पंजाब नॅशनल बँकेतील पहिला घोटाळा लाला लजपत राय यांनी बाहेर काढला होता !

महान स्वातंत्र्यसैनिक लाला लजपत राय आपल्याला प्रामुख्याने माहित असतात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जहाल गटाची तिकडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘लाल-बाल-पाल’मधले लाल म्हणून किंवा सायमन कमिशनच्या विरोधातील आंदोलनात ब्रिटिशांनी केलेल्या लाठीमारात त्यांनी गमावलेल्या प्रणामूळे आणि त्याचा बदला म्हणून भगतसिंग आणि साथीदारांनी इंग्रज अधिकारी जॉन सॉडर्सच्या केलेल्या हत्येमुळे.

पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना याची कल्पना असेल की ते एक अतिशय उत्कृष्ट बँकर देखील होते.

गेल्या काही महिन्यांपूर्वी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांनी केलेल्या घोटाळयामुळे चर्चेत आलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेची सुरुवात लाला लाजपत राय यांच्या पुढाकारातूनच झाली होती आणि  विशेष म्हणजे या बॅंकेतील पहिला घोटाळा देखील स्थापनेच्या २ वर्षानंतरच खुद्द लाला लजपत राय यांनीच बाहेर काढला होता.

आज लालाजींच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया, पंजाब नॅशनल बॅंकेच्या स्थापने विषयी आणि लालाजींनी बाहेर काढलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेतील या पहिल्या घोटाळयाविषयी.

पंजाब नॅशनल बँक.

पंजाब नॅशनल बॅंकेच्या स्थापनेची कहाणी भारताच्या स्वदेशी आंदोलनाशी संबंधित आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशात स्वतःच्या मालकीची आर्थिक संसाधने असावीत या भूमिकेतून १८९४  साली सरदार द्याल सिंह मजिठीया, लाला हरकिशन लाल, लाला लाल चंद आणि लाला ढोलन दास यांनी या बॅंकेची स्थापना केली होती. या लोकांना बॅंकेच्या स्थापनेसाठी प्रोत्साहित करण्यामागे लाला लाजपत राय हे होते.

लाला लाजपत राय यांना या गोष्टीची चिंता होती की भारतीयांचा मोठ्या प्रमाणातील पैसा ब्रिटीश बँका आणि विदेशी कंपन्या चालविण्यासाठी केला जातोय आणि त्याबदल्यात भारतीयांच्या पदरात काहीच पडत नाही. त्यामुळे भारतीयांची स्वतःची अशी एक बँक असावी अशी इच्छा त्यांनी एका लेखातून व्यक्त केली आणि त्यातूनच पुढे १९ मे १८९४ रोजी पंजाब नॅशनल बँकेची नोंदणी करण्यात आली आणि १२ एप्रिल १८९५ रोजी बॅंकेचं काम सुरु झालं.

लाहोरच्या अनारकली परिसरात आर्य मंदिराच्या बाजूला उघडण्यात आलेल्या बॅंकेच्या शाखेत आपलं खातं उघडणारे लाला लजपत राय हे पहिले व्यक्ती होते आणि त्यांचे भाऊ दलपत राय यांनी या शाखेचे मॅनेजर म्हणून काम करायला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात लालाजी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळावर देखील होते.

स्थापनेच्या दुसऱ्याच वर्षी उघडकीस आला होता घोटाळा !

साल होतं १८९७.

लाला लाजपत राय यांचे भाऊ दलपत राय यांनी अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे अनेक उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली. त्यामुळे काही दिवसांनी खुद्द लाला लाजपत राय यांनीच एक पत्र लिहून आपल्या भावाच्या राजीनाम्याविषयी खुलासा करताना बँकेतील घोटाळा उघडकीस आणला.

लालाजींच्या पत्रात त्यांनी लिहिलं की, “माझ्या भावाने सचिव लाला हरकिशन लाल यांच्या सांगण्यावरून एक असं काम केलं होतं, ज्यामुळे बॅंकेचं मोठं आर्थिक नुकसान झालं. या प्रकरणात बँकेच्या दुसऱ्या एका संचालकाचा देखील हात होता. प्रकरण लक्षात आल्यानंतर ज्यावेळी बॅंकेच्या मॅनेजरला आपलं स्पष्टीकरण लाला हरकिशन लाल यांना देण्याचं सांगण्यात आलं.

यावेळी आपल्या भावाने लाला हरकिशन लाल यांच्याच स्वाक्षरीतील आदेशाची प्रत त्यांच्यासमोर सादर केल्यानंतर लाला हरकिशन यांनी ही प्रत नष्ट करण्यासाठी आपल्या भावावर दबाव आणला. तसं करण्यासाठी जेव्हा आपल्या भावाने नकार दिला त्यावेळी लाला हरकिशन लाल यांच्या नाराजीतून आपल्या भावाला राजीनामा द्यावा लागला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.