काँग्रेस अध्यक्षपदाचा वाद सुरु होता, शास्त्रीजींनी फक्त अर्ध्या तासात निकाल लावला…

एक काळ होता काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष देशाच्या राजकारणात पंतप्रधानांच्या खालोखाल ताकद राखून असायचा. त्याची निवड लोकशाही पद्धतीने व्हायची. देशभरातील छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांचा कल समजून घेऊन हे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जायचे. एकदा तर नेहरूंसारख्या ताकदवान पंतप्रधानांचा उमेदवार देखील या निवडणुकीत पडला होता.

एकूणच देशात लोकशाही नांदत होती असा तो काळ.  

काँग्रेसचं कुठलंसं तरी अधिवेशन सुरु होतं. त्यावेळी पंतप्रधानपदी लालबहादूर शास्री होते. अध्यक्षपदी कामराज होते. अधिवेशनात अनेक ठराव येत होते. त्यावर चर्चा होत होती. असे ठराव आधी वर्किंग कमिटीपुढं चर्चेसाठी येत. तिथं चर्चा होऊन वर्किंग कमिटीत तो ठराव पास झाला कि मग तो सर्वसाधारण सभेत मांडला जायचा मग तो ठराव पास होत असे.

अधिवेशनाचं कामकाज सुरु असताना शास्री अध्यक्षांची परवानगी घेऊन ठराव मांडायला उभे राहिले.

ठराव तसा महत्वाचा होता. कामराज यांना काँग्रेस अध्यक्षपदाची मुदत आणखी एक वर्ष वाढवून द्यायचा. खरेतर तो देशाच्या साठी संकटाचा काळ होता. पाकिस्तान सोबतच्या युद्धाची टांगती तलवार लटकत होती. अध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत वाट न पाहता अधिवेशनात त्याला मंजुरी द्यावी हा शास्त्रीजींचा उद्देश !

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात या ठरावामागची भूमिका स्पष्ट करताना अध्यक्षांना मुदतवाढ देण्याचा ठराव वर्किंग कमिटीत मांडला. तो अनुमोदनासह मंजूर झाला असल्यानं तो ठराव आता अधिवेशनात पारित करावा, अशी त्यांनी विनंती केली.

कामराज याना आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्यास कोणाचीच ना नव्हती. शिवाय शास्त्रीजींच्या विरोधात जाणे कोणी शकतच नव्हतं. सगळ्यांना वाटलं हा ठराव लगेच पास होणार. पण एक करीत घडलं. या निर्णयाविरुद्ध एका माणसाचा हात वर आला. ते होते मोरारजीभाई देसाई.

मोरारजींनी अध्यक्षांकडं बोलायला परवानगी. ते जवळजवळ वीस मिनिटं इंग्रजीत बोलले. त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ एवढाच होता,

‘सर्वसाधारणपणे अशा ठरावावर वर्किंग कमिटीत चर्चा होऊन तिथे तो मंजूर होतो आणि मग अधिवेशनात मांडला जातो. मी वर्किंग कमिटीचा सदस्य आहे हा ठराव वर्किंग कमिटीपुढं चर्चेसाठी आल्याचं माझ्या तरी पाहण्यात नाही. आजपर्यंतच्या प्रथेला सोडून आहे असं मला वाटत म्हणून मी याला विरोध करत आहे.”

मोरारजीभाईंच्या भाषणानंतर आता सर्वांची अशी समजूत झाली कि, हा ठराव जर मंजुरीसाठी अधिवेशनात आला तर तो एकमतानं पास होणार नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचं वादळ निर्माण होणार, शास्त्रीजी आणि मोरारजी यांच्यात मोठी खडाजंगी होणार असच सगळ्यांना वाटत होतं. परंतु कांग्रेस पक्षाच्या प्रतिष्ठेला तडा जाऊ नये हि सर्वांची भावना होती.

शास्त्रीजी उठले त्यांनी पक्षाध्यक्षांना अर्धा तास अधिवेशन थांबवण्याची विनंती केली.

मधल्या त्या अर्ध्या तासात नेमकं घडलं हे कळायला मार्ग नव्हता. पण नंतर असं सांगण्यात आलं कि, त्या मधल्या अर्ध्या तासात वर्किंग कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीत कामराज यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा ठराव मांडण्यात आला.

ठरावाचे सूचक मोरारजी भाईच होते. अर्ध्या तासापूर्वी लढाईचा पवित्र घेणारे ते आता ठरावाच्या बाजूने बोलत होते. त्यांचा कामराज यांच्या नावाला विरोध नव्हता तर पक्षातील लोकशाही पाळली जावी यासाठी त्यांनी हे घडवून आणलं होतं.

वर्किंग कमिटीमध्ये ठराव पास झाल्यावर तो अधिवेशनात मांडला गेला. टाळ्यांच्या गजरात तो मंजूरही झाला. अध्यक्ष, पंतप्रधानांच्या विरोधात बोलण्याच धाडस त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये होत एवढं निश्चीत!

स्वतःच्या प्रतिष्ठेपेक्षा पक्षप्रतिष्ठा महत्वाची असं मानण्याचा तो काळ होता. म्हणून पक्ष प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यावेळी सर्वांनी केलेली धडपड वाखाणण्यासारखी होती. स्वातंत्र्यलढ्याच्या मुशीतून निर्माण झालेले कामराज, मोरारजी, लालबहादूर शास्त्री यांचे सारखे तत्वासाठी लढले आणि त्यांच्या सारख्यांमुळे भारतीय लोकशाही समृद्ध झाली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.