लालूंच्या सुपीक डोक्यातली ही कल्पना गरीबरथ बनून धावू लागली !

कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये रेल्वे पुर्ण सहा महिने बंद होती. रेल्वेच्या जवळपास १६७ वर्षांच्या इतिहासत पहिल्यांदाच इतक्या दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता हळू हळू रेल्वे पुन्हा रुळावर येत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा सुरु होत आहेत.

पण प्रवास लांबचा असो कि जवळचा, स्वस्तात मस्त असलेली रेल्वे आपल्यापैकी अनेकांना जवळची वाटते, आधार ठरते. यामध्ये मग मुंबईचा लोकलचा प्रवास असो, कि आसेतु हिमाचल प्रवास करणारी हिमसागर एक्सप्रेस असो. रेल्वे इस बेस्ट.

वाफेच इंजिन, लाकडी सांगाडा व त्यामध्ये बसविलेल्या पोलादी चौकटीचे तीन डबे आणि त्यांना चार चाक अशी पाहिली रेल्वे १८५३ मध्ये धावली. त्यावेळी लोक तिला चार चाकांची वाघीण म्हणायचे. नंतरच्या काळात रेल्वेमध्ये नवनवीन प्रयोग होत गेले. स्वातंत्रोत्तर कालखंडात रेल्वे मार्गांची आणि गाड्यांची देखील संख्या वाढली. कालौघात वाफेच इंजिन जाऊन डिझेलचे इंजिन आले,विद्युतीकरण झाले. फक्त पोलादी डब्यांची संख्या देखील १७ झाली.

स्थानिक प्रवासासाठी मुंबई, पश्चिम बंगालमध्ये उपनगरीय रेल्वे सुरु झाली. लांब पल्ल्यासाठी राजधानी, शताब्दी, दूरंतो, जन शताब्दी अशा काही एसी गाड्या सुरु झाल्या. पण या सगळ्या एसी गाड्या श्रीमंत वर्गासाठी होत्या. गरीब लोक जनरलच्या डब्यातूनच प्रवास करत होता. 

२१ वे शतक उजाडले तरी अजूनही रेल्वेकडे गरीब माणूस एसीने ते ही स्वतःत प्रवास करु शकेल अशी रेल्वे नव्हती.

गोष्ट आहे २००६ मधली. कॉंग्रेसने मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करून २ वर्ष झाली होती. याच सरकारमध्ये बिहारच्या लालू यादव रेल्वेमंत्री होते. त्यांनी जेव्हा रेल्वेमंत्रिपदाची सूत्र घेतली होती तेव्हा रेल्वे जवळपास दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. रोख शिल्लक २५९ कोटींवर घसरली होती. ऑपरेटिंग रेश्यो ९८ टक्क्यांवर वर होता. अनेक प्रकल्प निधीअभावी रखडले होते.

तसेच लालू प्रसाद बिहारचे मुख्यमंत्री असताना फक्त चारा घोटाळ्यामुळे सर्वाना परिचित होते. असा हा भ्रष्टाचाराचा शिक्का बसलेला बिहारचा ‘रांगडा गडी’ देशव्यापी, अवाढव्य पसाऱ्याच्या रेल्वेचा कारभार कसा काय सांभाळणार, लालू रेल्वेला आता आणखी गाळात घालणार, अशी अनेकांची अटकळ होती.

लालू आपल्या ‘गोपालगंज से रायसीना’ या आत्मचरित्रात सांगतात, एकदा एका पत्रकार परिषदेत लालूंना खाजगीकरणाच्या आणि इतर खर्च कमी करण्या संबंधीचे प्रश्न विचारण्यात आले.

त्यावेळी त्यांनी भर परिषदेत सांगितले होते, ‘रेल्वेचे खासगीकरण होईल ते माझ्या मेलेल्या देहावरून. आणि पगारा संदर्भात सांगायचं झालं तर एकही रेल्वे कर्मचार्‍यांचा पगार कमी करणार नाही. आणि प्रवाशांचे भाडे वाढवले ​​जाणार नाही. परंतु नवीन रेल्वे लाईन सुरू केली जाईल आणि नवीन नवीन प्रोडक्शन युनिट उघडले जातील जेणेकरून नवीन रोजगार निर्माण होतील, असे सांगत त्यांनी खाजगीकरणाचा विषय फेटाळून लावला.

मात्र २००९ साल उजाडताना त्यांनी या सर्व अटकळी खोटय़ा ठरविल्या होत्या. २००५ साली आल्या आल्या त्यांनी रेल्वेची प्रति वगन ५ टन या प्रमाणे मालवाहतूक क्षमता वाढवली. ज्यामुळे प्रतिवर्षी 90 मिलियन टन वाहतूक क्षमता वाढली. परिणामी रेल्वेचा महसूल वाढला. सोबतच प्रवासी रेल्वेंचे डबे आणि सरासरी वेग वाढवला.

लालू सांगतात, या सगळ्याचे परिणाम २ वर्षातच दिसायला लागले. २००६ मध्ये रेल्वेचा महसूल सरप्लस वाढून १५ हजार कोटी झाला, मग मी प्रवासी भाड्यात कपात करण्याची घोषणा केली. आणि तोट्यातील रेल्वे पुन्हा नफ्याच्या रुळावर आणून दाखवली.

लालूंनी आता प्रवाशांच्या सोयी-सुविधांवर लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यांची अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची एक वेगळीच स्टाईल होती. त्यात खास बिहारी बाज असायचा.

 २००६ मध्ये एकदा अशीच रेल्वे विभागाची मिटींग चालू होती. आणि त्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या बिहारी मजुरांची आकडेवारी आणि काही फोटो समोर होते.

आणि ते पाहून त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये निर्देश दिले.

गरीब को पटना से दिल्ली AC से मुर्गा के दाम पर भेजो; सस्ते दामोमें, गरोबोंको बेहतरिन यात्रा सुविधा मिलनी चाहिये.

लालूंच्या याच ‘मुर्गा के दाम’ संकल्पनेला आकार दिला सुधीर कुमार यांनी. आणि ‘गरीबरथ’चा जन्म झाला. कुमार यांनी त्यावेळी सांगितले होते, रेल्वेने दररोज एक कोटीपेक्षा अधिक जण प्रवास करतात. त्यामधील ५० हजार प्रवासी हे एसी श्रेणीमधील असतात. विमानाने प्रवास करणे देखील आता स्वस्त झाले आहे. अशा परिस्थितीत रेल्वे गरीब प्रवाश्यांसाठी प्रवासात मूलभूत बदल करणे आवश्यक झाले होते.

यानंतर २००६-०७ च्या रेल्वे बजेटमध्ये गरीबरथची घोषणा करण्यात आली.

गरीब वर्गाला केंद्रित ठेवून एसी प्रवास ते ही इतर गाड्यांपेक्षा दोन तृतीयांश दरात.

पण त्यावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. आधीच तोट्यात असलेल्या रेल्वेला एवढा खर्च झेपणार का?

गरीबरथ चालू करण्याचा उद्देश केवळ चांगल्या सुविधा देणे एवढाच नव्हता. तर त्याच्यामागे एक मोठे आर्थिक गणित देखील होते.

त्यानुसार कपूरथला आणि चेन्नईच्या कोच कारखान्यात गरीबरथचे डबे डिझाईन केले. त्यात अधिकाधिक प्रवाशांना प्रवास करता यावा यासाठी पँट्री कार काढून टाकण्यात आल्या, जागांची संख्या वाढवण्यात आली. सामान्य परिस्थितीमध्ये रेल्वेत १७ डबे आणि तृतीय श्रेणी वातानुकूलित कोचमध्ये ६४ बर्थ होते, पण ‘गरीबरथा’तील डब्यांची संख्या २४ करण्यात आली, प्रत्येक डब्यामधील उंची आणि लांबी किंचित वाढवून २ कोचच्या जागी ३ कोच जोडले गेले. अशी एकूण ७८ बर्थची रचना करण्यात आली.

पुढे त्यावर्षीच्या दुर्गापूजा आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर ५ ऑक्टोंबर २००६ मध्ये बिहारमधील सहरसा ते पंजाबमधील अमृतसरच्या दरम्यान पहिली गरीबरथ धावली.

आज देशभरातील जवळपास २६ मार्गांवर गरीबरथ धावत आहे. २०१९मध्ये ही रेल्वे बंद करून त्याची जागा हमसफरला देण्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्यानंतर काही दिवसामध्येच रेल्वेने या गाड्या बंद करणार नसल्याचे स्प्ष्टीकरण दिले.

‘गरीबरथ’ नंतर बदलत्या काळानुसार नंतरच्या वर्षांमध्ये दुरांतो, हमसफर एक्स्प्रेस, तेजस, वंदे भारत, अशा गाड्या रेल्वेने सुरु केल्या. मुंबई – अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन देखील येवू घातली आहे. पण या सगळ्यातही गरीबांसाठी अगदी स्वस्तामध्ये फुल एसी गाडीतुन प्रवासाच स्वप्न पुर्ण केलं ते लालू प्रसाद यादव यांनीच.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.