जेव्हा लाला लजपतराय यांचं अपूर्ण राहिलेलं काम मदर इंडिया या चित्रपटाने पूर्ण केलं!

राहुल गांधी जी आधी मध्ये राजकारणातून एकदमच सुट्टी घेऊन कुठेतरी लांब निघून जातात ही परंपरा काँग्रेसमध्ये आधीपासून चालत आली आहे.

१९२२ सालानंतर राजकारणातून काढतं अंग घेऊन गांधीजी १९२८पर्यंत समाजकारणाच्या चळवळीत व थेट जनसेवेत रमले. या काळात काँग्रेसची आघाडी लढवण्याचं काम लाला लजपत राय यांनी केलं.

१९२०नंतर एकीकडे एकांगी राजकारणाचा क्षय होऊन बहुजन जनतेची नवजागृती होत असताना नव्या-जुन्या पिढीला जोडत लालाजींनी पंजाबचा शेर उपाधी सार्थ ठरवली. १९२० पर्यंत लाल-बाल-पाल जोडगळीने भारत हे एकीकृत राष्ट्र असल्याचा परिचय दिला होताच.

इंग्रजी-संस्कृत साहित्याचा दांडगा व्यासंग, तरुणांसोबत स्वतः आंदोलनात उडी घेण्याची धमक, भगतसिंग सारख्या उगवत्या नेतृत्वाला हेरून पुढे ठेवण्याची तसेच शीख-हिंदू एकात्म भावनेची वाढ करण्याची धोरणं ह्यासारखे अनेक नानाविध कंगोरे लालजींच्या नेतृत्वाला होते. भारतीय समाजाच्या असंतोषाला जगाच्या पटलावर ठेवत आंतरराष्टीयतेला धरून भारतीयत्व जपण्याची त्यांची अनोखी विचारसरणी होती. त्यांचे सर्व लेखन एखाद्या धीरोदत्त भविष्यवेतत्यासारखे कालातीत झालेले भासते. भारताच्या शिक्षणव्यवस्थेवरचे त्यांचे विचार असोत की आर्थिक शोषणाची थियरी असो, दादाभाई नवरोजी यांनंतर काँग्रेसमधली पोकळी त्यांची वैचारिक आणि प्रत्यक्ष चळवळीत भरून काढली.

त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये बऱ्यापैकी दुर्लक्षित राहिलेलं “अनहॅपी इंडिया” हे पुस्तक आजही तितकंच प्रासंगिक आहे.

अमेरिकन इतिहासकार मिस कॅथरीन मेयो यांनी भारत आणि भारतीयांविरुद्ध गरळ ओकलेल्या “Mother India” या पुस्तकावर केलेल्या टीकेचा हा ग्रंथ लालाजींची भारतीयत्वाची भूमिका आणि त्यांच्यातील साहित्यिक जाणीवांचे सशक्त दर्शन प्रक्षेपित करतो.

अमेरिकन समाजजीवनाची चिरफाड करताना वर्णभेद, वंशवाद, स्त्री-विषमता ह्यावर भाष्य करताना हा ग्रंथ माहिती आणि त्याचा सुयोग्य प्रसार याला अधोरेखित करत राहतो, माहितीचं अतिरंजित चित्रण आणि त्याचं सवंग मोडतोड करून भासवलेला प्रोपगॅन्डा-जो आजच्या भारतात सर्वोच्च टोकावर पोचला आहे, त्याचा समाचार घेतो.

मायो यांनी १९२७ साली लिहिलेले हे पुस्तक भारतीय समाज, धर्म आणि संस्कृती वरती पाचशे मध्ये जगाकडून करण्यात आलेली जहरी टीका होती.

भारताच्या पूर्ण स्वराज्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढा देणार्‍या क्रांतिकारकांच्या विरुद्ध पाश्चात्य जगात एक भ्रम सोडून देण्यासाठी या पुस्तकाचा वापर करण्याचा इंग्रजांचा डाव होता.

येथील महिला दलित तसेच राजकारणी नेते यांच्या विरुद्ध अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरत मायो यांनी सर्वच भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी नालायक देश म्हणून मोडीत काढले होते.

या पुस्तकामुळे अख्ख्या जगात भारताची नाचक्की व बेअब्रू होणार होती.

त्यांच्या या पुस्तकाविरुद्ध भारतात फार तीव्र प्रतिक्रिया उमटली व त्यांच्या या पुस्तकाच्या उत्तरादाखल जवळपास पाचशे निरनिराळी पुस्तके पत्रके वर्तमानपत्रे भारतीयांनी या वादविवादात उतरवली.

शिवाय या पुस्तकामुळे परदेशात असताना ‘मदर इंडिया’ व ‘ भारतमाता’ ही बिरुदे देशाला देण्यास लोक कचरत होते.

महात्मा गांधींनी या पुस्तकाविरुद्ध आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले,

“भारतात अशा एखाद्या विदेशी पर्यवेक्षकाला इथली स्थिती तपासण्यासाठी पाठवणे ज्याचा एकमेव उद्देश भारताची बदनामी करणे इतकाच आहे!”

त्यांनी पुस्तक वाचून केवळ एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली,

“एका पोकळ व्यक्तीने केलेल्या पोकळ समीक्षणापेक्षा रिपोर्टला दुसरं काही महत्त्व नाही.”

गांधीजींसारखा महात्मा एवढा पेटला होता म्हणजे बाकीच्या देशाला किती राग आला असेल याचा विचार तुम्ही करू शकता.

मायौ यांच्या खोडीलपणाला उत्तर देण्याचा सर्वात मोठा प्रयत्न लाला लजपत राय यांनी स्वतः हातात लेखणी घेऊन केला व आपल्या अनहॅपी इंडिया पुस्तकातून त्यांना तोडीस तोड उत्तर दिले.

लालाजींनी माहितीची उपयुक्तता आणि त्याचा खरेपणा यावर भर देताना मुळात मेयो यांचं विश्लेषण कसं धूळफेक करणारं आहे, सरकारकडून होणाऱ्या शोषणाचा पुरस्कार करणाऱ्या अशा विकाऊ वैचारिकतेवर मात कशी करावी ह्याविषयी आपली मतं मांडली आहेत.

“माहिती विचारांचं संसाधन असताना त्याला तोडून-मोडून आपल्या फायद्यासाठी वापरणं म्हणजे मायो ह्यांची कलमबाजी”

अशा शब्दात त्यांनी ह्याचे वाभाडे काढले. स्वतः अमेरिकेत पांढरे लोक काळ्या लोकांविरुद्ध रानटीपणाने राहत असताना इथल्या लोकांविषयी बोलणं ही दांभिकता आहे असे त्यांनी आकडेवारीनिशी पटवून दिलं.

मात्र लाला लजपतराय यांनी केलेले हे कार्य पुरेसं पडलं नाही.

भारतात त्यांच्या पुस्तकाचाबद्दल बराच प्रचार झाला, मात्र विदेशामध्ये त्याचा म्हणावा असा प्रभाव पडला नाही व मायो यांचं लेखन खूप काळात चर्चेत राहीलं. भारताविषयी माहिती करून घेण्यासाठी तिथले लोकही पुस्तक वापरतात व या पुस्तकाची लोकप्रियता विदेशात दिवसेंदिवस वाढत होती.

अमेरिकन व पाश्चात्त्य जनतेत या पुस्तकाचा प्रभाव मोठ्या काळापर्यंत टिकून होता. विशेषतः हे पुस्तक वाचणार्‍या व त्याचा प्रभाव पडलेल्या भरपूर लोकांची भारताकडे पाहण्याची दृष्टी एकदम बदलली होती.

या पुस्तकात भारतीयांना ‘रानटी, जंगली व पशुतुल्य’ म्हणून हिणवलं गेलं होतं आणि तोच अनुभव अमेरिकेत गेलेल्या भारतीयांना पदोपदी येत होता.

भारताची एकूण संस्कृतीच कशी हीन दर्जाची आहे व तेथील सर्वच लोक हे आधुनिक जीवन जीवन जगण्यासाठी नालायक आहेत हा वैचारिक भ्रमप्रचार अमेरिकेत सर्व थरात जाऊन पोहोचला होता.

मेहबूब खान हे सिनेमा दिग्दर्शक भारताच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक घडामोडींचे पूर्णपणे परिचित होते.

स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढा त्यांनी जवळून पाहिला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील मुल्ये आणि त्यातील माणसांवरती चित्रपट बनवण्याचं पक्कं केलं होतं.

1952 साली त्यांनी भारतीय शेतकरी व विशेषतः भारतातील महिला शेतकरी व त्यांच्या जीवनावर आधारित एका चित्रपटाचं लेखन केलं होतं.

त्याकाळी भारतात फिल्मचे रीळ बनत नव्हते. सर्व फिल्म बनवण्यासाठी लागणारे रीळ बाहेरून आणावे लागत. ते आणण्यासाठी भारत सरकारच्या एक्सचेंज ऑफिसची परमिशन घ्यावी लागे.

त्यांनी सरकारला आपल्या चित्रपटाविषयी सांगून आपण या फिल्मचं शीर्षक ‘मदर इंडिया’ देत असल्याचं जाहीर केलं व चित्रपट बनवायला सुरुवात केली.

मात्र 1955 साली जेव्हा सरकारमधील काही यंत्रणांना या नावामागची पार्श्वभूमी समजली, तेव्हा त्यांनी ‘महबूब खान’ यांना बोलावून घेतलं व मदर इंडिया हे नाव बाहेरच्या जगतात भारतीयांना कसे शरम वाटण्यास बाध्य करणारे आहे व या नावाने कदाचित भारताची बाहेर अजून नाचक्की होईल याबाबत आपली शंका बोलून दाखवली.

त्यांनी महबूब खान यांच्याकडून चित्रपटाची स्क्रिप्टही मागून घेतली व मायो यांच्या पुस्तकाचा याला संदर्भ असल्याने आपली भीती व्यक्त करत त्यांनी हे नाव का ठेवले यासंबंधी लिखित स्वरूपात माहिती देण्यास सांगितले.

यावर चित्रपट बनवणाऱ्या टीमने आपल्या स्क्रिप्ट बरोबर 2 पानाचे पत्र सरकारला लिहून पाठवले.

त्या पत्रातून महबूब खान यांचा देशाभिमान व परदेशी माध्यमांचा भारताच्या विरुद्धचा प्रपोगंडा हाणून पाडण्याची अद्भुत कल्पना आपल्या प्रत्ययास येते. ते या पत्रात म्हणतात-

“आमच्या चित्रपटाच्या नावाविषयी व त्यामागील उद्देश याविषयी सध्या बरेच गैरसमज पसरवले जात आहेत, की या चित्रपटाद्वारे मायो यांच्या लेखनाला समर्थन दिले जाईल. खरंतर या चित्रपटाचा उद्देश आणि मायो यांचे लेखन एकमेकांच्या पुर्णपणे विरुद्ध आहे. या पुस्तकाला व त्यातील धारणांना आव्हान म्हणून मी माझ्या फिल्मचं नाव मुद्दामच ‘मदर इंडिया’ ठेवले आहे. लोकांच्या मनातून व जगातून मायो यांच्या पुस्तकाचे नाव कायमचे हद्दपार करून देण्यासाठी माझा प्रयत्न आहे.”

जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर या चित्रपटाची जादू काय होती ते तुम्ही आपल्या आई-वडिलांच्या पिढीला नक्की विचारा.

त्या चित्रपटाचे खेळ होताना थेटर मध्ये रडारड होई, काही लोक सलग एकाच दिवशी दोन ते तीन खेळांना बसत. आजही सर्वात जास्त कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये या चित्रपटाचे नाव घेतले जाते नवी दिल्लीमध्ये या चित्रपटाचा एक खेळ आयोजित करण्यात आला होता ज्याला भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू स्वतः इंदिरा गांधींसह उपस्थित होते.

ऑस्करच्या जगातील सर्वश्रेष्ठ चित्रपट या श्रेणीमध्ये धडक मारणारी ही पहिली भारतीय फिल्म होती. 1990 उजाडेपर्यंत कोणत्या ना कोणत्या चित्रपटगृहात या पिक्चरचे खेळ होत होते.

ब्रिजेट शूलत्झ या चित्रपट समीक्षकांच्या मते मदर इंडिया या चित्रपटाने नुकत्याच स्वतंत्र झालेल्या गाव आणि शहरातल्या भारतीयांच्या मनात कित्येक वर्षांच्या गुलामी नंतर पहिल्यांदाच भारताविषयी स्वाभिमान जागृत केला.

या चित्रपटाने फ्रेडरिको फेलिनीच्या ‘नाईट ऑफ कॅरेबिया’ ह्या सर्वांगसुंदर चित्रपटाला ऑस्करमध्ये चांगली झुंज दिली व केवळ एका मताने ‘मदर इंडिया’चा ऑस्कर हुकला.

मात्र या चित्रपटामुळे कॅथरीन मायो यांच्या पुस्तकाचे नाव कायमचे पुसले गेले व मदर इंडिया हे नाव अभिमानाने वापरण्यासाठी भारतीयांना उपलब्ध झाले, आणि लाला लाजपत राय यांचे अपूर्ण कार्य शेवटी पूर्ण झाले.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. SHANTANU+RAKTATE says

    ह्या लेखाची सुरवात च किती बकवास केली…. पुढचा लेख वाचण्याची ईच्छाच राहिली नाही….तुम्ही महात्मा गांधीजींची तुलना राहुल गांधींशी कशी करू शकतात …..महात्मा गांधी राहुल गांधी सारखं देश सोडून मध्येच गायब व्हायचे का ओ….मला लेखकाच्या राजकीय विचारसरणी शी काही घेणं देणं नाही …..पण थोडी तरी सद्सदविवेक बुद्धी शाबूत असण्याची अपेक्षा होती….. बरं….गांधीजी मध्येच समाजकार्यात भाग घ्यायचे म्हणून का…..राहुल गांधी जी मध्येच देश सोडून खाजगी दौऱ्यावंर जात असतील का…..काय लिहिता राव…जेवताना पहिल्याच घासत दगड लागावा आणि मग नंतरच जेवण सुद्धा बेचव लागावं तसं झालंय.

Leave A Reply

Your email address will not be published.