण्याचे ठरले आणि भटक्या विमुक्त जमातीमध्ये अ, ब, क, ड अशी वर्गवारी करुन ठराविक आरक्षण मान्य करण्यात आले. आणि या समाजांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे ते सांगतात.

पुढे युती सरकार आल्यानंतर या खात्याचे मंत्री झालेले आण्णा डांगे यांनी हा निर्णयच रद्द केला. आणि अंतर्गत संवर्ग मोकळे केले. पण या निर्णयामुळे या संवर्गातील जातींनी एकमेकांच्या आरणावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप माने करतात.

विविध पुरस्काराने सन्मान…

माने यांच्या लिखित साहित्याला आजपर्यंत आंबेडकर व्याख्याता पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार (लेखन व समाजसेवेसाठी), सर होमी भाभा फेलोशिप, न. चिं. केळकर पुरस्कार, भारती विद्यापीठ पुरस्कार अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन २००८ साली सरकाने त्यांना पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

तसेच लक्ष्मण माने यांनी अस्मितादर्श साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन, आंबेडकरवादी दलित साहित्य संमेलन, कराड येथे झालेले दुसरे राज्यव्यापी समतावादी साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे.

बौद्ध धर्माचा स्वीकार…

२००६ साली ऑक्टोबर महिन्यात माने हिंदू धर्म सोडून नवयान बौद्ध धर्माचा स्वीकार करणार होते. त्यानिमित्त जेष्ठ मराठी लेखक डॉक्टर यशवंत मनोहर ह्यांनी लक्ष्मण मानेंना विविध पत्रे लिहिली. ती वीस पत्रे “धम्मपत्रे: लक्ष्मण माने ह्यांना” ह्या पुस्तकात संग्रहित करून त्यांनी प्रकाशित केली.

२७ मे २००७ रोजी त्यांनी व त्यांच्याबरोबर त्यांच्या ४२ पोटजातींतील १ लाख भटक्या विमुक्त प्रवर्गातील समर्थकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

समाजातील वंचित व उपेक्षित जनतेचा आवाज ते लेखनातून व्यक्त करतात आणि त्या विषयावरील त्यांचे पुरोगामी व परिवर्तनवादी विचार ते त्यांच्या लेखनातून मांडतात. त्यामुळे साहित्यीक लक्ष्मण माने हे राज्यपाल नियुक्त आमदार होवू शकले.

समाजेवेच्या टॅग खाली राजकीय इच्छा आणि आकांक्षा पुर्ण करण्यावर भर न देता केवळ आपल्या ज्ञानाचा समागृहाला फायदा व्हावा या उद्देशाने विधानपरिषदेवर गेलेल्या निवडक नऊ आमदारांची माहिती आपण या सिरीज मधून घेतली.

लवकरच नवीन विषयासह नवीन भागात…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.