ज्याने एकदाही कॅंटिनचे बिल थकविलेले नाही, तो माणूस एवढा मोठा घोटाळा करणे शक्यच नाही

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. हवालाकांड तापल होतं. प्रत्येक पक्षातले लहानमोठे १०० नेते यात सापडले होते. भारताने आत्ता पर्यंत पाहिलेला सर्वात मोठा घोटाळा म्हणून मिडीयाने हवा केली होती.

यात सर्वात मोठा मासा गळाला लागला होता तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी.  

रामजन्मभूमी आंदोलनातील रथयात्रेमुळे घराघरात पोहचलेले लालकृष्ण अडवाणी यांच्यावर आत्ता पर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप आता पर्यंत झालेला नव्हता. दहशतवाद्यांकडे सापडलेल्या डायरीत एल.के हीआद्याक्षरे ही अडवाणी यांच्यासाठीच लिहिलेली आहेत असा दावा अनेकजण करत होते.

अस म्हणतात की तेव्हाचे पंतप्रधान नरसिंह राव यानी माधवराव शिंदे, अर्जुन सिंह अशा आपल्या पक्षातील स्पर्धकांना आणि अडवाणी यांच्या सारख्या विरोधी पक्षातील नेत्यांना नेसतनाबूत करण्यासाठी हा घोटाळा बाहेर काढला आहे.

एकदा आरोप झाले की दबक्या आवाजात चर्चा सुरु होते. चारित्र्याचे खुलेआम वाभाडे काढले जातात.

लालकृष्ण अडवाणी यांनां स्वतःवर झालेले हे आरोप खूप वेदना देऊन गेले. त्यांनी आरोप झाल्या झाल्या खासदारकीसकट आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सर्वाना वाटलं की अडवाणी यांची राजकीय कारकीर्द संपली. अख्खा देश त्यांच्याकडे संशयाने पहात होता.

अशात संसदेत हवालाकांडवर घनघोर चर्चा सुरु झाली. दोन्ही पक्ष एकमेकांवर जोरदार आरोप करत होते.

अशात जनता पक्षाचे माजी पंतप्रधान चंद्र्शेखर बोलण्यासाठी उठले सगळा सभागृह चिडीचूप शांत झाला. प्रत्येकाच लक्ष चंद्र्शेखर काय बोलतात या कडे लागल होतं.

ते म्हणाले,

संसदेतील असे अनेक खासदार तुम्हाला मिळतील की ज्यांनी संसदेच्या कॅंटिनचे बिल थकविलेले आहे. पण अडवानी असे खासदार आहेत की ज्यांनी एकदाही कॅंटिनचे बिल थकविलेले नाही. जो माणूस कॅंटिनचे बिल भरण्यात इतकी तत्परता दाखवितो. दुसऱ्याकडून पैसे खाईल याच्यावर माझा तरी विश्‍वास नाही.”

चंद्रशेखर यांच्या सारख्या जेष्ठ विरोधी पक्ष नेत्याने अडवाणी यांना स्वच्छ चारित्र्याचे सर्टिफिकेट दिल्यामुळे अडवाणी यांच्या वरील आरोपाची हवाच निघून गेली.

पुढे अडवाणीनां कोर्टातदेखील क्लिनचीट मिळाली. अडवाणींनी थाटात पुनरागमन केलं. देशाचे गृहमंत्री, उपपंतप्रधान बनले. आजही अडवाणी हवाला कांड विषयी बोलताना म्हणतात की,

“जेव्हा सगळा देश माझ्या विरोधात गेला होता तेव्हा विरोधी पक्षाचे, विरोधी विचारसरणीचे चंद्रशेखर मात्र माझ्यावर विश्वास ठेवणारे एकमेव व्यक्ती होते. त्यांच्यामुळेच मला या संकटातून बाहेर पडण्यासाठीचा धीर मिळाला.”

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.