हॉस्पिटलच्या बाहेर मोठेमोठे मंत्री वाट बघत बसले होते तेव्हा लालू रिक्षावाल्याची भेट घेत होते

लालूप्रसाद यादव म्हणजे बिहारच्या राजकारणातील एक बहुढंगी व्यक्तिमत्व. त्यांच्याबद्दल आपली मते काही चांगली नाहीत. गावठी बिहारी भाषेत बोलणारा, जनावराच्या चाऱ्यामध्ये देखील घोटाळा करणारा, स्वतःचा मुख्यमंत्रीपद गेल्यावर अडाणी बायकोला खुर्चीवर बसवणारा हा टिपिकल पुढारी.

कधी टीव्ही चॅनलवर होळी खेळताना दिसतो तर कधी स्वतःच्या गोठ्यातल्या म्हैशीच दूध काढताना दिसतो.

कधी त्यांना कोणी विदूषक म्हणतं तर कोणी बिहारमध्ये जंगलराज आणण्याच खापर त्यांच्यावर फोडत. पण ते काहीही असलं तरी एक म्हण तिथे प्रचंड फेमस आहे,

“जब तक रहेगा समोसे में आलू तबतक रहेगा बिहार में लालू”

भलेभले राजकीयशास्त्राचे अभ्यासक पंडित दर निवडणुकी आधी सांगतात की यावेळी लालूच राजकारण संपलं मात्र तस ते घडताना दिसत नाही. कितीही वेळा आपटले तरी लालू यादव परत जोरात कमबॅक करतात.

काय आहे या मागचे कारण?

गोष्ट आहे दोन तीन वर्षांपूर्वीची. लालूप्रसाद यादव हृदयविकाराचा त्रास होत आहे म्हणून मुंबईच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. नलिन वर्मा नावाचे लेखक गोपालगंज टू रायसीना नावाचं एक पुस्तक लिहीत होते. या पुस्तकाच्या निमित्ताने लालूंची मुलाखत घ्यायचं म्हणून ते मुंबईला दाखल झाले.

एअरपोर्टवर उतरल्यावर हॉस्पिटलकडे जाण्यासाठी त्यांनी रिक्षा पकडली. जाता जाता रिक्षावाल्याशी त्यांच्या सहज गप्पा चालल्या होत्या. त्यांना कळाल की रिक्षावाला बिहारी आहे. वर्मा त्याला म्हणाले,

“अभि लालूजी असप्ताल में है. मै उनही से मिलने जा रहा हूं.”

हे ऐकताच त्या ड्रायव्हरने रिक्षा आहे तिथेच थांबवली.

वर्मा यांचे पाय धरत तो म्हणाला ,

क्या आप मुझे लालूजी से मिलवा सकते हैं? अगर आप मुझे उनसे मिलवाने में मदद करेंगे तो मैं आपके लिए उपर वाले से दुआ करूंगा

कुठून या रिक्षावाल्याला बोललो अस वर्मा यांना झालं. लालूप्रसाद यादव यांना प्रचंड मोठी सिक्युरिटी होती. कसबस स्वतःला अपॉईंटमेंट मिळाली होती त्यात या अनोळखी रिक्षावाल्याला घेऊन गेल्यावर आपली मुलाखत सुद्धा रद्द होईल असा विचार करत वर्मा यांनी  विषय टाळायचा प्रयत्न केला.

पण तो रिक्षावाला हट्टाला पेटला होता.

त्याच समाधान म्हणून वर्मा यांनी एका कागदावर त्याचं नाव व फोन नंबर लिहून घेतला. त्याचं नाव अन्सारी अस होतं.

अगर मुझे लालूजी और अभिताभ बच्चन से एक ही टाइम में मिलने का मौका मिले तो मैं लालूजी से मिलूंगा.

अस खुशीत येऊन तो म्हणाला. लालू यादव ऍडमिट होते त्या हॉस्पिटलच्या गेटवर ते पोहचले.

वर्मा यांची वाट पाहत लॉबीमध्ये उभ्या असलेल्या लालूंच्या पीएनी त्यांना चौथ्या मजल्यावर नेलं.

तिथे एका खास रूममध्ये लालूप्रसाद यादव ऍडमिट होते. त्यांची तब्येत प्रचंड बिघडली होती. नुकतंच हृदयाचं ऑपरेशन झालेलं त्यातच शुगरचा त्रास सुरू होता. डॉक्टर त्यांना खाण्याचं पथ्य पाळण्याविषयी सूचना देत होते.

पण लालू यादव आपल्या नेहमीच्या गंमतीशीर स्टाईलमध्ये त्यांचीच मजा घेत होते. बीपी चेक करायला आलेल्या नर्सला तर त्यांनी सांगितलं की,

तुम्हें शादी कर लेनी चाहिए, शादी में अब देर मत करो। तुम्हें अपने माता-पिता और परिवार के दूसरे बुजुर्गों की सेवा करनी चाहिए

असला सगळा हलकाफुलका माहौल होता.

नलिन वर्मा यांचं टेन्शन कमी झालं. लालूप्रसाद यादव यांनी त्यांना दिलखुलास मुलाखत दिली. बोलता बोलता दोन तीन तास उलटून गेले. नलिन वर्मा निघणार तेव्हा त्यांना रिक्षावाल्याला दिलेलं वचन आठवलं. सहज त्यांनी लालूंच्या कानावर त्या रिक्षावाल्याची गोष्ट घातली.

लालूप्रसाद यादव अस्वस्थ झाले. त्यांनी लगेच त्या रिक्षावाल्याला फोन करायला लावला. त्यांच्या पीएने सांगितलं की

आपली भेट घ्यायची म्हणून  बिहार व महाराष्ट्रातील काही नेते खाली लॉबीमध्ये खूप वेळ झालं थांबले होते.

पण लालू यादव ऐकायला तयार नव्हते. वर्मा यांनी अन्सारीला फोन लावला.

स्वतः लालू त्याच्याशी बोलत होते,

आपका नाम क्या है? आप जल्दी हमसे मिलने आ जाओ और ढाई सौ ग्राम कच्चा कलेजी भी साथ लेते आना. आज बकरीद का दिन है, कुर्बानी वाला कलेजी लाना.

थोड्याच वेळात अन्सारी तिथे येऊन पोहचला. त्याच्या हातातल्या कॅरीबॅगमध्ये मटण होतं. लालूंना बघताच अन्सारी रडू लागला. त्याला आपण खुद्द लालूप्रसाद यादव यांच्या समोर उभे आहे यावर विश्वास बसत नव्हता.

लालूंनी त्याला डोळे पुसायला लावले.

जवळच उभ्या असलेल्या सहकाऱ्याला ती पिशवी दिली आणि सांगितलं,

जाइए, इनको साथ ले जाइए और मटन को पका कर लाइए फिर साथ में खाते हैं.

त्या रूमशेजारी लालूंसाठी खास किचन बनवण्यात आलं. लालूंच्या त्या रिक्षावाल्याशी गप्पा सुरु होत्या तोपर्यंत मटण शिजलं. लालूंच्या बेडवरच जेवणाच ताट आलं.

लालूंनी सगळयांना जेवायला यायचा हुकूम सोडला.

अन्सारी लाजला,

हुजूर आपकी प्लेट में कैसे खाऊं. मैं तो गरीब आदमी हूं, ऑटोरिक्शा चलाता हूं. आपसे मिल लिया, मुझे सब कुछ मिल गया.

लालू म्हणाले,

चुपचाप आकर साथ में खाओ नहीं तो दो थप्पड़ मारूंगा’।

अन्सारी गप्प आला आणि लालूंच्या ताटात जेवू लागला. तेवढ्यात एक नर्स आली आणि त्यांना चिकन मटण खायला डॉक्टरांनी बंदी आणली आहे याची आठवण करून दिली. तेव्हा लालू आपल्या खास गंमतीशीर स्टाईलमध्ये म्हणाले,

डॉक्टर साहब तो भोले हैं। उनको पता नहीं है कि अंसारी के मीट में जितना फायदा है उतना फायदा पूरे अस्पताल की दवाई में नहीं है.

त्या गरीब रिक्षावाल्यासाठी ती आयुष्यभराची आठवण ठरली.

भरल्या डोळ्यांनी लालूंना दुवा देत तो तिथून बाहेर पडला. मोठमोठे मंत्रीसंत्री यांना भेटले नाहीत पण लालूंनी एका रिक्षावाल्याला भेट दिली, गप्पा मारल्या, एका ताटात जेवले ही मोठी गोष्ट होती.

लालू यादव कसे का असेनात पण गोरगरिबांमध्ये मिसळणारे नेते आहेत. स्वतः शेतकऱ्याच्या घरी जन्मल्यामुळे त्यांना जनतेची नस सापडली आहे. पब्लिकला जिंकण्याच कसब त्यांनी साधलंय. त्यामुळे मीडिया किती का दंगा करेना, विरोधकांनी कितीही जहरी प्रचार केला तरी लालू यादव यांना बिहारमधून संपवणे अशक्य आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.