मुख्यमंत्री लालू यादव फक्त तहान लागली म्हणून विमान लँड करायचा हट्ट धरून बसले होते ..

जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून सुरुवात करणारे लालू प्रसाद यादव १९७७ पासून बिहारच्या राजकरणाचा केंद्रबिंदू बनून आहेत. दोन वेळा मुख्यमंत्री बनणाऱ्या लालूंना चारा घोटाळ्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. पुढे जाऊन ते रेल्वेमंत्रीही झाले होते.

देशाच्या राजकारणात नेहमी चर्चिले जाणारे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. आपल्या इरसाल गावरान ढंगात ते बोलतात, घरी असले कि गाईची धार काढतात, कधी कधी भर सभेत पत्रकारांचे कान पकडतात. त्यांना आवरणे खुद्द पंतप्रधानांना शक्य होत नाही.

लालूंच्या बिंधास्तपणाचे अनेक किस्से लोकप्रिय आहेत. मुख्यमंत्री असतांना ते एकदा म्हणाले होते बिहारचे रस्ते हेमा मालिनी यांच्या चिकण्या गालासारखे तयार करण्यात येईल. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

असाच एक किस्सा आहे. जेव्हा मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना विमान प्रवासा दरम्यान तहान लागते.

ही घटना आहे १९९१ ची. तेव्हा लालू प्रसाद यादव हे बिहारचे मुख्यमंत्री होते. ओडिशातील पुरी येथे जनता दलचे राष्ट्रीय अधिवेशन भरले होते. लालू प्रसाद जनता दल मध्ये होते. लालू प्रसाद यादव अधिवेशनासाठी खासगी विमानाने पुरी येथे गेले होते.

पुरी वरून येतांना लालू आपल्या सोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकारांना घेवून विमान प्रवास करत होते. त्यावेळचा हा किस्सा.

पुरीतील अधिवेशनातवरून निघतांना लालू प्रसाद यादव यांना एक मित्र भेटला. आता जुना दोस्त तो हि लालूंचा म्हटल्यावर दोघांच्या अस्सल बिहारी स्टाईलमध्ये गप्पा सुरु झाल्या. लालू गप्पांचे आणि सोबतच खाण्याचे शौकीन आहेत. त्यांच्या दोस्ताला हे ठाऊक होतं. त्याच्या बायकोने प्रवासात खाण्यासाठी भूजा (बिहारी पदार्थ) दिला होता. तो त्यांनी लालूंना ऑफर केला. 

लालू भुजा बघून खुश झाले. भुजा थोडासा तिखट पदार्थ आहे. एरव्ही तब्येतीचे नियम पथ्य यामुळे लालूंना भुजा खायला मिळायचा नाही. पण दोस्ताने खास बांधून आणलेला भुजा त्यांनी मिटक्या मारत खाल्ला. पण हा तिखटजाळ भुजा खाल्यावर त्यांना भयंकर तहान लागली. मुख्यमंत्र्यांना तहान लागली आहे म्हटल्यावर विमानात धावपळ सुरु झाली. तिथल्या कर्मचाऱ्यांकडे पाण्याबद्दल विचारण्यात आलं. पण योगायोगाने विमानात पिण्याचे पाणी नसल्याचे सांगण्यात आलं.

त्या काळात बिहार मध्ये बंद बॉटल मधून पाणी मिळत नव्हते आणि विमानात तर पिण्याचे पाणी तर उपलब्ध नाही. मग काय करायचे.

पटना ऐवजी रांचीला विमान उतरविता येईल का?

यावेळी लालू यांनी पायलटला विचारले आता आपण नेमके कुठे आहोत. त्याने आपण रांची जवळ असल्याचे सांगितले. तेव्हा अजून झारखंड राज्याची निर्मिती झाली नव्हती. रांची शहर हे बिहार राज्यात होते. लालू तेव्हा बिहारचेच मुख्यमंत्री होते. इरसाल रांगड्या व्यक्तिमत्वाच्या लालूंना आपण इथला मुख्यमंत्री आहे त्यामुळे विमान रांची विमानतळवर उतरतांना काही अडचण येणार नाही असे वाटले.

लालू यांनी पायलटला सांगितले की पटना ऐवजी रांची विमानतळावर विमान उतरवून पाणी पिऊन पुढे मग जाता जाता येईल.

पायलट ने लालू यांच्या आदेशावरून हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. आपल्या विमानात बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद आणि इतर महत्वाचे लोक असल्याचे सांगत विमान उतरविण्याची परवानगी मागितली. मात्र हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून विमान उतरविण्याची परवानगी नाकारण्यात आली.

नेमके त्यावेळी रांची विमानतळावर तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री सुबोध कांत सहाय यांचे विमान उतरले होते. सुरक्षेच्या कारणामुळे लालुंच्या विमानाला रांची विमानतळावर उतरविण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. 

काही वेळ रांची विमानतळावर लालू यांचे विमान घिरट्या घालत होते. त्यानंतर लालूंचे विमान पटना विमानतळाकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांच्या विमानाची लँडिंग नाकारण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

लव कुमार मिश्रा

टाईम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार राहिलेले लव कुमार मिश्रा यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे. लव कुमार मिश्रा यांनीच लालू प्रसाद यादव यांना विमानप्रवासा दरम्यान खाण्यासाठी  भूजा दिला होता.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.