पांढऱ्या कपड्यातली शेवटची वनडे मॅच आणि आगरकरचा कधीच न मोडला गेलेला विक्रम!

तर गोष्ट अशी आहे की आम्ही वर्ल्डकपच्या आधी बातमी फोडली की भारताची टीम भगव्या कपड्यात खेळणार आहे. तर लई जनानी आम्हाला येड्यात काढायचा प्रयत्न केला. म्हणे भिडू लोकांना काम नाहीत काहीही बातमी लावतेत. तर नंतर ते खर झालं. तरी तुम्हाला सांगत होतो आमचे कॉन्टॅकट डायरेक्ट मोठ्या साहेबांबरोबर हायत( असं लोक म्हणतात) आमच्या बातम्या गुगली नसत्यात.

तर अशातच आम्ही क्रिकेट जर्सीवर नंबर कधीपासून आला यावर सुद्धा लेख लिहिला. आता जर्सी या विषयावर आमची पीएचडी व्हायची बाकी होती. त्यातचं एक महेश झंवर म्हणून भिडू आलं आणि आमच्या पुढ चँँलेंज केलं की भारताने पांढऱ्या ड्रेस मध्ये खेळलेल्या वनडे सिरीज बद्दल पण माहिती द्या. मग त्यांनी अशीही सूचना दिली की रिसर्च टीमला कामाला लावा. काही तरी हिंट देखील दिली.

तर गोष्ट आहे सोळाव्या शतकातली. तेव्हा क्रिकेटचा शोध लागला असं म्हणतात. जेव्हा आमच्या देशात मराठे मुघलांशी लढत होते तेव्हा इंग्लिश साहेब पांढऱ्या कपड्यात बॅटबॉल खेळत होता. पुढे म्हणजे साधारण तीनशे वर्षांनी १९७८मध्ये पहिल्यांदा पकर्स क्रिकेटमध्ये रंगीत कपडे दिसले. सत्तरच्या दशकात वनडे क्रिकेट देखील आलं होतं. पण क्रिकेटच्या डूढ्ढाचार्यानी कपड्यात रंग स्वीकारले नाहीत.

शेवटी १९९२च्या वर्ल्डकपपासून रंगीत कपडे आलेच. हां सगळ्यानाच कुठ परवडतय ते रंगीत कपडे? अधनंमधनं चांगले स्पोन्सर मिळाले, मोठी टीम आली की खेळायचे नवीन कपड्यात. शाळेच्या युनीफॉर्मसारखं. मग मग आपली बीसीसीआय पण श्रीमंत झाली.

कोकाकोला विल्स वगैरे जाहिराती येऊ लागल्या.जगातल्या टीमकडे पण पैसा आला होता. मग फायनली आयसीसीनेचं पुढाकार घेऊन वनडेतला पांढरा सदरा रद्द केला. (याचाच अर्थ वनडे मधून लाल बॉल पण गायब. तिथून सगळे एकदिवसीय सामने पांढऱ्या बॉलवर)

या जंटलमन ड्रेस मधली शेवटची वनडे सिरीज झाली २००० सालच्या झिम्बाब्वेच्या भारत दौऱ्यामध्ये.

पाच मॅचची सिरीज होती. भारताने ४-१ने जिंकली. ते जिंकणारच होती पण तुम्हाला उत्सुकता शेवटच्या मॅचबद्दल असणार. तर झालं असं की अझरूद्दीनचा काळ संपून गांगुलीचं साम्राज्य सुरु झालेलं. त्याच्यामुळ झहीर, युवराज, सेहवाग अशा नवीन खेळाडूना चान्स मिळालेला. झिम्बाब्वे सुद्धा त्याकाळात भारी होती. हिथ स्ट्रीक कप्टन, अंडी आणि ग्रांट फ्लॉवर बंधू, अॅलिस्टर कॅम्पबेल वगैरे भारी होते.

पण दुर्दैवाने या पांढऱ्या कपड्यातल्या शेवटच्या वनडेमध्ये गांगुली नव्हता. मागच्या मॅच मध्ये त्याने जरा वांडपणा केलेला. सलग चार बॉलला गरज नसताना उगीचचं चारवेळा अपील केला. रेफ्रीनं फॉर्ममध्ये असलेल्या गांगुलीला पुढच्या मॅचमध्ये बाहेर बसवलं.

बर मुद्द्यावर येतो. १४ डिसेंबर २०००, राजकोट

त्या मॅचसाठी पहिल्यांदाच द्रविडला कप्टन करण्यात आलं. टोस झिम्बाब्वेने जिंकून पहिली फिल्डिंग घेतली. पण गांगुली नसल्यामुळे एस.श्रीरामला ओपनिंगला संधी मिळाली. तो काही चालला नाही. विश्वासू गडी सचिनपण मूड मध्ये नव्हतं की काय पण लवकर आउट झाला.

पाठोपाठ द्रविडची वॉल पण कोसळली. कधी नव्हे ते हेमांग बदानी टिकला. त्याने युवराजला घेऊन डाव सावरला. युवराजनंतर सहा नंबरला येणाऱ्या सेहवागने काही चमक दाखवली नाही. सात नंबरला येऊन रितींधर सिंग सोढीने चांगली फिफ्टी मारली.

सगळ ठीक चालेलं ओ. पण तेवढ्यात बदानी ७७ वर आउट झाला आणि आगरकर आला. २१६चा स्कोर बोर्डवर लागला होता. सगळ्यांना वाटलं लईत लई २४०, डोक्यावरून पाणी.

अजित भालचंद्र आगरकर. त्यादिवशी काय खाऊन आलेला माहित नाही. आल्या पासून त्याने धुवायला सुरवात केली. सचिन, द्रविड, सेहवागसारखे बॅटसमन जिथे फेल गेले तिथे आगरकर तलवारीसारखी बॅट फिरवू लागला. बघता बघता गड्यान २१ बॉल मध्ये  फिफ्टी मारली. भारतातर्फे सगळ्यात फास्ट हाफ सेंच्युरी. त्यादिवशी झिम्बाब्वेचे बॉलरसोडा पण भारतीय खेळाडू प्रेक्षक सगळे शॉकमध्ये होते.

विशेष म्हणजे भारतातर्फे यापूर्वीचा फास्ट हाफ सेन्च्युरीचा रेकॉर्डसुद्धा एका फास्ट बॉलरच्या म्हणजे कपिल देवच्या नावावर होता. सतरा वर्षांनी आगरकरने तो मोडला. भारताची इनिंग संपली तेव्हा सोढी आणि आगरकरने स्कोर ३०१ ला नेऊन ठेवलेला. त्याकाळच्या मानन झिम्बाब्वेला अशक्य. आगरकरने ७ फोर आणि ४ सिक्स मारून २५ बॉल मध्ये ६७ धावा काढल्या होत्या.

झिम्बाब्वे आता फॉर्मलिटी म्हणून बॅटीगला उतरली. त्यांनी काय बाद फलंदाजी केली नाही पण मोठी पार्टनरशिप झाली नसल्यामुळे २६२ मध्ये त्यांचा डाव आटोपला. आगरकर पठ्ठ्यान इथ पण आठ ओव्हर मध्ये २६ धावा देऊन 3 विकेट घेतलेल्या. त्या दिवशीचा हिरोचं तो होता.

पांढऱ्या कपड्यातल्या गांगुलीने सिरीजची ट्रॉफी उचलली. आगरकरला सामनावीर तर गांगुलीला मालिकावीर मिळालं. झिम्बाब्वे ती मॅच कधीच विसरणार नाही आणि आपण पण कसोटीच्या कपड्यातला शेवटचा वनडे म्हणून त्याला विसरणार नाही.

विशेष म्हणजे एकोणीस वर्षे झाले. गंगेतून बरच पाणी वाहून गेलं. कोहली, रोहित शर्मा सारखे अनेक मोठे खेळाडू आले. अजूनही आगरकरचा विक्रम मोडला गेला नाही. पांढरा ड्रेस आगरकर साठी लकी होता म्हणायचा.

हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. Sheetal says

    Colour clothes first in Benson and Hedges cup 1986 not in 1992

  2. Avinash Batule says

    इथं प्रत्येक विषय पद्धतशीर पणे, आणि वाचकाने कुणास तरी वाचण्यास भाग पडावे, असाच असतो, भिडू तुमच्या लिखाण कौशल्यास सलाम……

  3. Arun says

    आगरकर चा न-मोडलेला विक्रम काय ते समजलं नाही…

Leave A Reply

Your email address will not be published.