जगाला कॉपी-पेस्टचं वरदान देणाऱ्या कार्यकर्त्याच निधन झालंय.

भिडू कट कॉपी आणि पेस्ट हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. कॉलेजमध्ये प्रोजेक्ट करायचा आहे कर कॉपी पेस्ट, प्रेजेंटेशन द्यायचं आहे कर कॉपी पेस्ट, फोटोशॉप करायचा आहे, कॉपी पेस्ट. एवढच काय अगदी साधे whatsapp मेसेज पाठवताना पण आपण कॉपी पेस्ट करतो.

एक सिक्रेट सांगतो जर ctr+c, ctr+v नसत तर कमीत कमी आमच्या पत्रकार बंधूंच तर आयुष्य खूप नरकप्राय झालं असत. हा शोध लावला लॅरी टेस्लर या देवदूताने.

लॅरी टेस्लर मुळचा न्यूयॉर्क अमेरिकेचा. लहानपणापासून हुशार होता. शाळेत कधी परीक्षेत कॉपी केली का माहित नाही पण आधीपासूनच जरा बंडखोर होता.

स्टॅनफोर्ड विद्यापीठात कॉम्प्यूटर इंजिनियरिंग शिकला. तिथला एक खटपट्या विद्यार्थी म्हणून त्याला ओळखल जायचं. कॉलेजमध्ये असतानाच बाहेरची प्रोग्रॅमिंग ची कामे घ्यायचा. त्यात बऱ्यापैकी पैसा मिळत होता. त्यामुळे स्टॅनफोर्ड मधून ग्रज्यूएशन पूर्ण करूनही त्याने कुठल्या मोठ्या कंपनीत नोकरी केली नाही.

फ्रीलान्सर प्रोग्रॅमिंग कन्सल्टंट म्हणून काम करू लागला.

त्याकाळी अमेरिकेतल्या टेलिफोन डिरेक्टरीमध्ये नाव असलेला तो एकमेव कॉम्प्युटर कन्सल्टंट होता.स्वतःच्या मर्जीचा राजा होता, नोकरीपेक्षा जास्त कमाई होत होती. पण हे सुख जास्त दिवस टिकले नाही. अमेरिकेच्या कॉम्प्युटर क्षेत्रात प्रचंड मंदी आली. मोठमोठ्या कंपन्यानी बाहेर कामे देणे बंद केल.  लॅरी टेस्लरला कळाले आता नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही.

एका फ्री युनिव्हर्सिटी मध्ये मास्तरकीची नोकरी पकडली. पण तिथे सुद्धा जो विषय शिकवायचा तोसुद्धा एकदम बंडखोर होता, How to end the IBM Monopoly. 

नियमित ११-५ च्या नोकरीचा विरोध त्याने कायम ठेवला. कधी स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या आर्टिफिशियल इंटलिजन्स वर काम केल तर कधी आणखी काय. पण कोणत्याही नोकरीत जास्त वेळ रमला नाही. याच दरम्यान त्याच्या आयुष्यात एक वादळ आलं ज्यामुळे त्याला सुधराव लागल. कॉलेजच्या जीवना पासून प्रत्येक चांगल्या वाईट काळात त्याच्या पाठीशी राहिलेल्या बायकोने त्याला घटस्फोट दिला.

एकुलत्या एक लहान मुलीची जबाबदारी लॅरीवर आली. तिला घेऊन ओरेगॉन या गावी आला. हे गाव तसं खूप मागासलेलं होतं. नुकताच व्हिएतनाम युद्धातून आलेले सैनिक तिथे घर बांधत होते. गावातली बँक सोडली तर कोणाकडेही कॉम्प्यूटर नव्हता. त्यामुळे गप्प स्टॅनफोर्डला फोन लावला आणि काम मागितल.

याच काळात स्टॅनफोर्डमध्ये झेरॉक्स कंपनीने आपला पार्क नावाचा प्रोजेक्ट सुरु केला होता. तिथे स्टॅनफोर्डच्या अनेक विद्यार्थ्यांना चिटकवल जात होतं.

लॅरीने तेव्हा पब या प्रोग्रॅमिंग लँगवेजचा शोध लावला होता. ज्याचा वापर अर्पानेट या पहिल्या इंटरनेट मध्ये केला जात होता. झेरॉक्समध्ये लॅरीला मोठ्या पदावर घेतले गेले. त्याचा मेन प्रोजेक्ट होता जिप्सी वर्ड प्रोसेसर. या जिप्सीवर काम करत असताना लॅरीला आणि टीम मोट या सहकाऱ्याला वाटलं की

आता सगळ टेक्स्ट इंटरफेसवर काम करतय. पण येणारा काळ ग्राफिक्स इंटरफेसचा असणार आहे. सर्वसामान्यांना जर कॉम्प्यूटर वापरायला द्यायचा असेल तर त्याला जास्तीत जास्त सोपं करणे गरजेचे आहे.

आणि यातूनच कट कॉपी पेस्टचा जन्म झाला.

अस म्हणतात की लॅरीला ही कल्पना झेरॉक्स कंपनीतल्या एका कर्मचाऱ्याने साधा कागद फाडून दुसऱ्या कागदावर चिटकवल्या मुळे सुचली. हा शोध क्रांतिकारी ठरला. त्याकाळी झेरॉक्स सकट अनेकांना त्याच महत्व कळाल नाही. याच पार्कमध्ये काम करत असताना लॅरीने झेरॉक्स नोटटेकर या जगातल्या पहिल्या लॅपटॉपच्या निर्मितीमध्ये देखील भरीव कामगिरी केली.

पण जेव्हा लॅरी या १६ किलो वजनी लॅपटॉपला प्रदर्शनासाठी सगळी कडे घेऊन गेला तेव्हा त्याला थंड प्रतिसाद मिळाला. झेरॉक्सने हा प्रोजेक्ट बासनात गुंडाळला.

लॅरीला आपला पहिला लॅपटॉप मार्केटमध्ये उतरू शकला नाही याच खूप वाईट वांटल. त्याला जाणवल की झेरॉक्स ही फक्त एक कॉपीयर बनवणारी कंपनी आहे. त्यांना कॉम्प्युटरमध्ये विशेष रसही. तो झेरॉक्स मधून बाहेर पडण्याची संधी शोधू लागला.

तो योग लवकरच आला.

एकेदिवशी अॅप्पल कॉम्प्यूटरचा निर्माता स्टीव्ह जॉब्स पार्कच्या भेटीला आला होता. तेव्हा त्याला लॅरीनेच अल्टो या आपल्या पर्सनल कॉम्प्यूटरच वर्किंग प्रेसेंटेशन दिलं. स्टीव्हने नुकतच आपली कंपनी स्थापन केली होती. घरापाठीमागच्या गॅरेजमध्ये काम करणारीरा हिप्पी मुलगा अशी त्याची ओळख होती.

मात्र बंडखोरी रक्तात असल्यामुळे  लॅरीचे आणि त्याचे सूर जुळले. ग्राफिक्स इंटरफेसबद्दल दोघांची समान मते होती. झेरॉक्स अल्टो बघून स्टीव्ह जॉब्स खूपच प्रभावित झाला होता. त्याने आपल्या अॅप्पल कॉम्प्यूटरवर हेच प्रयोग सुरु केले आणि सगळ्यात पहिला लॅरीला आपल्या कंपनीत बोलवून घेतल. लॅरीने आपली कॉपी पेस्टच तंत्र अॅप्पल लिसा कॉम्प्यूटरवर वापरलं.

आणि पुढचा इतिहास तर सगळ्यांना ठाऊकच आहे.

लॅरीचे संगणक क्षेत्रावर खूप उपकार आहेत. ब्राऊजर हा शब्द त्यानेच शोधून काढला. अॅप्पलचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करताना त्याच्याच प्रयत्नातून न्यूटन या टॅबलेट कॉम्प्यूटरच्या निर्मिती झाली. पुढे अॅप्पल नंतर अमेझॉन, याहू अशा अनेक मोठ्या कंपन्यात काम करून तो निवृत्त झाला आणि नुकताच दोन दिवसापूर्वी त्याचे ७४व्या वर्षी निधन झाले.

 हे ही वाच भिडू.