लालबहादूर शास्त्रींनी नियमात बदल केले आणि कोकणातले रस्ते काँक्रीटचे झाले

गोष्ट आहे स्वातंत्र्यानंतरची. इतकी वर्षे इंग्रजांच्या गुलामीच्या अंधःकारात गेली आता आपल्या स्वप्नातला नवा देश घडवायचा म्हणून सगळा देश प्रेरित झाला होता. पंडित जवाहरलाल नेहरू,सरदार वल्लभभाई पटेल, लालबहादूर शास्त्री हे राज्यकर्ते हे या दृष्टीने झटत होते. ज्या भागात इंग्रजांनी विकास होऊ दिला नव्हता तिथे पोचायचं उद्दिष्ट त्यांनी मनात ठेवलं होतं.

यातच महत्वाचा प्रश्न होता कोकणाचा.

कोकण हा नैसर्गिक दृष्ट्याच दुर्गम भाग. पूर्वापार इथे दळणवळणाच्या साधनांची तशी कमतरताच होती. पहावं तिकडे घाट वळणाचे कच्चे रस्ते, कोकणच्या माणसाने रेल्वे तर स्वप्नात देखील पाहिली नव्हती.

अशातच दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी बंदराच्या दिशेने मोठी वाहतूक होऊन जे काही कच्चे रस्ते होते त्यांचा देखील निकाल लागला होता. पनवेल महाड सारख्या रस्त्यांवरून लॉरी जर निघाली तर ताशी ९ मेल इतक्याच वेगाने ती प्रवास करू शकत असे. त्यावेळेच्या सरकारकडे कित्येकदा मागणी करूनही निधी नाही म्हणून सांगत त्यांनी कोकणच्या लोकांना पाने पुसली होती.

रस्त्याची मागणी घेऊन अधिकाऱ्यांकडे गेलं तर इंजिनियर सांगायचे,

“कोकणात शंभर ते दोनशे सेंटीमीटर इतका पाऊस होतो. रस्त्यांची धूप होते ते टिकत नाहीत.”

यातूनच कोकण रेल्वेची मागणी पुढे आली. रेल्वेतच नोकरीला असणाऱ्या वालावलकर यांनी तर या कार्यासाठी स्वतःच आयुष्य वाहून घेतलं.

१९५२ सालच्या देशातल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत कोकणातून चिंतामणराव देशमुख, जगन्नाथराव भोसले यांच्यासारखे दिग्गज नेते निवडून आले. चिंतामणराव देशमुख तर देशाचे अर्थमंत्री बनले. आता कोकणचा विकासाच स्वप्न प्रत्यक्षात उतरेल असा विश्वास लोकांना वाटू लागला.

फक्त केंद्राच्या राजकारणातच नाही तर राजकीय नेतृत्वामध्ये कोकणच्या नेत्यांचा वरचष्मा होता. यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे.

नाना कुंटे.

नानासाहेब कुंटे हे मूळचे अलिबागचे. वडिलांच्या काळापासून वकिली घरात चालत आलेली. स्वतः नाना एलएलबीच्या परीक्षेत मुंबईत पहिले आलेले. गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी उडी घेतली. या स्वातंत्र्यलढ्यातुनच ते काँग्रेस मध्ये आले. त्यांच्या राजकीय जीवनाला प्रारंभ झाला.

१९३७ पासून सलग त्यांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. स्वातंत्र्यापूर्वी मुंबई प्रांतात बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळात पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून देखील निवड झाली होती. त्याकाळापासून त्यांनी कोकणातील रस्त्यांचा पाठपुरावा सुरु केला होता.

 बाळासाहेब खेर यांच्यानंतर गुजरातचे मोरारजीभाई देसाई मुंबईचे मुख्यमंत्री बनले. त्यांच्याकाळात विधानसभेचे सभापतिपद नानासाहेब कुंटे यांच्याकडे आले. कोकणला आवाज मिळाला. 

त्यांच्याच आग्रहाने कोकणच्या रस्त्यांचे काँक्रेटीकरण सुरु झालं. पनवेल ते पेण हा पहिला टप्पा होणार होता. पण याच्या मधल्या भागात पक्षी अभयारण्य येत असल्यामुळे हा भाग अडचणीचा आहे असे कारण देऊन रस्ते बांधणाऱ्या ठेकेदाराने तिथे सूट मिळवली आणि काँक्रीटच्या ऐवजी अस्फाल्टचा रस्ता बांधायचा अशी मंत्री जगन्नाथराव भोसले यांच्या कडून परवानगी आणली.

अस्फाल्टचा ब्लॅक टॉप वापरून रस्ता जलद पूर्ण होईल असा त्यांचा दावा होता. यावरून भोसले आणि कुंटे यांच्यात वाद सुरु होते.

एकदा तेव्हाचे रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री कोकण दौऱ्यावर आले होते. मुंबईवरून मोटारीतून रत्नागिरीला ते जाणार होते. त्यांच्या जवळ कोकणचे प्रश्न मांडावेत आणि खरी परिस्थिती दाखवावी म्हणून नाना कुंटे यांनी शास्त्रींना मुंबई ते धरमतर हे अंतर समुद्रमार्गे चला अशी विनंती केली. लालबहादूर शास्त्री त्यासाठी तयार झाले.

ठरलेल्या दिवशी मुंबईत रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री, जगन्नाथराव भोसले त्यांच्या सोबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री निंबाळकर, नानासाहेब कुंटे, रत्नागिरी काँग्रेसचे बाळासाहेब सावंत, कोकण रेल्वेचे पुरस्कर्ते वालावलकर इतके जण सिंधिया यांच्या बोटीने निघाले. तिथेचन्याहारीची व्यवस्थाकरण्यात आलीहोती.

न्याहरी झाल्यावर रेल्वेचा विषय निघाला. तिथे असलेल्या मंडळींपैकी कोणी तरी आम्हाला मिटर गेज रेल्वे देखील चालेल असं सांगितलं. कुंटे यावर खवळले.

“सरकार यावर खर्च असताना तुम्ही कशाला ब्रॉडगेज ऐवजी मीटरगेज मागताय ?”

लालबहादूर शास्त्री यावर हसत म्हणाले,

“सभापती रागवू शकतो ”

नानासाहेब म्हणाले, “रागावू शकतो आणि गरम देखील होऊ शकतो.”

लॉन्च धरमतर येथे पोहचली. तिथून पुढे रस्त्याचा प्रवास सुरु झाला. नानासाहेब शास्त्रीजींच्या शेजारीच बसले होते. रस्त्यात ठिकठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचं स्वागत करत होते. प्रत्येकजण शास्त्रीजींकडे कोकण रेल्वेचीच मागणी करत होता. शास्त्री कुंटेंना म्हणाले,

“मी कुमाऊंचा रहिवाशी असल्यामुळे दऱ्याखोऱ्याचा मला अनुभव आहे. तुमच्या प्रश्नाबद्दल मला सहानुभूती आहे. “

रत्नागिरी येथे शास्त्रीजी पोहचले. तिथे लाखो लोक त्यांची प्रतीक्षा करत होते. सभेत शास्त्रीजी यांनी धडाकेबाज भाषण केलं. सभेनंतर थिबा राजाच्या राजवाड्यात जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. तिथे जेवताना निवांत वेळ मिळाल्यावर लालबहादूर शास्त्रींनी अखेर कोकणच्या रस्त्याचा विषय काढला.

आता सांगा तुम्हाला काँक्रीटचा रस्ता का पाहिजे? तुमच्या साठी एक नियम आणि सगळ्या देशासाठी एक नियम मी करू शकत नाही. 

नानासाहेब कुंटे यांनी काँक्रीटच महत्व पटवून देण्यास सुरवात केली. पण त्यांच्या सोबत कोणतीही कागदपत्रे नव्हती. पण सोबतच बांधकाम खात्याचे सेक्रेटरी होते त्यांची मदत घेतली. अस्फाल्टच्या रस्त्याचा खर्च कमी होता त्यामानाने काँक्रीटचे रस्ते खर्चिक होते. जगन्नाथराव भोसले हाच मुद्दा लावून धरत होते.

बराच काळ या रस्त्यांवरून वादविवाद चालला. कुंटे यांनी अस्फाल्टच्या रस्त्याचे सर्व दोष दाखवून दिले. शिवाय या रस्त्यांचे आयुष्य काँक्रीटपेक्षा दहा वर्षांनी कमी असणार होते. शिवाय त्या रस्त्यांचा वार्षिक खर्च पंधराशे रुपये तर काँक्रीटचा पाचशे रुपये इतका होता.  

नानासाहेब कुंटेंनी रस्त्याचं सगळं गणित त्यांच्यापुढे मांडलं. त्यांचा अभ्यासपाहून लालबहादूर शास्त्री देखील भारावून गेले. त्यांनीबसल्या बैठकीला निकाल दिला,

“निकाल तुझ्या बाजूने. कोकणातले रस्ते काँक्रीटचे होतील.”

जगन्नाथराव भोसले नाराज झाले पण शास्त्रीजी यांनी काँक्रीटचेच रस्ते होतील असे आदेश काढले. पुढे हा कोकण गोवा रस्ता पूर्णपणे काँक्रीटचा करण्यात त्यांना यश आले. यालाच पश्चिमी किनारी रस्ता म्हणून ओळखले गेले. नाना कुंटे सांगतात ,

पुढे १९६७ साली मी खासदार झालो आणि लोकसभेत पाठपुरावा केला. या प्रयत्नांमुळेच मुंबई कोकण गोवा मेंगलोर कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ साकार झाला.

कोकणच्या विकासाचा महामार्ग खुला झाला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.