लालूंनी चक्क साध्या धोबिणीला विधान परिषदेवर पाठवलंय

स्कुटरवरून ४०० बैल कुणी मागवू शकतं तर अक्ख्या जगात तसा फक्त एकच व्यक्ती आहे, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव. म्हणजे कस तर चारा घोटाळ्यात काही गोष्टींच वर्णन करण्यात आलं आहे. यात एका कागदपत्रांमध्ये अस सांगण्यात आलय की ४०० वळू रांचीला आणण्यात आले, पण कसे तर चक्क स्कूटरवरून..

असाच एक लालू यादव यांचा निर्णय सध्या चर्चेत आला आहे.

पण हा घोटाळ्याशी संबंधित नसून चांगल्या कामाचा आहे. झालय असं की,  लालूंच्या आरजेडी पक्षाने विधानपरिषदेसाठी एका साध्या धोबिनीला तिकीट देत थेट आमदार केलंय. बिहारमध्ये ९ जून ही विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. 

सात जागांसाठीचा हा खेळ होता ज्यात बरोबर सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर १३ जून ही माघारीची शेवटची तारीख होती. पण एकाही उमेदवाराने माघार न घेतल्याने सगळे उमेदवार बिनविरोध निवडून आले. सातही उमेदवारांना निवडणूक प्रमाणपत्रं देण्यात आली. या सात जागांवर भाजपचे दोन, जेडीयूचे दोन आणि आरजेडीचे सर्वाधिक तीन उमेदवार निवडून आले. 

या सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती एकाच नावाची – मुन्नी रजक. 

कारण काय तर मुन्नी रजक म्हणजे फक्त एक साधी धोबीन आहे, जिला डायरेक्ट आमदारकी देण्यात आली आहे. वयाची चाळिशी ओलांडलेल्या मुन्नी रजक या गेल्या ३० वर्षांपासून धोबीन म्हणून कार्यरत आहेत. 

अगदी बालपणापासून हाच त्यांचा पेशा आहे. त्यांनी माध्यमांना सांगितल्याप्रमाणे, मुन्नी यांच्याकडे साधा मोबाईल देखील नव्हता. म्हणून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आरजेडीचे नेते त्यांना शोधत बख्तियारपूरमधल्या त्यांच्या घरी येऊन पोहोचले. त्यांना बघून मुन्नी काहीशा गोंधळळ्या.

पक्षाचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी सांगितलं साहेब म्हणजेच लालूप्रसाद यादव त्यांना शोधत आहेत. त्यानंतर ते मुन्नी यांना लालूंच्या घरी घेऊन गेले. तिथे लालूंच्या पत्नी राबडी देवी, तेज प्रताप यादव असे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की मुन्नी यांना आमदार बनायचंय.

हे ऐकून त्या काहीशा शांत झाल्या मात्र थोड्याच वेळात आभार मानत तयार झाल्या. 

आता पाणी कुठे तरी मुरतंय असं वाटत असेल. असं कसं गेले आणि कुणालाही आमदार बनवलं? मुन्नी यांनाच का निवडण्यात आलं? असे प्रश्न पडत असतील. तर याचं उत्तर म्हणजे मुन्नी जरी साध्या धोबीन असल्या तरी त्या पक्षाला अगदीच नवीन चेहरा नाहीये. मुन्नी गेल्या काही वर्षांपासून आरजेडीच्या समर्थक राहिल्या आहेत आणि याचं मुख्य कारण आहे लालू प्रसाद यादव.  

काही वर्षांपूर्वी बख्तियारपूरमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंटच्या विरोधात आणि आरजेडीच्या बाजूने मुन्नी यांनी व्यासपीठावर गाणं गायलं होतं, त्यावेळी पक्षाचं पहिल्यांदा त्यांच्याकडे लक्ष गेलं. 

१० वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्या पक्षाने आयोजित केलेल्या प्रत्येक धरणे आंदोलनात सहभागी राहिल्या आहेत. लालूंना जेव्हा घोटाळ्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि दरम्यान ते इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार घेत होते तेव्हा मुन्नी त्यांना भेटण्यासाठी रांचीच्या गेल्या होत्या. पण अधिकाऱ्यांनी त्यांना नकार दिला तेव्हा बाहेरच जोरजोरात रडत सांगत होत्या की लालूंना फसवण्यात आलंय.

 इतकंच काय अलीकडेच जेव्हा सीबीआयने लालूंच्या निवासस्थानावर छापा टाकला तेव्हा त्यांनी घराबाहेर बसून धरणे आंदोलन केलं होतं. अशाप्रकारे त्या आरजेडीच्या कार्यकर्त्या कम लालू फॅन आहेत, असं दिसतंय. 

मुन्नी रजक यांना पक्षाने तिकीट देण्यामागे नक्की काय कारण विचारल्यावर पक्षाने सांगितलंय की,

एका साधारण कार्यकर्त्याला संधी देऊन पक्षाने नेहमीची प्रथा तोडली आहे.  त्या आजही पुलाखाली कपडे धुतात. यामुळे तळागाळातील लोकांना साथ देण्यात आरजेडी नेहमी तयार आहे, हा संदेश द्यायचा आहे. शिवाय मुन्नी या दलित आहे.

 तेव्हा मुन्नी यांना प्रोत्साहन म्हणजे दलितांना पक्षाने प्रोत्साहन दिलं आहे. 

मात्र यात एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा म्हणजे. मुन्नी यांचं आडनाव. रजक. रजक म्हणजे धोबी. धोबी हा फक्त मुन्नी यांचा पेशा नाही तर जात देखील आहे. बिहारमध्ये केवळ धोबी समाजाची संख्याच १० लाखांपेक्षा जास्त आहे. तेव्हा त्यांना संधी देऊन पक्षाने बिहारमधील सगळ्या धोबी समाजाच्या मतांना ओढलं आहे. तसं पक्षाकडे श्याम रजक हा पक्षाचा अधिकृत दलित चेहरा आहे. 

पण त्यांचं पक्षातून जाणं परत पक्षात येणं या धोरणामुळे पक्षाने त्यांना साईडलाईन करण्यासाठी मुन्नी रजक यांना एस्टॅब्लिश केलंय. याने त्यांचा हेतूही साध्य झालाय आणि श्याम रजक यांची दलित मतं देखील कुठेच गेली नाहीत, असं विश्लेषकांचं म्हणणंय.

पण दुसरीकडे मुन्नी रजक यांना ही संधी देण्याबाबत विरोधी पक्षाकडून टीका होतीये. 

भाजपचे आमदार नवल किशोर यादव म्हणालेत की, 

मुन्नी रजकचा फक्त चेहरा समोर केलाय. आमदार म्हणून वाटप केलेल्या त्यांच्या पैशाचा वापर लालू कुटुंबीय करतील. दरम्यान मुन्नी यांचं यावर म्हणणंय की, लालू गरिबांचा मसीहा आहेत. मी फक्त जातीने नाही तर कामाने धोबी आहे, तेव्हा सभागृहात जातीयवादी शक्तींना पटकू पटकू धुणारेय, असं मुन्नी म्हणाल्या आहेत.

लालूंची ही निवड खरंच सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी आहे. आणि त्यातही मोठी गोष्ट म्हणजे कोणत्याही विरोधाशिवाय ही निवड झाली आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.