३३५ किलो आणि साडेदहा चौरस किलोमीटरचा खेळाडू…

 

जून १८०९ साली जेव्हा तो मरण पावला तेव्हा त्याचं वजन होतं ३३५ किलो. त्याच्या मृतदेहासाठी जो स्वर्गरथ ‘वैगेरे’ बनवण्यात आला, तो इतका मोठा होता की तुम्ही कल्पनाही नाही करू शकणार. मोठा म्हणजे किती मोठा, तर जवळपास साडेदहा चौरस मीटर. त्याचं मृत शरीर, राहत्या ठिकाणापासून स्मशानभूमीत नेणं सोप्पं व्हावं म्हणून त्याला खास चाकं बसविण्यात आली होती. आणि एवढं करूनसुद्धा हे दिव्य पार पाडण्यासाठी २० माणसांना मिळून जवळपास तासभराचा वेळ लागला होता. ही स्टोरी आहे त्याकाळातल्या इंग्लडच्या इतिहासातील सर्वात, वजनदार माणसाची…

१३ मार्च १७७० रोजी इंग्लडमधील लेईशेस्टर इथं जन्मलेला डॅनियल लेंबर्ट हा खरं तर लहानपणापासूनच चुस्त आणि तंदुरुस्त. मैदानी खेळातील प्रतिष्ठित खेळाडू म्हणून तो प्रसिद्ध. त्याच्या तारुण्यावस्थेपर्यंत तो तुमच्या-आमच्या सारखाच अगदी नॉर्मल होता. पण १७९३ हे ते वर्ष होतं जेव्हापासून त्याच्या कहाणीमध्ये ‘ट्वीस्ट’ यायला सुरुवात होते. वयाच्या तेविसाव्या वर्षीपासून त्याच्या वजनात अचानक वाढ व्हायला सुरुवात झाली. म्हणजे ते एकदमच २२० किलोंपर्यंत जाऊन पोहचलं. बरं हे असं अचानक का झालं, तर त्याला काहीच कारण नव्हतं. ते आपोआपच वाढलं. खरं तर तो एक फिट खेळाडू होता, त्याला कुठलंही व्यसन नव्हतं आणि तरीही हे असं काहीतरी अघटीत होऊन बसलं होतं. हे असं असतानाही वाढत्या वजनाचा परिणाम इतक्यात त्याच्या फिटनेसवर झाला नव्हताच. तो अजूनही लहान मुलांना स्विमिंग शिकवत असे. कहर म्हणजे दोन लोकांना आपल्या पाठीवर घेऊन तो सहजच पोहू शकत असे. एकदा तर त्यानं वूलविच ते लंडन हे ११ किलोमीटरचं अंतर चालत चालत सहज पार केलं होतं, असं हे अजब-गजब रसायन.

Screen Shot 2018 03 16 at 2.49.03 PM
नेपोलियन बरोबर डिनर घेताना “महाशय”

सन १८०१ पर्यंत त्याचं वजन २५० किलोपर्यंत पोहचलं होतं. तो इतका अवाढव्य वाढला होता की त्याच्या कोटमध्ये ६ नॉर्मल माणसं सहज बसू शकत होते. १८०५ मध्ये तर ‘अॅनिमल ब्रिडर’ म्हणून काम करणाऱ्या डॅनियलची नोकरीही गेली होती. त्यामुळे पेन्शनमधून मिळणाऱ्या पैश्यातून खर्च भागवणं अवघड होऊन बसलं होतं. पण तोपर्यंत सगळीकडेच या अवाढव्य माणसाची चर्चा व्हायला सुरुवात झाली होती. लोकं वेगवेगळी कारणं काढून त्याच्याकडे यायला लागली होती. काहीतरी बहाणा बनवून त्याच्या घरी जायचं आणि हा अवाढव्य माणूस दिसतो कसा हे बघायचं, असं हे सगळं चाललेलं. मग त्यानं एक आयडिया लढवली. एप्रिल १८०६ मध्ये त्यानं लंडनमध्ये भाड्यानं घर घेतलं आणि तो तिथे राहायला गेला. तिथं त्यानं स्वतःला एग्झिबिशनसाठी उपलब्ध करून दिलं आणि भेटायला येणाऱ्या माणसांकडून तो त्यासाठी पैसे घेऊ लागला.

Screen Shot 2018 03 16 at 1.50.23 PM

खरं तर स्वभावाने प्रचंड लाजाळू असणाऱ्या डॅनियलने ही गोष्ट काही फार आनंदाने केली नव्हती. पण पैशाची मोठ्या प्रमाणात गरज होती आणि तो कमावण्यासाठी दुसरा कुठलाच मार्ग त्याच्याकडे उपलब्ध नव्हता, म्हणून मग त्याला हा निर्णय घ्यावा लागला. त्याची ही आयडिया चालली आणि देशभरातून मोठ्या प्रमाणात लोकं त्याला बघण्यासाठी लंडनला येऊ लागली. तो रोज दिवसातले ५ तास प्रेक्षकांसाठी उपलब्ध असे. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला तो प्राण्यांविषयी, त्यांच्या ब्रिडिंगविषयी माहिती देत असे. त्यामुळे लोकं उत्सुकतेने त्याला भेटायला येत, त्याच्याशी गप्पा मारत. अनेक जणांशी तर त्याची छान मैत्रीही झाली. बरेच जन तर पुन्हा-पुन्हा त्याला भेटायला येत. त्यातून त्याच्याकडे बरेचसे पैसेही जमा झाले, पण शेवटी या गोष्टीचा कंटाळा येऊन अवघ्या काही महिन्यातच म्हणजे सप्टेंबरमध्ये तो लेईशेस्टरला परतला.

लेईशेस्टरला परतल्यानंतर तो परत ब्रिडिंगचं काम करू लागला. अनेक स्पोर्टिंग इव्हेंटला त्याने हजेरी लावली. त्यानंतरही पैशासाठी म्हणून काही वेळा इंग्लडमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यानं स्वतःच प्रदर्शन भरवलं. १८०९ मध्ये वयाच्या ३९ व्या वर्षी स्टॅमफोर्ड इथं त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यूही अचानकच झाला कारण मृत्युपूर्वी त्याची तब्येत अगदी व्यवस्थित होती आणि प्रकृती अस्वास्थ्याचं कुठलंही लक्षण नव्हतं. मृत्युनंतर त्याच पोस्टमॉर्टम देखील करण्यात आलं नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे गूढच राहीलं.

Screen Shot 2018 03 16 at 1.52.40 PM

ब्रिटीशांनी आजही लेंबर्टला आपल्या आठवणीत जपलंय. त्याचे कपडे आणि त्याच्या वस्तू आजही लेईशेस्टरमधल्या ‘नेवार्के हाउसेस म्युझियम’मध्ये बघायला मिळतात. २००९ मध्ये त्याच्या मृत्युच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त लेईशेस्टर शहराने ‘डॅनियल लेंबर्ट दिवस’ साजरा केला आणि ‘लेईशेस्टर मर्क्युरी’ या वृत्तपत्राने ‘डॅनियल लेंबर्ट’ला शहराच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या व्यक्तींपैकी एक म्हणून जाहीर केलंय. स्टॅमफोर्डच्या लोकल फुटबॉल क्लबचं टोपणनावही ‘डॅनियल्स’ असं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.