कॉंग्रेसच्या या मंत्र्याने खुद्द स्वतःचा अंतिमसंस्कार केला होता..
मार्च २००३. मध्यप्रदेशच्या सागर गावामध्ये धर्मसभा बोलवण्यात आली होती. या धर्मसभेचे संचालन करत होते रावतपुरा सरकार नावाचे एक संन्यासी महागुरू. धर्मसभेचे कारण देखील धक्कादायक होतं, एक व्यक्ती स्वतःचा अंतिमसंस्कार करत होती. ते होते मध्यप्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष श्री विठठलभाई पटेल.
संपूर्ण भारतात खळबळ उडाली. जी कॉंग्रेस आपल्या पुरोगामी विचारांचा डंका सगळीकडे वाजवत असते त्यांचाचं नेता अंगावर दुधाचा अभिषेक वगैरे करून हा विचित्र प्रकार करत होता. ते आत्महत्या करत होते का काहीच कळायला मार्ग नव्हता. न्यूजचॅनलनी त्याचं लाइव्ह प्रक्षेपण केलं होतं. तत्कालीन कॉंग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली.
कोण होते विठ्ठलभाई पटेल? का त्यांनी स्वतःचा अंतिमसंस्कार केला होता?
विठ्ठ्लभाई पटेल यांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. फुल छाप बिडी मध्यप्रदेशमध्ये प्रसिद्ध होती ती विठ्ठल पटेल यांचीच. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या या मुलाची आवड मात्र धंद्यामध्ये नव्हती. त्याला कविता करायला आवडायच्या. कार चालवायला आवडायची. तरुणात आलेल्या प्रत्येकाला असतात ते सगळे शौक होते.
एवढच नाही तर १९६९ साली झालेल्या मध्यप्रदेश कार रेसिंग स्पर्धेत विठ्ठलभाई यांनी पहिला नंबर देखील पटकावला होता. कायम खिशात फुल छाप बिडी आणि एक सोन्याचा लायटर बाळगणारा हा मुलगा हळव्या कविता लिहायचा. त्या पेपर मध्ये छापून यायच्या. यापैकी काही कविता गाजल्या देखील.
त्याची प्रसिद्धी राज कपूर यांच्या पर्यंत जाऊन पोहचली. ते त्यावेळी बॉबी हा सिनेमा बनवत होते. मेरा नाम जोकर फ्लॉप झाल्यामुळे त्यांची रस्त्यावर येण्याची वेळ आली होती. कसेबसे पैसे जोडून हा बॉबी सिनेमा ते बनवत होते. शक्य आहे तिथे पैसे वाचवले जात होते. सगळ्या नवीन कलाकाराना घेऊन बॉबी बनवला जात होता.
राज कपूरचे लाडके संगीतकार शंकर जयकिसन देखील या सिनेमावेळी नव्हते, यावेळी त्याने संधी दिली होती लक्ष्मीकांत प्यारेलाल याना. तसेच गीतकार म्हणून आनंद बक्षी होते पण त्यांच्या बरोबर राजकवी इंदरजित तुलसी आणि विठ्ठ्ल पटेल हे दोघे होते. संगीताच्या बाबतीत कोणतीही तडजोड करायला राज कपूर यांचा नकार होता.
सिनेमा गाजला, त्याहूनही जास्त त्याची गाणी गाजली. हम तुम एक कमरे मै बंद हो आणि मै शायर तो नही या गाण्यांनी लोकांना वेड लावलं होतं. आणखी एक गाण होत ज्याने फक्त तरुणांनाचं नाही तर म्हाताऱ्या कोताऱ्या पासून बालवर्गामध्ये स्थान मिळवल होतं, ते म्हणजे
“झूट बोले कौआ काटे काले कौएसे डरियो, मै मायके चली जाउंगी तुम देखते रेहियो”
हे गाण लिहिलं होतं विठ्ठलभाई पटेलांनी. हिंदीमधल्या एका कहावतीला गाण्यात बदलल्यामुळे ते प्रचंड पॉप्युलर झालं. पटेलांना या गाण्यासाठी फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालं. पण अवार्ड काही मिळालं नाही. पटेलांनी राज कपूर यांच्या सत्यम शिवम सुंदरम, सुभाष घाई यांचा विश्वनाथ असे अनेक सिनेमे केले. पण बॉबी सारखं यश त्यांना मिळालं नाही.
मग त्यांनी लक्ष राजकारणाकडे वळवल.
कॉंग्रेसमधून विधानसभेची निवडणूक लढवली, सागरमध्ये त्यांची पॉप्युलॅरिटी एवढी होती की ते निवडून देखील आले. त्यांना सागरचा राजा संबोधल जायचं. त्यांना मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांनी आपल्या मंत्रीमंडळात देखील घेतलं.
विठ्ठलभाई पटेल आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध होते. कॉंग्रेसमध्ये राहूनही पक्षाच्या विरोधात एखादी गोष्ट बोलायची झाली तरी ते घाबरायचे नाहीत.
१९८८ साली किशोर कुमार यांचं निधन झालं होतं. त्यांच घर मध्यप्रदेशमधील खांडवा येथे होत. आणीबाणीच्या काळात किशोर कुमारनी केलेल्या टीकेमुळे कॉंग्रेसचा त्यांच्यावर राग होता. तेव्हा त्यांच्यावर बंदी देखील घातली होती. किशोरदांच्या मृत्यूनंतरही त्यांच स्मृतीस्थळ न उभारून मध्यप्रदेशमधल्या कॉंग्रेससरकारने शत्रुत्व टिकवून ठेवलं होतं.
विठ्ठलभाई पटेलांना ही गोष्ट आवडली नाही. त्यांनी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले. तरीही स्मृतिस्थळ बांधण्याची कोणतीही हालचाल न दिसल्यामुळे अखेर त्यांनी आंदोलन सुरु केलं. रस्त्यावर उभे राहून लोकांकडून ते १-१ रुपया गोळा करू लागले. याचा परिणाम झाला आणि लाजून का होईना खांडवा मध्ये किशोरकुमार यांचे स्मृतीस्थळ उभे राहिले.
एवढेच नाही राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळातून बाहेर पडून पुढे स्वतः पंतप्रधान बनणाऱ्या व्ही.पी.सिंग यांचं अभिनंदन करणारे ते एकमेव कॉंग्रेस नेता होते. याबद्दल त्यांच्यावर टीका झाली पण तेव्हाचे मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांनी विठ्ठल भाईनी राजकारणी म्हणून नाही तर एक कवी म्हणून या शुभेच्छा दिल्या होत्या असं सांगितलं.
विठ्ठलभाई पटेल हे कायम असे वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून मध्यप्रदेशमध्ये प्रसिद्ध राहिले. पण कधी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. स्वतःचा बिडी उद्योग मोठा असल्यामुळे पैसे खाण्याची त्यांना कधी गरज नव्हतीच पण याशिवायही क्लीन इमेज त्यांनी सांभाळली. याबद्दल त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता.
पुढे जाऊन ते राजकारणातून विरक्त झाले. त्यांना रावत्पुरा सरकार या गुरुच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त वेळ अध्यात्मामध्ये घालवू लागले. पूर्ण जन्मात केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी स्वतःचा अंतिमसंस्कार करून घेतला होता. पण हा अंतिमसंस्कार केल्यावर त्यांनी प्राणत्याग वगैरे काही केलं नाही.
या घटनेनंतर दहा वर्षांनी सागर येथेच वृद्धापकाळाने त्यांच निधन झालं. शेवटपर्यंत त्यांची ख्याती कॉंग्रेसचे कान उपटणारा गांधीवादी नेता अशीच राहिली.
हे ही वाच भिडू.
- वाजपेयींना हरवण्यासाठी कॉंग्रेसने बॉबी सिनेमा दाखवण्यास सुरवात केली
- यशवंतराव चव्हाण कॉंग्रेसमध्ये परत यावेत यासाठी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी मध्यस्थी केली होती ?
- अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर लिहणारे संजय बारु कॉंग्रेसचे की भाजपचे ?