जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी या पठ्ठ्याने थेट पंतप्रधानांच्या विरुद्ध निवडणूक लढवली

इंटरनेट वर टाईमपास करत असताना भिडूला ‘कागज’ सिनेमाचा ट्रेलर दिसला. दिग्दर्शक सतीश कौशिक. प्रमुख कलाकार पंकज त्रिपाठी. उत्सुकता आणखी चाळवली गेली. ट्रेलर झकास होता. आणि ट्रेलर मध्ये एक गोष्ट दिसली ती म्हणजे सत्य घटनेवर आधारीत.

मग काय.. भिडूने थोडी शोधाशोध केली. हातामध्ये एक रंजक माहिती मिळाली. कागज सिनेमा आहे लाल बिहारी मृतक या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारीत.

कागदोपत्री मृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या लाल बिहारी यांना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी १९ वर्ष संघर्ष करावा लागला. काय झालं होतं त्यांच्या बाबतीत?

लाल बिहारी यांचा जन्म १९५५ साली झाला. उत्तर प्रदेश येथील अमीलो या राज्यात त्यांचे बालपण गेले. पुढे काही वर्षांनी कापड उद्योगासाठी लाल बिहारी बँकेत कर्ज काढण्यासाठी गेले. बँकेने कर्ज देण्यासाठी जेव्हा सर्वे केला तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली.

ती अशी, ३० जुलै १९७६ रोजी आजमगड जिल्हा मुख्यालयातील महसूल कार्यालयात लाल बिहारी यांचा अधिकृत मृत्यू झाल्याचे नमूद केले गेले होते.

यामागचं कारण असं होतं की, लाल बिहारी यांच्या काकांनी त्यांच्या कुटुंबाची वडिलोपार्जित जागा हडप करावी म्हणून एका अधिकाऱ्याला लाच देऊन पुतण्याला म्हणजेच लाल बिहारी यांचा मृत्यू झालाय असं कागदोपत्री घोषित केलं. लाल बिहारी जेव्हा महसूल कार्यालयात गेले तेव्हा त्यांच्यासारख्या अजून १०० जिवंत माणसांचा कागदोपत्री मृत्यू झालाय, असं त्यांना कळलं.

आपण आणि आपल्यासारख्या इतरांवर झालेला अन्याय लाल बिहारी यांच्या निदर्शनास आला. त्यांनी मग ‘उत्तर प्रदेश मृतक संघ’ स्थापन केला. मालमत्तेच्या लालसेमुळे ज्या लोकांचा कागदोपत्री मृत्यू झाला आहे, अशी माणसं लाल बिहारी यांना जोडली गेली. आज संपूर्ण भारतातले जवळपास २०००० माणसं या संघाशी जोडली गेली आहेत.

संघ तर स्थापन केला होता. परंतु अजूनही लाल बिहारी यांचं अस्तित्व मान्य केलं नव्हतं. त्यामुळे लाल बिहारी यांनी विविध उपाय केले. या माणसाने स्वतःची अंत्ययात्रा काढली.

‘मी मेलो आहे तर माझ्या विधवा पत्नीला अनुदान द्या’,अशी मागणी केली.

१९८० साली त्यांनी स्वत:च्या नावापुढे ‘मृतक’ हा शब्द जोडला. स्वतःचं नामकरण लाल बिहारी मृतक असं केलं. कोणत्या कागदपत्रांवर सही करायची झाली तर ‘स्वर्गीय लाल बिहारी’ अशी ते सही करायचे. एकूणच यंत्रणेला जाग येण्यासाठी लाल बिहारी छोटे छोटे प्रयत्न करत होते.

लाल बिहारींनी आणखी एक मोठी मजल मारली. सरकारला जाग यावी आणि मी जिवंत आहे हे कळावं म्हणून, त्यांनी १९८९ साली थेट राजीव गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना अपयश आले तो मुद्दा वेगळा.

अखेर लाल बिहारी यांनी केलेल्या १९ वर्षांच्या दीर्घ कायदेशीर संघर्षाला यश आले. १९९४ साली लाल बिहारी यांची कागदोपत्री मृत झालेली नोंद हटवण्यात आली.

२००३ मध्ये लाल बिहारी यांना IG नोबेल पिस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मृतक संघामध्ये २० हजार लोकं सहभागी आहेत. लाल बिहारी यांच्या प्रयत्नांमुळे त्यापैकी ४ जणांना न्याय मिळाला आहे. आपली संपूर्ण व्यवस्था आतून किती पोखरली गेली आहे, हेच यावरून कळून येतं. मुळात लाल बिहारी यांनी आवाज उठवला नसता तर हा प्रश्न दुर्लक्षित राहिला असता.

लाल बिहारी मृतक यांच्या कार्यावर आधारित ‘कागज’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वरवर जाणवणार नाही, परंतु स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लाल बिहारी या सामान्य माणसाने संपूर्ण व्यवस्थेशी १९ वर्ष दिलेला लढा महत्वपूर्ण आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.