म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी मीनाकुमारीची माफी मागितली होती…

अगदी आत्ताच्या तरुण तुर्कांना विचारलं की मीना कुमारी कोण होती माहित आहे का? तर ते देखील सांगतात बॉलिवूडची ट्रॅजेडी क्विन. सुमारे ५० वर्षांपूर्वी तिची बॉलिवूडमध्ये जादू होती, पण तिचं नाव आजच्या पोरांना देखील माहिती असतं अशी ही हिरोईन.

दूसरीकडे असच एक अजरामर नाव म्हणजे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. जय जवान जय किसानचा नारा देणारं व्यक्तिमत्व. अगदी पंतप्रधान पदावर असताना देखील त्यांनी पद्मिनी गाडी घेण्यासाठी कर्ज घेतलं होतं. अत्यंत साधे राहणीमान असणारे असे हे व्यक्ती.

आत्ता या दोन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती एका व्यासपीठावर आल्यानंतर एक किस्सा झाला होता. तिथे झालेल्या त्या प्रकारानंतर खुद्द पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी मीना कुमारीची माफी मागितली होती.

बर ही माफी त्यांनी कोणत्या मिडीयाच्या दबावातून, कोणत्या राजकीय सेटलमेंटसाठी किंवा आपली इमेज बिल्ड करण्यासाठी मागितली नव्हती तर अगदी मोकळ्या व निर्मळ मनाने मागितली होती.

हा किस्सा कुलदीप नायर यांनी आपल्या ‘ऑन लीडर्स एंड आइकॉन्स : फ्रॉम जिन्नाह टू मोदी’ या पुस्तकात सांगितलेला आहे.

झालेलं अस की मुंबईमध्ये पाकीजा सिनेमाचं शुटिंग सुरू होतं.

आत्ता तुम्ही म्हणाल शास्त्रीजी गेले ते साल होतं १९६६ आणि पाकीजा रिलीज झाला ते सालं होतं १९७२. अस असताना हे कस काय होवू शकतं. तर भिडूंनो या शंकेचं उत्तर पाकीजा सिनेमाच्या शुटींगच्या प्रोसेसमध्ये मिळतं. पाकीजा सिनेमाचं शुटींग तब्बल १४ वर्ष चालू होतं.

तर तेव्हा पंतप्रधान पदावर लाल बहादूर शास्त्री होते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय वसंतराव नाईक होते. वसंतराव नाईक यांनी लाल बहादूर शास्त्रींना मुंबईच्या दौऱ्याचं आमंत्रण दिलं होतं.

मुख्यमंत्र्यांच्या या ऑफरला होकार कळवणं लाल बहादूर शास्त्रींना अवघड होवून बसलेलं. कारण या दौऱ्यात पाकीजा सिनेमाच्या शुटींग सेटवर जाण्याचं नियोजित होतं. एखाद्या सिनेमाचं शुटिंगच काय तर साधा सिनेमा देखील शास्त्रींनी पाहिला नव्हता. अशा वेळी आपल्याला माहितीच नसणाऱ्या एखाद्या ठिकाणी कसं जावं या विचारात पंतप्रधान शास्री होते.

तरिही होकार कळवण्यात आला, ठरल्याप्रमाणे लाल बहादूर शास्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासोबत पाकीजा सिनेमाच्या सेटवर पोहचले.

यावेळी पंतप्रधान येणार असल्याने सिनेमाशी संबधित नसणारे स्टार देखील स्टेजवर उपस्थित होते. लाल बहादूर शास्त्री आले व ते आल्यानंतर मीना कुमार ने शास्त्रींच्या गळ्यात हार घालून त्यांच स्वागत केलं…

शेजारीच कुलदीप नायर उभा होते. ते लिहतात हार घातल्यानंतर शास्त्रींनी त्यांना विचारलं ही महिला कोण आहे?

यावर कुलदीप नायर यांनी मोठ्या आश्चर्याने शास्त्रीजींना मीना कुमारीची ओळख करुन दिली. हा तो काळ होता जेव्हा मीना कुमारीची प्रसिद्धी घराघरात होती. पण शास्त्रींना मात्र मीना कुमारी कोण हेच ठावूक नव्हतं…

त्यानंतर भाषण देण्याची वेळ आली तेव्हा शास्त्रीजी सर्वांच्या समोर म्हणाले,

मीना कुमारी जी, मुझे माफ करना मैने आपका नाम पहली दफाह सुना हैं…!

त्यानंतर तुम्हाला न ओळखल्याबद्दल मी तुमची माफी मागतो असही ते म्हणाले. या वेळी पंतप्रधान आपले नाव घेतात या आनंदातच मीना कुमारी पहिल्या रांगेत बसून त्यांच भाषण ऐकू लागल्या.

कुलदीप नायर लिहतात शास्त्रींनी आपणाला नसणारी माहिती  अर्थात आपला अडाणीपणा लपवला नाही तर तो सर्वांसमोर उघड देखील केला व तितक्याचं सहजतेने त्यांनी त्याबद्दल माफी देखील मागितली.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.