भावी पंतप्रधान समजल्या जाणाऱ्या प्रमोद महाजनांचे पंख अडवाणींनीच कापले होते…
एक काळ होता जेव्हा प्रमोद महाजनांना भारताचा भावी पंतप्रधान समजलं जायचं. फक्त दोन खासदारांचा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहचवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. भाजपमध्ये सरसंघचालकापासून ते मराठवाड्यातील एखाद्या साध्या कार्यकर्त्यापर्यंत आणि अडवाणींपासून ते अटलजींपर्यंत सगळ्यांशी त्यांचे चांगले नाते होते.
मोदींचा उदय होण्यापूर्वी भाजपच्या निवडणुकीच्या सर्व रणनीती प्रमोद महाजन बनवायचे. शिवसेनेशी युती, राम जन्म भूमी आंदोलन, अडवाणींची रथयात्रा या गाजलेल्या स्ट्रॅटेजी त्यांच्या आणि शायनिंग इंडिया सारखे फेल गेलेलं कॅम्पेनिंग देखील त्यांचंच.
ते भाजपचे खरे चाणक्य तर होतेच पण भारतीय राजकारणात त्यांना मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखले जायचे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या खालोखाल कोणाचं भाषण ऐकायचं तर महाजनांचं असं त्याकाळी सांगितलं जय.खास त्यांचं वक्तृत्व ऐकण्यासाठी लोक सभांना गर्दी करायचे. या सभा त्यांनी जशा गाजवल्या. तसेच आपल्या संसदेमधल्या भाषणांनी विरोधकांनाही जिंकले.
पण एक निवडणूक अशी देखील झाली ज्यात महाजनांची भाषणे देखील फसली होती.
साल होतं १९९८.
भारतात राजकारण बदलत चाललं होतं. सोनिया गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला होता. काँग्रेसचं नेतृत्व मात्र अजून सीताराम केसरी आणि शरद पवार यांच्या हातात होतं. १९९६ साली सर्वात जास्त जागा मिळवून देखील १३ दिवसात राजीनामा द्यावा लागलेले अटलबिहारी वाजपेयी मात्र यंदा जोशात होते. काहीही झालं तरी यावेळी सत्ता काबीज करायचीच हे त्यांचं उद्दिष्ट होतं.
नेहमीप्रमाणे प्रचारात सगळ्यात आघाडीवर होते प्रमोद महाजन.
खरं तर तेव्हा भाजपमध्ये महाजनांना लालकृष्ण अडवाणी गटाचे मानले जायचे. त्यांनी जेव्हा अडवाणींना रथयात्रा काढायला लावली तेव्हा वाजपेयी प्रचंड चिडले होते. महाजन हे आपला अकार्यभाग साधण्यासाठी प्रसंगी वेगळ्या मार्गाचा देखील वापर करतात अशी वदंता होती. पार्टी विथ डिफरन्स म्हणवल्या जाणाऱ्या भाजपमध्ये या गोष्टीला जागा नाही असं वाजपेयींना वाटायचं.
मात्र १९९८ च्या निवडणुकीत त्यांना महाजनांच महत्व जाणवलं.
अनेक ठिकाणी महाजनांनी फायनल केलेले उमेदवार निवडणुकीत उतरले. विशेषतः महाराष्ट्रात प्रमोद महाजन यांनी आपला गड मजबूत केला होता. विधानसभेत त्यांचीच सत्ता होती. त्यांचे बंधुतुल्य मित्र गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते.
देशभरात भाजपचं वारं होतं, महाराष्ट्रात सुद्धा ते असणार असाच सगळ्यांना वाटत होतं. पण तस घडलं नाही.
महाजनांची यवतमाळची सभा विशेष गाजली. या सभेत त्यांनी सोनिया गांधींवर काही अश्लाघ्य टीका केल्याचं बोललं गेलं. त्यांनी पार बिल क्लिंटन मोनिका लेवेन्स्की प्रकरणा पर्यंतची उदाहरण या सभेत दिली. नेहमी प्रमाणे त्यांची सभा रंगली नाही. जनमताचा ओढा उलट्या दिशेने वाहत होता.
अटलजींचे गुणगान करता करता ते म्हणाले की,
अटलजी जवळ जवळ ५० वर्षांपासून राजकारणात आहेत परंतु आजवर त्यांच्या धोतरावर कुठलाही डाग पडलेला नाहीये, अपवाद तुम्ही मारलेल्या मतदानाच्या शिक्क्यांचा.
यावर श्रोत्यांमध्ये बसलेला एक युवक चटकन उभा राहून ओरडला, यावेळी तोही पडू देणार नाही.
रागाने लाल झालेल्या प्रमोद महाजन यांच्या लक्षात आलं होतं यंदा आपले खरे नाही. त्या निवडणुकीत भाजपला संपूर्ण महाराष्ट्रात फक्त ४ सिटा निवडणून आणता आल्या. खुद्द प्रमोद महाजन देखील ईशान्य मुंबईच्या मतदार संघातून पडले.
संपूर्ण भारतात भाजपने चांगली कामगिरी केली. अटलबिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान बनले. भाजपच्या गोटात आनंद होता. मात्र स्वतः निवडणुकीत हरलेले प्रमोद महाजन मात्र प्रचंड निराश झाले होते. मागच्यावेळी अटलजींच्या तेरा दिवसांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे संरक्षण खात होतं. मात्र यावेळी आपल्याला काहीही स्थान मिळणार नाही हे महाजनांच्या लक्षात आलं.
ते दिल्लीतील आपलं सामान भरून मुंबईला परत निघाले होते. ते पालम विमानतळाकडे निघाले असता अचानक त्यांना अटलबिहारी वाजपेयी यांचा फोन आला. खरं तर त्यांना माहित होत कि आपण अटलजींच्या गुड बुक्स मध्ये नाही तरीदेखील त्यांचा फोन आला याच खूप आश्चर्य वाटलं.
अटलजींनी त्यांना सांगितलं कि
मी आत्ता तरी तुला माझ्या मंत्रिमंडळात घेऊ शकत नाही तरी त्याच्या ऐवजी तू माझा राजकीय सल्लागार बनशील का ?
काठावरचे बहुमत असलेल्या एनडीए सरकार चालवायला अटलजींना प्रमोद महाजन यांच्यासारखा चलाख डोक्याचा पोलिटिकल मॅनेजर लागणार होता. त्यांनी महाजनांना ती ऑफर दिली आणि चक्क त्यांनी ही स्वीकारली. या सगळ्या घडामोडीत त्यांची एकच चूक झाली, आपले राजकीय गुरु लालकृष्ण अडवाणी यांची परवानगी त्यांनी घेतली नाही.
याचा प्रमोद महाजन यांना त्यांच्या राजकारणात दुरोगामी फटका बसला.
पुढच्या काळात ते अटलबिहारी वाजपेयी यांची सावली बनले. त्यांच्या प्रत्येक निर्णयात प्रमोद महाजन यांची छाप दिसू लागली. ते खुले आम महाजन यांना आपला लक्ष्मण असं संबोधू लागले. स्वपक्षीयांमध्ये देखील महाजनांचे वाढते महत्व खपेनासे झाले. त्यांनी अडवाणींच्या कडे त्यांचं कान भरण्यास सुरवात केली.
प्रमोद महाजन याना रिलायन्स प्रकरणात द्यावा लागलेला मंत्रिपदाचा राजीनामा, २००२ च्या दंगलीत वाजपेयींनी मोदींचा मागितलेला राजीनामा, पुढे २००४ मध्ये त्यांच्या शायनिंग इंडिया कॅम्पेनिंगला आलेले अपयश या सगळ्या मध्ये त्यांचा आणि अडवाणींचा दुरावा वाढत गेला.
वाजपेयींच्या निवृत्तीनंतर पक्षाची सारी सूत्रे अध्यक्ष व विरोधी पक्ष नेते या नात्यांनी अडवाणींच्या हाती आली होती. येथून प्रमोदचे पंख कापण्याचे काम पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने पद्धतशीरपणे हाती घेतले. अनेक इतर नेत्यांना बळ देऊन प्रमोद महाजन यांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु झाला.
प्रमोद महाजन यांनी पक्ष नेतृत्वाशी संघर्ष करत राजकारणात पुनरागमनाची तयारी सुरु देखील केली होती, मात्र दुर्दैवाने त्यांच्या भावाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि प्रमोद महाजन पर्वाचा अंत झाला.
हे ही वाच भिडू.
- तुरुंगात असतानाच प्रत्येकाला कळालं होतं प्रमोद देशपातळीवरचा मोठा नेता होणार आहे.
- अहो चंद्रकांत दादा, अब्दुल कलाम मोदींमुळे नव्हे तर प्रमोद महाजनांमुळे राष्ट्रपती झाले होते
- आणि प्रमोद महाजनांनी चीनच्या नेत्याला भारतीय लोकशाहीचा अर्थ समजावून सांगितला.
- भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या IAS अधिकाऱ्याचं महाजनांनी तिकीट कापलं याला एक कारण होतं..