भारतावर राज्य करणाऱ्या मुघलांचे वंशज झोपडीत राहतात…
कितना है बदनसीब ‘ज़फर’ दफ्न के लिए,
दो गज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार में…
बहादुरशहा जफर. शेवटचा मुघल बादशहा. १८५७ चा उठाव फसल्यानंतर ब्रिटीशांनी त्याची रवानगी ब्रह्मदेशातल्या रंगुन येते केल्याचं आपण वाचतो. इतकीच माहिती शाळेच्या पुस्तकातून आपणाला मिळते. पण हा बहादुरशहा जफर कवी मनाचा माणूस होता. त्याची शेरशायरी कुल्लियात ए जफर नावाने प्रसिद्ध आहे. अंतीम क्षणी का होईना पण आपण हिंदूस्तानात जावं तिथेच आपली कबर असावी अशी त्याची इच्छा होती. पण त्याचा मृत्यू ब्रह्मदेशातच झाला. हिंदूस्तानपासून दूरवर रंगून येथे त्याची कबर खोदण्यात आली.
त्यानंतरचा इतिहास येतो तो त्यांच्या वंशजाचा.
त्याचे वंशज म्हणजेच कधीकाळी हिंदूस्तानवर सार्वभौम सत्ता स्थापन करणाऱ्या मुघलांचे वंशज. हे वंशज कुठे गेले तर त्याच्या मुलं, नातवंडे वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरीत झाली. इतिहासाच्या पुस्तकातून त्यांच नाव कायमच पुसलं गेलं. कोणी अमेरिकेत गेलं तर कोणी सध्याच्या बांग्लादेशात स्थलांतरित झालं. असाच एक नातू कोलकत्त्याला स्थलांतरीत झाला.
२०१३ साली बहादूरशहा जफरच्या पणतूबद्दल माहिती छापून आली. बहादूरशहा जफरच्या पणतूचं निधन झालं होतं पण त्याची बायको सुल्ताना बेगम मात्र जिवंत होती. तिला ब्रिटीश सरकारमार्फत आजही ६० पाऊंडची पेन्शन चालू होती. ज्ञात असणारी ती मुघलांची वंशज होती.
माध्यमांनी तिला नाव दिलं,
स्लमडॉग राजकुमारी.
सुल्ताना बेगम कलकत्त्याच्या बाहेरचा भाग समजल्या जाणाऱ्या शांतीवसाहतीत रहात होती. शांतीवसाहत ही एक झोपडपट्टी आहे. आपला नवरा प्रिन्स मिर्जा बेदार च्या मृत्यूनंतर आपल्या मुलांना घेवून ती कसाबसा संसार चालवत होती. तिच्या नवऱ्याने तिला सांगितलं होतं की काहीही झालं तरी भिक मागू नको. आपण ज्या घराण्यातून येतो त्यांने कधीकाळी भारतावर राज्य केलं होतं. लाल किल्यापासून ताजमहाल सारख्या वास्तू त्यांनी बांधल्या.
त्या कुठे राहतात तर एका झोपडीत. ज्या झोपडीत फक्त दोन खोल्या आहेत. त्यांचे किचन शेजाऱ्यांसोबत कॉमन आहे तर भांडी रस्त्यावर घासावे लागतात. सुल्ताना बेगम यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्याबद्दल वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दुबईतून एक व्यक्ती आले आणि या मुलाला कामासाठी घेवून गेले. सध्याची माहिती मिळते ती म्हणजे हा मुलगा दुबईमध्ये कुकचे काम करतो.
सुल्ताना बेगम या चहाची टपरी चालवत होत्या. काहीकाळ त्यांनी कपडे शिवण्याच काम देखील केलं. चहाच्या टपरीमधून त्यांना महिन्याचे दहा हजार मिळत. त्यातूनच त्या संसार चालवत असत.
पण प्रश्न उरतो तो म्हणजे या खरेच मुघलांच्या ंवंशज आहेत का ?
कारण इतिहास तज्ञांच्या मते ब्रिटीशांनी मुघलांचा वंश वाढू नये यासाठी त्याच्या दोन्ही मुलांची हत्या केली होती. आणि बहादूर शहा जफर यांस बंदी बनवून रंगूनला पाठवलं होतं. मात्र अनेक इतिहासतज्ञांच्या मते बहादुर शहा जफर एकच राणी आणि दोनच मुले नव्हते. त्याच्या अनेक राण्यांची अनेक मुले होती. जे त्याच्यासोबत रंगूनला गेले होते त्यांचीच ही वंशावळ मानण्यात येते.
सुल्ताना बेगम यांच्याप्रमाणेच हैद्राबादचे याकुब हब्बीबुद्दीन हुसैन हे देखील स्वत:ला मुघलांचे वंशज मानतात. त्यांच्या दावा कोर्टाने देखील मान्य केल्याच्या बातम्या पहायला मिळतात. हैद्राबाद येथे राहणारे याकुब हब्बीबुद्दीन देखील गरिबीत दिवस काढत आहेत. ते मात्र आपला मालकीहक्क ताजमहाल पासून लालकिल्यावर सांगत असतात. बाबरी मशिदी आणि रामजन्मभूमीवादावर त्यांनी सांगितलं होतं की, जर बाबरी मशिद आमच्या नावावर झाली तर मी ती हिंदूंना मंदीर बांधण्यासाठी दान करुन टाकेल.
हे ही वाच भिडू.
- म्यानमारच्या राजाचे वंशज चंद्रकांत पवार रत्नागिरीमध्ये गाड्या सर्व्हिसिंग करतात.
- छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती उदयनराजे. ही आहे छत्रपती घराण्याची वंशावळ !
- गेल्या वीस पिढ्या सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे घराणे आपल्या पराक्रमाने देशाची सेवा करत आहेत.
Afghanistanat pn ek hindu rajachi samadhi aahe mhne kadachit abdul kalam sahebani tithe bhet dili hoti