आजही पेशावरमध्ये बालाजीने मारलेला तो सिक्स आणि तुटलेली बॅट आठवते.

जगातला सर्वात स्फोटक गोलंदाज शोएब अख्तरला जर विचारलं की तुला आयुष्यात न विसरता येण्यासारखे सिक्स कोणते ? तर तो सांगेल की,

एक तर सचिन ने २००३ च्या वर्ल्डकप मध्ये मारलेला सिक्स आणि २००४ ला पेशावरमध्ये लक्ष्मीपती बालाजी ने मारलेला सिक्स !

यातही “बालाजी” ने मारलेला सिक्स त्याला जास्त झोंबला असेल हे नक्की.

२००४ सालचा भारतीय टीमचा पाकिस्तान दौरा. अनेक खेळाडूंसाठी हा पहिलाच पाकिस्तान दौरा होता. मैदानावर एखादं महायुद्ध खेळावं असे सामने खेळले गेले होते. दोन्ही संघ आपल्या देशाची मान आपल्या खेळाने उंचावेल याचसाठी खेळले. या सिरीज ने अनेक नवे हिरो भारतीय क्रिकेटला दिले.

इथंच सेहवाग ने भारतातर्फे कसोटी मधलं पहिलं त्रिशतक झळकावलं. इरफान पठाणने वसीम अक्रमची आठवण यावी अशी जबरदस्त बॉलिंग केली होती. सचिनने शतक काढलं, कुंबळेने बुट्टीभरून विकेटा काढल्या. सगळ्यात जास्त बॉल खेळण्याचा विक्रम द्रविडने नोंदवला. भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये कसोटी सिरीज आणि वन डे सिरीज दोन्ही पण खिशात टाकल्या.

एवढं सगळं त्या सिरीज मध्ये घडलं पण सगळ्यात जास्त चर्चा बालाजीची झाली !

एक टेलएंडर जगातल्या सगळ्यात खतरनाक बॉलरला सिक्स मारतोय म्हणजे चर्चा होणारच. खुद्द बालाजीनं सांगितलंय की, त्या सामन्यापर्यंत त्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर सोडाच पण कधी डोमेस्टीक लेव्हलला सुद्धा सिक्स मारला नव्हता.

तो सिक्स एवढा जबरदस्त होता त्याच्या पुढच्या बॉलला त्याची बॅटच तुटली. १५० किमी प्रती तास येणाऱ्या बॉल पुढे ती बॅट कुठे टिकणार होती. एवढं झाल्यावर हसणारा बालाजी पाहून तर शोएबचा तिळपापड झाला. पण त्याच हास्य त्याला चिडवणार नव्हतं तर त्याचा जबडाच निसर्गतः तसा होता आणि त्याचं तेच हास्य आजही आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतं.

बालाजीने फक्त शोएबच नाही तर त्याच्या अगोदर महम्मद सामीची सुद्धा धुलाई केली होती. कॉमेंटेटर आणि भारतीय फॅन, बालाजी वर खुश होतेच पण पाकिस्तानी फॅन्स सुद्धा बालाजी को दिल दे बैठे थें.

एक बॉलर आपल्या बॉलिंग पेक्षा बॅटिंग मुळे फेमस व्हावा ही तशी पहिलीच घटना. त्याच्या कायम हसतमुख चेहऱ्या मुले बालाजी ला “The smiling assassin” हे नाव पडले. पाकिस्तान मधल्या सिरीज मध्ये त्याच्या एका मुलाखतीमध्ये तिथल्या मुलींनी त्याला प्रपोज केलं.

बालपणापासूनच तो मित्रांच्यात वेगवान बॉलिंगसाठी फेमस होता.

एकदा तर त्याला गल्ली क्रिकेट खेळताना त्याच्या विरोधी टीमने त्याचं अपहरण केलं होतं. तामिळनाडू कडून फर्स्ट क्लास मध्ये जबरदस्त बॉलिंग टाकून त्यानं भारतीय टीम मध्ये हक्कानं जागा मिळवली. काही सामन्यामध्ये त्याने चांगले प्रदर्शन केले. मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला.

कायम ग्रासलेल्या दुखापतीमुळे त्याची कारकीर्द झाकोळली गेली. त्याचा वेग कमी होत गेला. झहीर खान, इरफान पठाण, आशिष नेहरा, श्रीशांत, मूनाफ पटेल अशा अनेक क्वालिटी फास्ट गोलंदाजाच्या स्पर्धेत त्याला आपली जागा टिकवता आली नाही. दहा वर्षाच्या कारकिर्दीत तो फक्त 8 कसोटी आणि 30 वनडे खेळू शकला. त्यात त्याने अनुक्रमे 27 आणि 36 विकेट्स घेतल्या.

एका मोठ्या ऑपरेशन नंतर तो संपला अशीच चर्चा होती. त्याचं नावसुद्धा लोक विसरले अशी वेळ आली होती.

अशातच त्याने झोकात आयपीएल मध्ये एन्ट्री केली. चेन्नई सुपर किंग कडून खेळताना बालाजीने आयपीएल मधली पहिली हॅट ट्रिक नोंदवली. चेन्नईच्या अनेक विजयाचा तो शिल्पकार ठरला. त्याने खुबीने टाकलेल्या स्लोवर वन च कौतुक तज्ञांनी केलं. आयपीएलचा तिसरा सिझन चेन्नई ने बालाजीच्या बॉलिंगवरच जिंकला असं खुद्द कप्तान धोनीनं सांगितलं.

त्या पुढच्या सिझनपासून बालाजी चेन्नई नंतर कोलकाता, पंजाब या टीमशी जोडला गेला पण त्याला ती जादुई कामगिरी करायला जमलं नाही. पुढे त्याच्या दुखपतींनी परत उचल खाल्ली. २०१६ ला त्याने क्रिकेट मधून रिटायरमेंट घेतली.

आज कोणीही बालाजी म्हटलं की आठवतंय तो,

किरकोळ शरीरयष्टीचा सावळा बालाजी ,सिक्स मारून त्याची तुटलेली बॅट, त्याच सुप्रसिद्ध हास्य आणि धुसफूसणारा शोएब अखतर. खरंच हे कधीच न विसरता येणार चित्र आहे. बाकी काहीही असो बालाजीन सगळ्या क्रिकेट फॅन्स ही एक छान आठवण दिलीय आणि ती कायम राहील.

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.