शास्त्रीजींचा देह ताश्कंदहून दिल्लीला पोहोचण्याआधीच, भावी पंतप्रधानपदाची लढाई सुरु झालेली

१० जानेवारी १९६६ रोजी सोवियत पंतप्रधान अलेक्सी कोसिजिन यांच्या उपस्थितीत लाल बहादूर शास्त्री व आयुब खान यांचा ताश्कंद करार झाला. भारतानं पाकिस्तानला हाजीपीर ची खिंड परत देण्याचं मान्य केलं होतं. त्यामुळे आपल्याला जनतेच्या संतापाला तोंड द्यावे लागेल असं पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना वाटत होतं.

पण त्यांच्यावर ही वेळ आलीच नाही कारण ताश्कंद इथेच मध्यरात्री हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन थोड्याच वेळात त्यांचे देहावसान झाले.

भारताच्या या कर्तबगार पंतप्रधानांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे देशाच्याच नाही तर जगाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 

नेहरूंच्या सुपुत्री व काँग्रेस मधील एक ताकदवान नेत्या म्हणवल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींना कराराचा तपशील एक दिवस आधी समजला होता. हाजीपीर खिंड परत करण्याबाबत शासनावर दबाव टाकला जात आहे हे उघड होतं. रोमेश थापर या पत्रकाराशी बोलताना त्या म्हणाल्या,

“देश हे कधीच सहन करणार नाही”. 

शास्त्रींच्या निधनाचे वृत्त इंदिरा गांधींना पहाटे दोन वाजता समजलं. पक्षातील आपल्या वैयक्तिक सल्लागारांना तिने लगेच पाचारण केलं गेलं.

बातमी समजताच नेहरूंचे जवळचे समजले जाणारे काँग्रेस नेते व्ही.के कृष्णमेनन यांनी फोन करून रोमेश थापर याना भेटायला बोलवलं. कृष्णमेनन खोलीत येरझाऱ्या घालत होते त्यांनी थापरला सांगितलं,

“लालबहादूर शास्त्री यांचे निधन झालं आहे. ताश्कंद येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला”

तो पर्यंत थापर याना काहीच कल्पना नव्हती. हे वृत्त ऐकून रोमेश थापर यांना धक्काच बसला.  आदल्याच रात्री त्यांनी रेडिओ वरती शास्त्री यांचे भाषण ऐकलं होतं.  कृष्णमेनन यांनी थापर कडे वळून विचारलं मी कोणाकडे जाऊ नंदांकडे जाऊ की तुझ्या त्या मैत्रिणीकडे इंदिरेकडे जाऊ?

त्यावर “तुम्ही श्रीमती शास्त्रींकडे जायला हवं” असं रोमेश थापर म्हणाले तेव्हा होकार देत कपडे चढवून काठी हातात घेऊन मेनन तात्काळ बाहेर पडले.

आर. वेंकटरामन (जे पुढे दोन दशकानंतर देशाचे राष्ट्रपती झाले ) हे तामिळनाडूचे उद्योगमंत्री होते. शास्त्रींच्या निधनाचे वृत्त समजताच के. कामराज खास विमानाने दिल्लीत निघाले होते. त्यांच्या समवेत आर. वेंकटरामनही निघाले.

पुढचा पंतप्रधान कोण? कामराजांना चिंता होती.

माजी अर्थ मंत्री मोरारजी देसाई नक्कीच निवडणूक लढवतील अशी त्यांची खात्री होती आणि त्यांचा पराभव करु शकेल असं नाव डोळ्यापुढे येत नव्हतं. त्याबद्दल विचार करतच कामराज झोपी गेले दिल्लीत पोहोचण्याच्या आधी त्यांना जाग आली.

वेंकटरामन यांच्या कडे वळून ते म्हणाले आपण इंदिरा गांधींना पंतप्रधान करूया!

वेंकट रामन ऐकून ते चकितच झाले. कामराज पुढे म्हणाले,  “तिला जगातील सर्व नेते ठाऊक आहेत. वडिलांबरोबर तिनं खूप प्रवास केला आहे. स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेत्यांच्या सहवासात ती वाढली आहे. शास्त्रशुद्ध व आधुनिक दृष्टिकोन तिच्यापाशी आहे प्रादेशिक, जातीय किंवा धार्मिक संकुचित वादापासून ती पूर्णतः मुक्त आहे. वडिलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन तिने अंगीकारला असावाच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1967 च्या निवडणुका ती जिंकू शकेल. “

अतुल्य घोष, नीलम संजीव रेड्डी, मोरारजी देसाई व स. का पाटील हे काँग्रेसमधील उजव्या विचारसरणीचे नेते, इंदिरा गांधींची उमेदवारी सहजासहजी मान्य करणार नाहीत हे कामराजांना कळून चुकलं होतं.

लाल बहादूर शास्त्री यांचा देह ताश्कंदहून दिल्लीला पोहोचण्याच्या आधीच, भावी पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई आणि यशवंतराव चव्हाण यांची नावं चर्चिली जाऊ लागली होती.

पंडित नेहरूंच्या निधनानंतर हंगामी पंतप्रधान झालेले गुलझारीलाल नंदा यांनीही पंतप्रधान पदावर आपला दावा सांगितला होता आणि 11 जानेवारीला सकाळी ते इंदिरा गांधींचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्या घरी हजर झाले होते.

कामराज यांनी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची भेट घेतली. ते दोघे जुने मित्र होते. इंदिरा यांची पंतप्रधानपदी निवड होण्याच्या शक्यतेबाबत दोघांनी चर्चा केली.  राष्ट्रपतींच्या मध्ये इंदिरेपाशी कौशल्याचा अभाव होता तिच्या बुद्धिमत्तेने बद्दल त्यांना काही फारसा आदर नव्हता परंतु पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक असलेला बाह्य देखावा तिच्यापाशी आहे असं त्यांचं मत होतं.

मध्यप्रदेशचे त्यावेळचे मुख्यमंत्री डीपी मिश्रा हे इंदिरा गांधी यांचे मुख्य सल्लागार व समर्थक होते यशस्वी होण्यासाठी कशी पावले टाकायला हवीत हे मिश्रा चांगलेच जाणून होते.

 त्याच दरम्यान सफदरजंग रोड येथे जोरदार हालचाली सुरू होत्या. इंदिरा गांधींनी आनंदाच्या ऊर्मी दाबून ठेवल्या होत्या वरवर त्या शांत वाटत होते आपण आता आपला भाग्य क्षण नजीक येऊन ठेपला आहे हे त्यांना कळून चुकलं होतं. नेमकेच गुलझारीलाल नंदा इंदिरा यांना भेटून गेले होते, तेव्हा इंदिरा अचानक प्रचंड आत्मविश्वासाने म्हणाल्या होत्या की,

“माझ्या पाठिंब्या शिवाय कोणी पंतप्रधान बनूच शकणार नाही”.

दिल्लीला पोहोचताच कामराज आणि इंदिरा ची भेट घेतली आणि तिला त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. दक्षिणेतील हा मुरब्बी राजकारणी आपल्याला पाठिंबा का देत आहे, हे न समजण्याइतके इंदिरा गांधी राजकारणात नवख्या नव्हत्या. आपण सर्वांमध्ये लायक आहोत म्हणून नव्हे तर स्वतःच्या पंखाखाली पंतप्रधान राहू शकेल, त्याला हवं तसं वळवता येईल हा त्यामागचा त्यांचा उद्देश आहे, हे त्या जाणून होत्या.

परंतू त्यांच्या वरवरच्या शांत व्यक्तिमत्त्वामागं लोकांचं अचूक मूल्यमापन करणारं जागरूक आणि चाणाक्ष मन होतं. आणि वेगाने हालचाल करण्याचं कसब त्यांच्या पाशी आहे हे राष्ट्रपतींना आणि काँग्रेसचा अध्यक्ष यांना ठाऊक नव्हतं. 

त्यांच्या अंगी जबरदस्त चिकाटी, धाडस होतं. ऐकून घेण्याची शिकण्याची क्षमता होती. तिला कामराज यांच्या पाठिंब्याची गरज होती, तेव्हा तिनं शिष्याची भूमिका पत्करण्याचं ठरवलं आणि ते ज्या काही सूचना करतील त्यानुसार हालचाली करण्याचं मान्य केलं.

चार दिवसानंतर पंतप्रधानपदाच्या स्पर्धा तीव्र झाली. मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, गुलझारीलाल नंदा आणि इंदिरा गांधी या चौघांनीही आपल्या विजयासाठी कंबर कसली होती.

मुख्यमंत्र्यांच्या हातात बरीच सत्ता आहे हे ठाऊक असल्याने डीपी मिश्रा यांनी यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली. देशातील बहुतेक मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींना आपला पाठिंबा दिला  उत्तर प्रदेशात सुचेता कृपलानी मुख्यमंत्री होत्या आणि त्यांचा पाठिंबा मात्र मोरारजी देसाईंना होता. आपली उत्तर प्रदेशातली लोकप्रियता लक्षात घेता जर तेथील खासदारांना निवडीचं स्वातंत्र्य दिलं तर ते आपल्याला पाठिंबा देतील अशी इंदिरा यांची खात्री होती.

मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे असा निरोप डी.पी मिश्रा यांनी इंदिरा यांना पाठवला. तरी त्यांच्या मनात चलबिचल होत होती. भारत पाकिस्तान युद्धानंतर निर्माण झालेले प्रश्न, दुष्काळी परिस्थिती, महागाई अशा कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागणार होतं.

मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याची बातमी  वर्तमानपत्रांत झळकली. लालबहादूर शास्त्रींचे प्रमुख सचिव एल.के झा यांना इंदिरा गांधी भेटल्या होत्या. त्यांना झा आवडले होते. परंतु त्या म्हणाल्या

“लोकांच्या मनातील एल.के. झा अमेरिका व पाश्चात्य देशांकडे झुकलेले आहेत अशी प्रतिमा आहे. आपल्याला मदत ही घ्यावी लागेल, पण आपलं परावलंबित्व कमी दाखवावं लागेल. आपण जितका कमकुवत असू तितकी आपल्याला अधिक शक्ती दाखवायला हवी.”

नेतानिवडीसाठी संसदीय काँग्रेस पक्षाची बैठक भरण्याच्या आदल्या दिवशी, इंदिरा खूप अस्वस्थ होत्या.

हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांनी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाच्या तुकड्यांना बोलावलं होतं. त्यामुळे बंद करण्याचा त्यांचा डाव असावा असा त्यांना संशय होता. गुलझारीलाल हे किती महत्वकांक्षी आहेत याची कल्पना इंदिरा यांना होती.

नंतर त्यांनी प्रत्यक्ष त्यांना विचारलं, तेव्हा कदाचित लष्करी उठाव होईल असं वाटल्याने आपण सीमा सुरक्षा दलाच्या फौजा बोलावल्या होत्या असा खुलासा त्यांनी केला पण इंदिरा यांना तो पटला नाही. आपण सत्तेवर राहू अशी आशा नंदांच्या दुबळ्या मनाला वाटत असावी अशी तिची खात्री होती.

15 जानेवारी रोजी स्पर्धेत जणू दोघेजण उरले. मोरारजी देसाई व इंदिरा गांधी.

लाल बहादूर शास्त्री यांच्या वेळी जशी सहमतीने निवड झाली त्या पद्धतीने यावेळी सहमती करण्यास आपण तयार नाही असे मोरारजी भाईंनी कामराज यांना सांगून टाकलं. त्यामुळे आता निवडणूक घेणं अपरिहार्य होतं. मोर्चेबांधणीला सुरुवात झाली नेता निवडीसाठी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक 19 जानेवारी रोजी भरणार होती.

विजयालक्ष्मी इंदिराजींच्या समर्थनार्थ उभ्या राहिल्या.

“इंदिरा गांधी पंतप्रधान होणार हे आता जवळ जवळ निश्चितच आहे. आम्हा नेहरूंना आमच्या घराण्याचा खूप अभिमान आहे. जेंव्हा नेहरूपैकी कोणाची पंतप्रधानपदी निवड होते तेव्हा जनतेला अत्यानंद होतो”.  असं त्यांनी काढलेल्या पत्रकात म्हटलं होतं.

मात्र शेवटी एक डंख मारला होताच. “इंदिरा गांधीं जवळ गुण आहेत आता त्यांना अनुभवाची गरज आहे. थोड्या अनुभवानं त्या एक उत्तम पंतप्रधान बनू शकतील. त्यांची तब्येत नाजूक आहे खरी, पण सहकाऱ्यांच्या मदतीने त्या काम चालवू शकतील”, अशी पुस्ती त्यांनी जोडली होती.

 आपली निवड होण्याच्या आदल्या दिवशी इंदिरा गांधींनी आपला मुलगा राजीव गांधी यांना पाठवलेल्या पत्रात रॉबर्ट फ्रॉस्ट च्या पुढील ओळी उद्धृत केल्या होत्या ,

“How hard it is to keep from being king, When it is in you and the situation.”

इंदिरा गांधी ला अखेर त्यांची खरी भूमिका सापडली.

19 जानेवारी रोजी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक भरणार होती त्या दिवशी सकाळी पहाटे राजघाटावर जाऊन गांधीजींच्या समाधीचे त्यांनी दर्शन घेतले. तेथून त्या तीन मूर्ती हाऊसला गेल्या. अशावेळी आपल्या वडिलांच्या स्मृती जवळ असावं असं वाटणं सहाजिकच होतं. जवाहरलाल नेहरूंनी बालपणापासून ज्याच्यासाठी तिला तयार केला त्या भारतीय मानवतेच्या व्यापक भूमिकेत प्रवेश करण्यासाठी ती सज्ज होती.

संसद भवनात प्रवेश करताना आपल्या वडिलांचं अस्तित्व आपल्या सोबत आहे, असं त्यांना वाटलं.

तिथं काही भाषणं झाली नाहीत.  मतमोजणी करण्यात आली. मोरारजीभाईंना 169 व इंदिरा गांधींना 355 मत पडल्याचा जाहीर झालं. मोराराजी भाईंनी सहकार्याचं आश्वासन दिल्याबद्दल इंदिरा यांनी त्यांचे आभार मानले. के. कामराज व अन्य इतर सर्वांबद्दल आपल्याला मतं दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

“मी एक देश सेविका आहे आणि तुमच्या विश्वासाला मी पात्र ठरेन”

संसद भवनाबाहेर त्यांचे स्वागत करण्यासाठी हर्षभरीत जमाव तिष्ठत उभा होता. त्यांच्यावर फुलांचा हारांचा वर्षाव होत होता. त्यातूनच कशीबशी वाट काढत या आपल्या मोटारी पर्यंत पोहोचल्या आणि तेथून त्या राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाल्या. लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेतेपदी त्यांची निवड झाली असल्याने औपचारिकरित्या त्यांना सरकार स्थापन करण्याचा आमंत्रण देण्यासाठी राष्ट्रपती त्यांची  प्रतीक्षाच करत होते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.