लालबहादूर शास्त्रींच्या पंतप्रधानपदासाठी वसंतराव नाईकांनी महत्वाची भूमिका बजावली होती..

महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदी असणारे मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक. ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ सलग बारा वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री राहिले. यवतमाळ सारख्या मागासलेल्या जिल्ह्यातल्या गहुली या छोट्याश्या गावातील वसंतराव नाईकांचा जन्म.

तुलनेने अत्यंत लहान आणि गरीब असलेल्या बंजारा समाजात झाला. वडील फुलसिंग हे त्या तांड्याचे नाईक होते. ते प्रगत विचारांचे होते. आपल्या पोरांनी शिकावं हि त्यांची जिद्द. वडिलांच्या इच्छेखातर वसंतराव नाईकांनी दररोज कित्येक मैलांची पायपीट करून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि बंजारा समाजातले पहिले वकील बनले. 

डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली. स्वातंत्र्यापूर्वी हा काळ. आपल्या अशीलांची छोटी मोठी कामे करता करता ते सामाजिक चळवळीत आले. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या वर झाला होता. आपल्या गोर गरीब बंजारा समाजाला अनिष्ठ प्रथेपरंपरेतून बाहेर कढून आधुनिक जगाकडे घेऊन जाणे त्यांचं स्वप्न होतं.

हरिजन वसतिगृह, राष्ट्रीय वसतिगृह तसेच शेतकरी संघाचे ते अध्यक्ष बनले. पुसद गावच्या नगरपालिकेचं नगराध्यक्षपद देखील वसंतरावांनी अनेक वर्ष सांभाळलं. काँग्रेस पक्षाच्या मार्फत ते समाजकार्यात सक्रिय राहिले.

भारत स्वतंत्र झाला. १९५२ साली पहिल्या विधानसभा निवडणुका आल्या. यवतमाळ तेव्हा मध्य प्रांतामध्ये येत होता. आजचे मध्येप्रदेश आणि आणि विदर्भाचा मिळून हे राज्य बनलं होतं. काँग्रेस तर्फे जेव्हा तिकीट वाटप सुरु झालं तेव्हा कित्येक जणांनी इच्छूक म्हणून अर्ज भरला. त्याकाळात या तिकीट वाटपामध्ये हिंदी भाषिक मध्यप्रदेशच्या नेत्यांचा वरचष्मा होता. मराठी उमेदवारांवर अन्याय व्हायचा.

यवतमाळ मध्ये देखील प्रचंड स्पर्धा होती. पण तिकिट मिळाले वसंतराव नाईकांना. यामागे होते थोर नेते लालबहादूर शास्त्री. 

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणून ओळखले जाणारे शास्त्रीजी हे गांधीजी आणि नेहरू या दोघांचेही कट्टर अनुयायी म्हणून ओळखले जायचे. उत्तरप्रदेश मधील अलाहाबाद येथे त्यांनी चले जावं आंदोलनात दिलेल्या लढ्यामुळे संपूर्ण देशभरात ओळख मिळाली होती.

तरुण वयात नेहरूंनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात महत्वाचं असलेलं रेल्वे खातं दिलं. पंतप्रधानांचा विश्वास त्यांनी आपल्या कर्तृत्वावर मिळवला होता.  लवकरच नेहरूंचे वारसदार म्हणून शास्त्रीजी ओळखले जाऊ लागले.

लालबहादूर शास्त्रींना वसंतराव नाईकांच्या कार्याबद्दल माहिती होती. त्यांनी केलेल्या शिफारशी मुळे वसंतरावांना पहिल्यांदा आमदारकीचा तिकीट मिळालं. त्यांनीपहिल्याच निवडणुकीत भरघोस मतांनी विजय देखील मिळवला. पहिल्याच टर्म मध्ये रविशंकर शुक्ला यांच्या मंत्रिमंडळात ते महसूल राज्यमंत्री ही झाले. मध्य प्रांताच्या विधानसभेत आपल्या शेतीविषयक अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी छाप पाडली.

पुढे द्विभाषिक राज्य बनल्यानंतर विदर्भाचा भाग मुंबई प्रांतात आला. तेव्हा देखील वसंतराव नाईकांना मोठी मंत्रीपदे मिळत गेली.

त्यांचा जन्मच एका शेतकरी कुटुंबात झाला होता त्यामुळे पिढीजात शेतीचे संस्कार त्यांच्यावरही झाले होते म्हणूनच यशवंतराव चव्हाणांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात कृषिमंत्रीपद दिले होते. पुढे यशवंतराव चव्हाणांना चीनच्या युद्धानंतर नेहरूंनी केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून बोलावून घेतलं. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद रिकामे झाले. तेव्हा वसंतराव नाईकांनी या खुर्चीवर दावा केला. खरं तर अनेक नेते या मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करत होते. यशवंतराव पश्चिम महाराष्ट्राचे असल्यामुळे पुढचे मुख्यमंत्रीपद विदर्भाच्या वाटणीला येणार असा शब्द देण्यात आला होता.  महाराष्ट्राचे निर्णय घेण्याचे अधिकार लालबहादूर शास्त्री यांना देण्यात आले होते. शास्त्रीजींनी वसंतराव नाईकांना मुख्यमंत्री करायचा निर्णय घेतला.

पण मारुतराव कन्नमवार यांना उत्तरप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते गोविंद वल्लभ पंत यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी त्यांना शब्द दिला होता. कन्नमवारांनी शास्त्रीजींना या आश्वासनाची आठवण करून दिली तेव्हा तात्काळ निर्णय घेत कन्नमवारांना मुख्यमंत्री करण्यात आलं. वसंतराव नाईकांची हात तोंडाशी आलेली संधी हुकली.

दुर्दैवाने कन्नमवार यांचं अकाली निधन झालं. लालबहादूर शास्त्रींनी वसंतराव नाईकांची हुकलेली संधी त्यांना दिली. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. वसंतराव नाईक हे लालबहादूर शास्त्री यांचे उपकार विसरले नाहीत. 

पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर भारताचा भावी पंतप्रधान कोण याच्या चर्चा सुरु झाल्या. देशाच्या अर्थमंत्रीपदी असलेल्या मोरारजी देसाई यांना तेव्हा पंतप्रधान जबरदस्त बनायची महत्वाकांक्षा होती. काँग्रेसची संघटना तत्कालीन अध्यक्ष कामराज यांच्या हाती होती. 

त्याकाळात काँग्रेसमध्ये लोकशाही होती. कामराज यांनी कन्सेसनुसार पंतप्रधान पदाचा निर्णय घेण्याचं ठरवलं. मोरारजी देसाई यांना काँग्रेसच्या सर्व सदस्यांकडून पाठिंबा मिळत नव्हता. सर्व नेत्यांचे लॉबीइंग चालू होतं. अनेक दिग्गज नेते प्रयत्न करत होते.

काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला दिल्लीत महत्वाच स्थान होतं. देशाच्या पंतप्रधानपदाच्या निवडीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईकांचे मत मोलाचे ठरणार होते. नाईकांनी आपलं पारडं शास्त्रीजींच्या बाजूला टाकलं. फक्त स्वतःच मत देऊन बाजूला झाले नाहीत तर लालबहादूर शास्त्री यांच्यासाठी दिल्लीत तळ ठोकला. महाराष्ट्राचे आणि वसंतराव नाईकांचे नेते म्हणून यशवंतराव चव्हाणांचा पाठिंबा देखील शास्त्रींनाच होता. 

नेहरूंच्या विचारसरणीचे खरे वारसदार म्हणून लालबहादूर शास्त्री यांची ओळख त्यांच्या उपयोगी पडली. स्वच्छ चारित्र्य आणि निस्पृह वृत्ती हे त्यांचे बोनस गुण होते. 

नाईकांचा इतर राज्यातील मुख्यमंत्री व नेतेमंडळींशी चांगला स्नेहबंध निर्माण झाला होता. त्यांनी शांतपणे पण ठामपणे लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान व्हावेत यासाठी पाठपुरावा केला. सगळ्यांचं मत आपल्या विरोधात जात आहे हे पाहून मोरारजी देसाई यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. 

एकमुखाने लालबहादूर शास्त्री यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. त्यांच्या शपथविधी नंतरच वसंतराव नाईक महाराष्ट्रात परत आले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.