रोज २५०० गरिबांना खाऊ घालणाऱ्या लंगर बाबांच्या आता फक्त आठवणीच बाकी राहिल्या आहेत..

दानधर्म करणारे, गरिबांना अन्नदान करणारे , रकमेच्या किंवा गरजेच्या वस्तूंच्या स्वरूपात मदत करणारे आपल्या भारतात अनेक जण आहेत. पण आजकाल हेच काम सोशल मीडियावर लाईक आणि व्हायरल होण्यासाठीचं एक माध्यम बनलंय. न पचणारी गोष्ट आहे पण सत्य हेच आहे. एक सामाजिक कार्य म्हणून निस्वार्थीपणाने ही  सेवा करणारे बोटावर मोजण्याइतकीच लोक आपल्याला पाहायला मिळतील. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे ‘लंगर बाबा’. 

लंगर बाबा म्हणून सगळ्या देशभरात प्रसिद्ध असलेले जगदीश लाल अहुजा. जे जवळपास २० वर्षांपासून गरिबांना मोफत अन्नदान करत आहेत.  

लंगर बाबा चंदीगड इथले रहिवासी होते. पण त्याआधी ते पाकिस्तानच्या पेशावर मध्ये राहायचे. मात्र १९४७ च्या फाळणीनंतर ते पेशावरहून भारतात आले. त्यानंतर कित्येक वर्षांनी त्यांचे कुटुंब चंदीगडला स्थायिक झाले ते कायमचेचं. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी हातगाडीवर केळी विकण्यापासून सुरुवात केली आणि नंतर ते फळांच्या व्यवसायात उतरले. या व्यवसायात त्यांचा असा पगडा होता की, ते बनाना किंग म्हणूनही ओळखले जाऊ लागले.

आपल्या लंगर सुरु करण्यामागे जगदीश लाल यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले होते कि, 

गरिबांची सेवा करण्याची ही नवीन कल्पना माझ्या मुलाला त्याच्या मुलाच्या म्हणजेच माझ्या नातवाच्या आठव्या वाढदिवसा दिवशी सुचली. त्यांचं वेळी मी ठरवले आहे की या खास दिवशी मी मुलांसाठी लंगर आणणार आहे. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला माझे बालपण आठवले. आणि अशाप्रकारे मी गरिबांसाठी लंगर सुरु करण्याचं ठरवलं.

२००१ पासून जगदीश लाल पीजीआय हॉस्पिटलच्या बाहेर रोज या लंगरचे आयोजन करत होते. या लंगरमध्ये दररोज दुपारी आणि संध्याकाळी ताजे आणि शाकाहारी जेवण दिले जात होते. त्यांना आपल्या या कामातून आनंद मिळायचा, पण खर समाधान मिळायचं ते गरिबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून. त्यामुळे त्यांनी आपल्या या कामात कधीही खंड पडू दिला नाही. कुठल्याही परिस्थितीत ते लंगर सुरु ठेवायचेच. त्यामुळेच त्यांना लंगर बाबा म्हणून ओळखले जाऊ लागले.

त्यांच्या या कामात त्यांच्या पत्नीने देखील मदत केली. या कामात त्यांना एकदा आर्थिक  संकटाचा सुद्धा सामना करावा लागला. पण लंगर सुरूच ठेवायचाचं, या निश्चयाने त्यांनी २०१५ मध्ये आपली १.५ कोटी रुपयांची मालमत्ता विकली.  जेणेकरून गरिबांना जेवणाची व्यवस्था करता येईल.

लंगर बाबा चंदिगडमधील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चच्या बाहेर गरीब आणि भुकेल्या लोकांसाठी लंगर घालत होते. २० वर्षांच्या या काळात त्यांनी एक दिवसाचीही विश्रांती घेतली नव्हती. रोज सुमारे अडीच हजार लोकांना अन्नदान करणं हे जणू त्यांचं टार्गेट ठरलेलंच असायचं.

शहरातील दोन मोठ्या रुग्णालयांमध्ये दररोज दुपारी आणि संध्याकाळी इथले गरीब कुटुंबे आणि रुग्ण या लंगरची आतुरतेने वाट पाहायचे. हा लंगर खाऊन कोणीही गरीब उपाशी झोपणार नाही हे सर्वांना माहीत होते.  कारण यात डाळ, चपाती, भात, खीर आणि एक केळी  असं भरपेट जेवण मिळायचं. यासोबतच लंगर बाबा कँसर ग्रस्तांना बिस्किटे आणि लहान मुलांना टॉफी, लॉलीपॉप, फुगे वाटप करायचे.

जगदीश लाल यांना त्यांच्या आयुष्यात गरिबीचा सामना करावा लागला आणि जेव्हा त्यांना वाटले की ते गरजूंना अन्न देण्यास सक्षम आहेत, तेव्हा त्यांनी मोफत सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरू केलेली लंगर सेवा त्यांच्या मृत्यूनंतरही सुरू राहावी, अशी त्यांची शेवटची इच्छा होती.

जगदीश लाल यांच्या याचं मानवसेवेसाठी त्यांना गेल्या वर्षी पद्मश्री पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. 

 हे ही वाचं भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.