गोष्ट फक्त १० रुपयांची नव्हती. शास्त्रीजींनी घालून दिलेला आदर्श महत्वाचा होता.

स्वातंत्र्यलढ्याची गोष्ट. भारतदेश इंग्रजांच्या गुलामीत पिचलेला होता. महात्मा गांधींनी सुरु केलेल्या सत्याग्रहाच्या आंदोलनात असंख्य नागरिकांनी भाग घेतला होता. यात अबालवृद्ध स्त्रिया पुरुष सर्व जण एकजुटीने ब्रिटिश सत्तेला उलथून लावण्यासाठी जोमाने पर्यंत करत होते.

अनेकांनी आपल्या घरावर तुळशी पत्र सोडले होते. यातच एक प्रमुख उदाहरण म्हणजे लालबहादूर शास्त्री.

त्यांचं मूळ आडनाव श्रीवास्तव. जन्म उत्तर प्रदेश मधील मुघल सराई येथे झाला. वडील तेथे शाळा शिक्ष होते पण  लालबहादूर लहान होते तेव्हाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांचे व त्यांच्या भावंडांचे पालन पोषण त्यांच्या आईने मामांच्या मदतीने केले.

गरिबीचे चटके शास्त्रीजीनी लहानपणीच अनुभवले होते.

साधारण चौदा पंधरा वर्षाचे असतानाच त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. तो काळ असहकार आंदोलनाचा होता. लालबहादूरच्या शाळेत निशंकमेश्वर प्रसाद मिश्रा नावाचे एक गुरुजी होते. ते राष्ट्रभक्त होते. काँग्रेसच्या चळवळीत ते काम करायचे.

त्यांच्या प्रेरणेमुळे लालबहादूरसुद्धा गांधींच्या सत्याग्रहाकडे ओढला गेला. गुरुजींच्या घरात असलेल्या पुस्तकांचे लालबहादूरने प्रचंड वाचन केले. भारताचे सर्वात जास्त नुकसान इंग्रजी राजवट व जातीपातीच्या बंधनामुळे झाले आहे हे त्यांनी ओळखलं.

याच कारणामुळे त्यांनी अगदी लहान वयात आपली कायस्थ जात दर्शवणारे श्रीवास्तव हे आडनाव सोडून दिले.

निशंकमेश्वर मिश्रा यांचा हा अतिशय लाडका विद्यार्थी. गरिबीमुळे त्याच्या पोटापाण्याचे हाल होऊ नयेत म्हणून गुरुजींनी त्याला आपल्या मुलांची ट्युशन घेण्यास सांगितलं होत व फी म्हणून थोडीफार रक्कम  देत असत.

यातून लालबहादूरला मदत देखील होत असे व त्यांना कष्टाचे महत्व समजून स्वाभिमानदेखील जपला जात होता.

जानेवारी १९२१ रोजी लालबहादूर बनारस येथे महात्मा गांधी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांच्या एका सभेला हजर होते. गांधीजींनी तरुणांना स्वदेशीचे महत्व समजावून सांगितले होते, सरकारी शाळा कॉलेजांना सोडून राष्ट्रीय शाळा कॉलेजमध्ये भरती होण्याचे आवाहन केले होते. लालबहादूर बनारस वरून परत आले ते त्यांनी आपल्या शाळेला रामराम ठोकला.

त्यांच्या दहावीच्या परीक्षेला फक्त ३ महिने उरले होते पण या ध्येयवेड्या तरुणाने जोवर माझी भारत माता स्वतंत्र होत नाही तो पर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली व पूर्ण वेळ स्वातंत्र्य लढ्यात उतरले.

असहकार चळवळ दडपण्याचा इंग्रजांनी पुरेपूर प्रयत्न केला. अनेक काँग्रेस नेत्यांना अटक झाली, यात लालबहादूरसुद्धा होता. पण तो अल्पवयीन असल्यामुळे त्याची लवकरच सुटका झाली. पुढे त्यांनी गांधीजींनी सुरु केलेल्या बनारस मधल्या काशी विद्यापीठात प्रवेश घेतला.

येथेच त्यांना शास्त्री हि उपाधी मिळाली जी कायमची आडनाव म्हणून त्यांना चिकटली.

याच काळात त्यांनी लोक सेवक मंडळ या लाला लजपत राय यांनी सुरु केलेल्या संस्थेत आपलं नाव नोंदवलं. महात्मा गांधींनी या संस्थेचं उदघाटन केलं होतं. लाला लजपतराय यांनी आपलं राहत घर या कामासाठी दान दिलेलं होते.

या संस्थेचा प्रमुख उद्देश राष्ट्रीय कामासाठी नवीन पिढी घडवणे हा होता. राजकीय चळवळीत गांधी विचारावरून चालणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देण्याचं काम इथे चालायचं.

लालबहादूर शास्त्रींनी मुजफ्फरनगर येथे गांधीजींच्या आदेशानुसार दलितांच्या उथ्थानाचे कार्य हाती घेतले. याच दरम्यान त्यांचे लग्न ललिता देवी यांच्याशी झाले होते. ललिता देवी या सधन कुटुंबातून आल्या होत्या. त्यांच वय कमी होतं. स्वातंत्र्यलढा व त्याचे महत्व त्यांना उमगलेलं नव्हतं. पण नवऱ्याच्या पाठीशी त्या खंबीर उभ्या राहायच्या.

पुढे एकदा शास्त्रीजींना एका आंदोलनादरम्यान अटक झाली. त्यावेळी सर्वंट्स ऑफ इंडिया ही सोसायटी जे गरीब नेते तुरुंगात आहेत त्यांच्या कुटूंबाला मदत म्हणून ५० रुपये पाठवत असत.

एकदा लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या घरी पत्र पाठवले व बायकोला घरखर्चाला पैसे पुरतात का याची चौकशी केली. यावर ललिता देवी यांनी परत उत्तर पाठवलं की,

” पैसे पुरतात व मी काटकसरीने घर चालवून त्यातले १० रुपये साठवत देखील आहे.”

एखाद्या संसारी गृहिणी प्रमाणे त्यांनी आपल्या नवऱ्याला हे उत्तर पाठवलं. त्यांना वाटलं शास्त्रीजी शाबासकी देतील. पण झालं उलटंच. लालबहादूर शास्त्री यांनी लोक सेवक मंडळाला पत्र लिहिले व त्यांना आपल्या घरी फक्त ४०च रुपये पाठवून देण्याची विनंती केली.

लालबहादूर शास्त्री यांना प्रामाणिकपणाचा आदर्श का म्हणावं हे या घटनेतून कळेल.

आज सरकारी पैशांवर करोडो रुपयांची चैनी करणारे, राजकारण म्हणजे आपल्या भावी पिढ्यांची ऐषोआरामीची सोय समजणारे नेते पाहिले की लालबहादूर शास्त्री, सरदार पटेल यांच्या सारख्या निस्पृह नेतृत्वाची आठवण येते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.