लालूप्रसाद यादव आणि भाजपा यांची युती शक्य आहे काय?

बिहार निवडणुकीचे मतमोजणी सुरु आहे. एक खरं आहे कि नितीशकुमार यांचा पराभव होणार आहे. एक्झिट पोल पासून याची चर्चा सुरु होती. महागठबंधनला बऱ्याच जागा मिळणार हे देखील दिसत होतं. पण आज सकाळपासून पाहिलं तर एक दिसेल की बिहार मध्ये त्रिशंकू अवस्था होणार आहे हे नक्की.

अस जर झालं तर काय नेमक घडेल?

गेली पंधरा वर्षे नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. पूर्वी ते भाजपप्रणीत एनडीएमध्ये होते पण नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाला विरोध करत ते एनडीएमधून बाहेर पडले. आपले सख्खे विरोधक लालूंच्या आरजेडीबरोबर घरोबा करून परत मुख्यमंत्रीपद पटकावल. मात्र लालूंच्या बरोबर झालेली भांडणे त्यांना फार काळ सरकारमध्ये टिकू दिली नाही. ज्या भाजप विरुद्ध निवडणूक लढवली त्यांच्या शि पुन्हा युती करत ते परत एनडीएमध्ये आले आणि मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकवली.

आणीबाणीच्या काळात विद्यार्थी आंदोलन जेपींची समाजवादी चळवळीतून यातून नितीशकुमार, लालूप्रसाद यांच्यासारखे ओबीसी नेते पुढे आले. त्यांची विचारधारा कॉंग्रेस पेक्षा वेगळी होती पण हिंदुत्वाचेही त्यांना वावडे होते.

भाजपचा जो मतदार आहे त्या उच्चवर्णीय जातींच्या नेत्यांविरुद्ध आंदोलने करत मोठे झालेले हे नेते पुढे जाऊन मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दिसू लागले. यातले लालूप्रसाद यादव सर्व प्रथम मुख्यमंत्री बनले.

उत्तर भारतात तेव्हा रामजन्मभूमीचे आंदोलन जोर पकडून होते. भाजप या आंदोलनालाधरूनच मोठा होऊ पाहत होता. लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेने देश खळबळून उठला होता. सोमनाथ पासून सुरु झालेली रथयात्रा प्रत्येक राज्यात भाजप आणि राम मंदिर यांचा पाया पक्का करत अयोध्येला निघाली होती.

लालू प्रसाद यादव यांच्या बिहार मध्ये आल्यावर मात्र त्यांचा हा विजय रथ रोखण्यात आला. अडवाणींना अटक करण्याच धाडस लालूंनी दाखवलं. या वरून गदारोळ झाला मात्र लालू आपल्या पुरोगामी समाजवादी विचारसरणीला धरून हि कारवाई आहे अस सांगत राहिले.

तेव्हा पासून भाजपच्या नंबर वन शत्रूंमध्ये त्यांचा समावेश होतो.

गेल्या अनेक निवडणुका भाजपने लालूप्रसाद यादव यांच्या विरुद्ध लढवल्या. लालू प्रसाद यादव कायम कॉंग्रेसच्या कंपूमध्ये राहिले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते पूर्वी पण जेल मध्ये गेले होते आणि आत्ता सुद्धा जेल मध्ये आहेत यामागे भाजपच आहे याची त्यांच्या कार्यकर्त्यांना खात्री आहे.

यावेळची निवडणूक मात्र वेगळी होती. लालू जेलमध्ये असल्यामुळे त्यांच्या प्रचाराची धुरा धाकटा सुपुत्र तेजस्वी यादव याने सांभाळली. तेजस्वी तरुण आहे, त्याची स्टाईल , त्याची मेहंगाई, बेरोजगारी यावरून भाषणे गाजली. तो बाजी मारणार असच वाटत होतं.

हे सगळ एकीकडे चालल होतं मात्र एनडीएच्या गटात सगळ काही आलबेल नव्हत.

वरवर पाहता नितीश कुमार आणि भाजपचे सुशील कुमार मोदी याचं चांगल चाललं होतं पण भाजपच्या महत्वाकांक्षेला अवर कोणीही घालू शकत नाही. अस म्हणतात कि अमित शहा यांनी यंदाचे मुख्यमंत्रीपद भाजपाकडे खेचून आणायचे आदेश दिले होते. याचाच अर्थ युतीमध्ये नितीश यांच्या पेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या हे त्याचं उद्दिष्ट होतं.

याच काळात रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान हे एनडीएमधून बाहेर पडले मात्र त्यांनी फक्त नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल विरूद्धच उमेदवार उभे केले, भाजप विरुद्ध नाही. यातून जो जायचा संदेश होता तो गेला. चिराग पासवान हे भाजपच्या आदेशानुसार नितीश कुमार यांचे खच्ची करण करण्याचा प्रयत्न करत आहेत अशीच चर्चा झाली.

जर त्रिशंकू सभागृह अस्तित्वात आलं तर एक तर संयुक्त जनता दल हे परत अरजेडीकडे येऊन महागटबंधनच सरकार अस्तित्वात येईल. पण तेव्हा त्यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी मारामारी होणे शक्य आहे. नितीश कुमार यांचे राजकारण संपवण्यासाठी लालूप्रसाद यादव अतिशय उतावळे झाले आहेत.

लालूंनी आपल आयुष्यभर भाजपला विरोध केला, मोदींची नक्कल करण्यापासून अगदी नोटबंदीवर खालच्या पातळीवर टीका करण्यापर्यंत लालू प्रसाद यादव सर्वात आघाडीवर होते.

आजही त्यांचे कार्यकर्ते आपली लढत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरुद्ध निवडणूक असल्याप्रमाणे त्वेषाने प्रचार करत होते. पण वरच्या पातळीवर राजकारण काय घडेल हे सांगता येत नाही. बिहार मध्ये तरी राजदसाठी कॉंग्रेस हा पायातला खोडा आहे. त्यांच्या ज्या जागा कमी होत आहेत त्या कॉंग्रेसमुळेच कमी होत आहेत. सत्तेपर्यंत पोहचण्यासाठीच त्यांना एक तगडा मित्रपक्ष हवा आहे. वेळ पडली तर ते भाजपकडे हात पुढे करू शकतात हे नक्की.

प्रश्न हा उरतो कि अतिमहत्वाकांक्षी भाजप नितीश कुमार यांच्या जागी आक्रमक विरोधक लालूंकडे जाईल का? मोदी अमित शहा यांनी हरयाणा, म्ध्यप्र्धेश,गोवा, मणिपूर इथे केलेले राजकारण पाहता काहीही शक्य आहे.

विशेषतः बिहारचा आजवरचा इतिहास पाहता इथे काहीही घडू शकत. भाजप ऐनवेळी पलटी मारून लालू प्रसाद यादव यांच्या राजदबरोबर गेली तरी आश्चर्य वाटायला नको.

 हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.