लाल बहादूर शास्त्रींनी आपल्या पहिल्या निवडणुकीचा प्रचार बैलगाडीतून केलेला

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याने आपल्याला अनेक नेते दिले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने  बरीचशी जण या स्वतंत्रलढ्यात सहभागी झाली, ज्यांनी पुढे जाऊन देशाच्या स्वातंत्र्या आधीच्या आणि नंतरच्या काळात महत्वाची भूमिका बजावली. या सगळ्यात भारताचे  माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं नाव आघाडीवर घेतलं जाईल. 

शास्त्रींवर गांधीजींच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता. त्यांच्या प्रेरणेनेचं शास्त्री यांनी १९२० च्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत, गांधींच्या असहकार आंदोलनात, पुढे १९३० सालच्या गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहात, १९४२ च्या महात्मा गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनात  महत्वाची भूमिका बजावली ज्यासाठी त्यांना कित्येक वेळा तुरुंगात जायला लागलं.  

स्वातंत्र्या आधीच्या काळाबरोबरचं शास्त्रींनी  स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकारणाच्या मदतीने देशाची घडी व्यवस्थित बसवण्यात सुद्धा महत्वाची कामगिरी बजावली. पंडित नेहरूंच्या नंतर ते देशाचे दुसरे पंतप्रधान बनले. एक शेतकरी नेता म्हणून त्यांची ओळख. ‘जय जवान, जय किसान’ ह्या घोषणेसोबत शास्त्रींच्या कार्यकाळात शेती क्षेत्राचा आणि शेतकऱ्यांचा मोठा विकास झाला. असं म्हणतात, शेतीशी त्यांचं एक वेगळेच नातं होत. याचाचं उदाहरण देताना त्यांचा एक किस्सा आजही राजकीय वर्तुळात मोठ्या चवीनं सांगितलं जातो.  

प्रयागराज म्हणजे आधीच्या अलाहाबाद शहराशी शास्त्रीजींचं अतूट नातं होतं. इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला गती मिळाली. १९५१ सालची गोष्ट उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. शास्त्रीजींनी पहिल्यांदाच सोरांव उत्तर आणि फुलपूर पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवायचं ठरवलं. 

लाल बहादूर शास्त्री पहिल्यांदाच निवडणूमीला उभे राहिलेले. त्यावेळी सोरांव शहर एक छोटेसं खेड गाव होतं, सध्या ही जागा सोराव विधानसभा म्हणून ओळखली जाते. तर शास्त्रींची  ही  निवडणूक फारच इंटरेस्टिंग होती. म्हणजे कसं उमेदवार आपल्या प्रचारासाठी मोठमोठ्या गाड्यांचा ताफा आणतात, त्यांच्यामागे हजारो समर्थक असतात, या प्रचार रॅलीत आपली पॉवर दाखवण्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला जातो.

पण शास्त्रींच्या त्या निवडणुक प्रचारात असला काही गराडा नव्हता, त्यांचे बक्कळ समर्थक होते. पण प्रचार रॅलीचा वायफट खर्च त्यांनी टाळला आणि आपल्या प्रचारासाठी ते बैलगाडीतून गेले होते. पायी चालून ते लोकांना भेटत त्यांच्याशी चर्चा करत. त्यांना  पाहायला आणि भेटायला लोक नेहमीच उत्साही असायची. 

इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपल्या या पहिल्याच निवडणुकीत शास्त्रींनी  आपल्या समोरच्या सगळ्यांना तोंडघशी पाडलेलं.  या निवडणुकीत लाल बहादूर शास्त्री यांना २०,९३० मते मिळाली आणि जवळपास ७० टक्के होती. आता पहिल्याचं निवडणुकीत एवढा दणक्यात विजय म्हंटल्यावर सगळीकडे त्याची चर्चा होती. त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या किसान मजदूर प्रजा पक्षाच्या लाल बहादूर सिंग यांचा १७७४० मतांनी पराभव केला. त्यांना एकूण वैध मतांपैकी १०.५६ टक्के मते मिळालेली.  ही जागा जिंकल्यानंतर ते पं.वल्लभभाई पंत यांच्या सरकारमध्ये मंत्रीही झाले 

लाला बहादूर शास्त्रींना सोरांव इतकं आवडायचं कि ते या भागाला आपले दुसरे घर म्हणायचे. तिथल्या  लोकांना सुद्धा त्यांच्याबद्दल अफाट प्रेम होत. शास्त्रींचा कधी दौरा असला कि अख्खच्या अख्ख गाव त्यांना भेटायला यायचं.  २६ एप्रिल १९६५ साली सोरांव इथल्या मेवालाल इंटर कॉलेजच्या स्थापनेच्या वेळी ते स्वतः येथे आले आणि त्यांच्या हस्ते पायाभरणी झाली. त्यांच्या आदेशानुसार दयालपूर हॉल्ट स्टेशनही बांधण्यात आले. पण सोरांवची ही त्यांची शेवटची भेट ठरली.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.