लालू -राबडींनी धाकट्या मुलावर विश्वास टाकला, त्यानं पक्ष टिकवला, सत्तापण आणली

महाराष्ट्रात सत्ताबदलच्या जोरदार घडामोडी चालू असताना तिकडे बिहारमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी खात भाजपची साथ सोडत लालू प्रसाद यांच्या आरजेडीशी मिळून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे २४ तासाच्या आत म्हणजे आज दोन वाजता हे नवीन सरकार स्थापन देखील झालं. यामध्ये नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री.

मात्र या सरकारमध्ये तेजस्वी यादव यांचा वरचष्मा असणार हे फिक्स आहे. विशेष म्हणजे लालू प्रसाद पुरते खंगले असताना, त्यांच्यामागे चौकशींचा ससेमिरा चालू असताना आणि महत्वाचे म्हणजे २००५ पासून मधली दोन वर्षे सोडली तर सत्तेपासून दूर असताना देखील लालूंचा पक्ष आज बिहारमधला सर्वात मोठा पक्ष आहे. इतक्या दिवस सत्तेत राहूनही राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांना तेजस्वी यादव यांच्याकडेच जावं लागलं. तेव्हाही २०१७ मध्ये नितीश कुमार यांनी दिलॆला धोका मागं टाकत तेजस्वी यादव यांनी  मोठं मन दाखवत हा घरातला चाचा भतीजा यांच्यातील वाद असल्याचं म्हणत पुन्हा नितीश कुमार यांच्याबरोबर सरकार स्थापन करण्यास ते तयार झाले आहेत.

मार्च महिन्यातच तेजस्वी यादव यांची राष्ट्रीय जनता दलाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. 

विशेष म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठे असलेल्या तेजप्रताप आणि मिसा या भावंडाना मागे सारत मार्च महिन्यातच तेजस्वी यादव यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पण २०१५ आणि २०२० च्या निवडणुकातच तेजस्वी यांनी आपली नाणं वाजवून दाखवलं होतं.

त्यातल्या त्यात २०२० च्या विधानसभा निवडणुकीत. आरजेडीच्या नेतृत्वाखालील महागठबंधनने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला टफ फाइट दिली होती. एनडीएने १२५ जागांवर विजय मिळवला होता तर महागठबंधनने ११० जागांवर. यातही ७७ जागा जिंकत आरजेडी सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. मात्र मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने कच खाल्ल्याने महागठबंधनचं सरकार येऊ शकलं नव्हतं. 

मात्र आरजेडीच्या या परफॉर्मन्सचा सगळं श्रेय देण्यात आलं होतं दिवसाला १०-१० सभा घेणाऱ्या तेजस्वी यादव यांच्या झंझावाताला.

प्रचाराच्या सुरुवातीला नितीशकुमार यांचा एनडीए आणि भाजप आरामात विजयी होईल, असे बहुतांश निरीक्षकांचे मत होते. शिवाय लालू प्रसाद यादव यांच्या उपस्थितीशिवाय आरजेडीला गंभीर दावेदार म्हणून पाहिले जात नव्हते. तथापि निवडणुकीच्या प्रचारात तेजस्वीने यशस्वीपणे गेम आपल्या बाजूने वळवले आणि एनडीएला टफ फाइट दिली.

या संदर्भातच तेजस्वी यांचा उदय महत्त्वाचा ठरतो कारण ते तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करतात.  ज्यांना त्यांच्या आशा आणि आकांक्षा समजून घेणारा एक नवीन नेता तेजस्वी यादव यांच्यामध्ये  दिसतो. त्यांच्या 10 लाख नोकऱ्यांचे आश्वासन, त्यापैकी निम्म्या सरकारी  नोकऱ्या याने तरुणांत मोठ्या आशा निर्माण झाल्या.

या प्रचारात तेजासी यादव पूर्णपणे स्थानिक समस्या आणि गरजांबद्दल बोलले.

महागठबंधनच्या जाहीरनाम्यामध्ये नोकऱ्या, चांगले शिक्षण, महागाई आणि उत्तम प्रशासन यासारख्या लोकांच्या मागण्या होत्या. त्यामुळे आरजेडी म्हणजे  यापुढे मुस्लिम आणि यादवांचा ‘MY ‘ पक्ष नं राहता तो समाजातील सर्व घटकांचा एक A-to-Z पक्ष म्हणून पुढे आला. 

हे सगळं चालू असताना लालूप्रसाद यादव यांची जेलवारी चालू होती. चारा घोटाळ्यातील एक एक गोष्ट बाहेर काढून लोकांना लालूंची राजवट किती भ्रष्ट होती याची आठवण करून दिली जात होती. प्रत्येकवेळी त्यांच्या जंगलराजची आठवण करून दिली जात होती. मात्र आरजेडीच्या ही प्रतिमा बऱ्यापैकी मागे  टाकण्यात तेजस्वी यशस्वी झाले होते. 

सत्ता आली नसली तरी तेजस्वी यादव यांनी आपले प्रयत्न सोडले नव्हते. 

पक्ष वाढवण्यासाठी, पुढे नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालूच होते. ज्या एमआयएममुळे गठबंधनला फटका बसला होता. त्या एमआयएमचे पाचपैकी चार आमदार तेजस्वी यादव यांनी आपल्या पक्षात आणले आहेत.

आता नितीश कुमार यांच्याबरोबर युती असेल तेव्हा तेजस्वी यादव यांचीच ताकद वाढणार आहे असं जाणकार सांगतात. कारण आरजेडीचा ग्राफ गेल्या काही निवडणुकांत वाढता राहिला आहे. त्याला आत्ता सत्तेचा बूस्ट भेटणार आहे. मात्र त्याचवेळी जदयू आपल्या बॅडपॅचमधून जात आहे. नितीश कुमार यांच्यानंतर कोण याचे उत्तर त्यांना शोधायचं आहे. मात्र हे उत्तर लालूंनी शोधलं आहे. 

 विशेष म्हणजे आरजेडीने आपला पिंड देखील सोडलेला नाहीये.  

आरजेडी देशातल्या काही मोजक्याच्या पक्षांपैकी आहे ज्यांनी भाजपविरोधातला आपला स्टॅन्ड कधीही बदललेला नाहीये आणि आता त्यांना तेजस्वी यादव यांच्या रूपाने एक सक्षम नेता भेटल्याच्या चर्चा आहेत. आज कधी काळी  लालूप्रसाद यांचे साथीदार असलेले नितीश कुमार आणि शरद यादव हे मोठे नाही म्हटले तरी तेजस्वी यादव यांच्या बरोबरीने काम करत आहे आणि आज संख्येत तरी तेजस्वी यादव या दोघांच्या पुढे आहेत.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.