जीनांच्या कबरीला भेट दिल्याचा पश्चाताप लालकृष्ण अडवाणींना अजूनही होत असेल…

महाराष्ट्रात सध्या एकच मुद्दा चर्चेत आहे, तो म्हणजे औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या भेटींचा आणि बॅनरवर असलेल्या औरंगजेबच्या फोटोंचा. औरंगजेब हा मुद्दा आगामी निवडणुकीत नक्कीच गाजेल. मात्र राजकीय नेत्यानं कबरीला भेट दिल्यानंतर वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही एका भेटीमुळं मोठा वाद झाला होता, इतका मोठा की ज्याचा पश्चाताप आजही भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना होत असेल.

लालकृष्ण अडवाणी म्हणजे भाजपच्या गोटातली आणि देशाच्या राजकारणातली मोठी असामी. आपल्या राजकीय जीवनात त्यांनी सर्वप्रकारचे चढउतार पाहिले. जनसंघ विलीन करून भाजपची स्थापना करण्यात वाजपेयीं इतकेच अडवाणीही आघाडीवर होते.

नव्वदच्या दशकात कट्टर हिंदुत्वाची भूमिका आणि रामजन्मभूमी आंदोलन या महाजनांनी सुचवलेल्या आयुधांच्या साह्यानं त्यांनी पक्षात मोठे बदल केले. वाजपेयींची मवाळ भूमिका अडवाणींनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बदलली. त्यांची रामरथयात्रा प्रचंड गाजली. बाबरी मशीद पाडण्यात त्यांची भूमिका सर्वात महत्वाची मानली गेली. भाजपला निवडणुकांमध्ये या रथयात्रेचा प्रचंड उपयोग झाला.

फक्त दोन खासदारांचा पक्ष म्हणून हिणवल्या गेलेल्या भाजपला अडवाणींनी सत्तेच्या दारात नेऊन उभं केलं.

निवडणुका झाल्यानंतर, जेव्हा भाजपला केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार होती. तेव्हा कट्टर हिंदुत्व हा लालकृष्ण अडवाणी यांचा वीक पॉईंट मानला गेला. इतर पक्षांनी सर्वसामावेशक चेहरा असलेल्या वाजपेयींना निवडलं.

अडवाणींनीही मोठं मन दाखवलं. ते देशाचे गृहमंत्री आणि पुढं उपपंतप्रधान बनले. १९९८ ते २००४ या काळात वाजपेयींच्या खालोखालचं सत्ताकेंद्र म्हणून त्यांना ओळखलं गेलं. मंत्रिमंडळातल्या अनेक निर्णयातही त्यांची छाप असायची.

२००४ च्या निवडणुकांनंतर मात्र चित्र बदललं. वाजपेयी सक्रिय राजकारणात दिसणं काहीसं कमी झालं होतं. निवडणुकांमधल्या पराभवानं प्रमोद महाजनही बॅकफूटवर गेले होते. त्यामुळं विरोधी बाकांवर  असलेल्या भाजपचे सर्वेसर्वा अडवाणी होते. 

पुढच्या निवडणुकीत किंवा त्यापूर्वीही काँग्रेसचं सरकार पाडायचं आणि पंतप्रधान बनायचं ही महत्वाकांक्षा अडवाणी बाळगून होते. पण यात एकच अडचण होती, कट्टर हिंदुत्व.

कट्टर हिंदुत्ववादी इमेज कार्यकर्त्यांमध्ये फेमस असली तरी त्याचा राजकीय तोटा होतोय असं अडवाणींना वाटत होतं. इमेज मेकओव्हर करण्यासाठी त्यांनी सुधीन्द्र कुलकर्णी यांना आपला सल्लागार नेमलं. आपणही सर्वसमावेशक भूमिका असणारे नेते आहोत हे दाखवण्यासाठी अडवाणींनी प्रयत्न सुरु केले.

अशातच जून २००५ मध्ये त्यांचा पाकिस्तान दौरा ठरला.

हा काळ ‘भारत पाकिस्तान अमन की आशा’ चा होता. वाजपेयींनी लाहोर दिल्ली बस सुरु केली आणि दोन्ही देशातील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरु केले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात ही मैत्री अजून दृढ झाली. क्रिकेटचे सामने, दोन्ही देशातले मोठे नेते एकमेकांच्या देशात दौऱ्यावर येणं या माध्यमातून बॉर्डरवरचा तणावही कमी होण्यास सुरवात झालेली.

अडवाणी यांचा जन्म कराचीतला पण फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात आलं. त्यानंतर पहिल्यांदाच अडवाणी पाक भेटीवर गेले. आपल्या जन्मठिकाणाबद्दल त्यांच्या अनेक आठवणी होत्या. त्यांना उजाळा द्यावा देण्यासाठी आणि दोन्ही देशातले संबंध दृढ करण्यासाठी भारताचा विरोधी पक्ष नेता या नात्यानं अडवाणी पाकिस्तानला आले.

त्यावेळी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष लष्करशहा परवेझ मुशर्रफ होते.

सिंधमध्ये आपल्या भूमिपुत्राचं जोरदार स्वागत करण्यात आलं. अडवाणी सहकुटूंब या दौऱ्यावर आले होते. त्यांनी आपल्या जुन्या घराला भेट दिली. पाकिस्तानच्या अनेक नेत्यांची गाठ घेऊन चर्चा केली.

याच दौऱ्यादरम्यान अडवाणी कराचीमध्ये असलेल्या जीनांच्या मजारला म्हणजेच कबरीला भेट द्यायला गेले. 

पाकिस्तानचे राष्ट्रपिता मानल्या गेलेल्या मोहम्मद अली जिना यांच्या समाधीवर त्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं. यानंतर तिथल्या पत्रकारांशी बोलताना त्यांना जीनांबद्दल प्रश्न विचारण्यात आले.

बोलण्याच्या ओघात अडवाणींनी जिना यांचं कौतूक केलं. बॅरिस्टर जीना हे धर्मनिरपेक्ष नेते होते असं ते म्हणाले.

ती पत्रकार परिषद संपली मात्र याचे पडसाद दूर भारतात उमटले.

अडवाणींनी जिनांची प्रशंसा केल्यामुळं भाजपमध्ये वादळ उठलं. कार्यकर्त्यांना ही गोष्ट जराही रुचली नव्हती. एरवी अडवाणी यांचे गोडवे गाणारे भाजप नेते आणि संघ परिवार तापले. भारताच्या फाळणीला बॅरिस्टर जीना जबाबदार आहेत, अशी त्यांची पहिल्यापासून भूमिका होती. 

त्यात जीना हे जातीयवादी, द्विराष्ट्रवादी आणि देशाचा घात करणारे नेते होते अशी प्रतिमा तयार होण्यात संघाचा मोठा वाटा होता. मात्र पाकिस्तानात जाऊन खळबळजनक विधान केल्यामुळं अडवाणी सगळ्यांच्या निशाण्यावर आले.

वास्तविक, वाजपेयी यांच्या उदारमतवादी प्रतिमेमुळे भाजपाला देशभर मित्रपक्ष जोडण्यात यश आलं होतं. या पार्श्वभूमीवर रथयात्रेनंतर कडवे हिंदुत्ववादी ही प्रतिमा बदलून उदारमतवादी नेता अशी प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अडवाणींनी जीनांची प्रशंसा केली होती.

 त्यादृष्टीनंच त्यांचे स्वीय सचिव सुधीन्द्र कुलकर्णी यांनी अडवाणींच्या भाषणाचा मसुदा तयार केलेला होता, असं त्यावेळी सांगितलं गेलं होतं. पण संघ परिवाराला या सर्व गोष्टी त्यांच्या सिद्धांत तत्वाविरोधात वाटल्या. 

भारतात हा सगळा गोंधळ सुरू असताना अडवाणी पाकिस्तानात होते. तिथल्या वास्तव्यात आपलं विधान मागे घेण्यास त्यांनी नकार दिला आणि पक्षाध्यक्षपदाचा आपला राजीनामा पाठवून दिला.

हा वाद काय जास्त काळ चालला नाही, ज्यानंतर अडवाणींना राजीनामा मागे घ्यावा लागला. तेव्हा अडवाणी समर्थकांना वाटलं की या संपूर्ण प्रकरणावर पडदा पडला आहे. पण तस घडलं नाही.

२००९ च्या निवडणुकीत भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून उतरलेल्या अडवाणींना संघाच्या कार्यकर्त्यांनी म्हणावी तेवढी मदत केली नाही. उलट काँग्रेसनं त्यांच्यावर टीकेची झोड उठवली तेव्हा उत्तर देण्यासाठीही कोणी नव्हतं.

ती निवडणूक जिंकण्यात अडवाणी अपयशी ठरले. जिना यांचं कौतुक केल्यामुळे दुसऱ्या फळीतील मोदी, पर्रीकर असे त्यांच्या जवळचे नेते देखील दूर गेले होते. या सगळ्याचा फटका त्यांना बसला.

पुढं जेव्हा २०१४ सालच्या लोकसभा निवडणूक आल्या तेव्हा भाजपनं अडवाणींच्या ऐवजी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड केली.

मोदींनी भाजपला न भूतो न भविष्यती असा विजय मिळवून दिला. नव्या नेतृत्वाला संधी दिली, याचाच परिणाम सर्व जेष्ठ नेते अडगळीत फेकले गेले. पंतप्रधान बनण्याचं अडवाणींचं स्वप्न कायमचं भंग झालं होतं.

त्या एका कबर भेटीचा आणि वक्तव्याचा पश्चाताप त्यांना आजही होत असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.