कोणत्याही धर्माचा माणूस मरो, जेवू घातल्याशिवाय भारतात मुक्ती भेटत नाही असं का?

अनेक संशोधनांनी सिद्ध केलंय की विधी घातल्यानं माणसाच्या मनावरचा ताण हलका होतो. त्यांच्यात तथ्य असो वा नसो, माणसाला दुःखातून बाहेर ओढायला आणि मनावरची किल्मिषे दूर करण्यासाठी अशा गोष्टींचा वापर होतो. भले मग तो विधी धर्मात सांगितलेला असुदे, की गावच्या देवऋश्याने दाखवलेला असुदे की अगदी आपल्या मनाने वाटेल तसा केलेला असुदे!

शोकाकुल माणसाच्या जीवाला बरं वाटायला आणि अचानक झालेल्या आघाताला विसरून परत कामं सुरु करायला अशा गोष्टी मदत करतात.

आणि त्यातल्या त्यात श्राद्धाचं जेवण घालताना जेव्हा ठरवायचं असतं की कांदा परतलाय की नाही, मोहऱ्या शिल्लक आहेत का, घरातला कढीपत्ता संपलाय, भातातले खडे निवडून काढायचेत. दुःखात बुडालेल्या माणसाला पुन्हा इथल्या रोजच्या गोष्टी करायला कारण म्हणून श्राद्ध मोठीच सोय आहे.

त्याची व्याख्या ‘श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्’ अर्थात श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध अशी केली जाते.

म्हणूनच की काय भारतातल्या सगळ्याच धर्मांत मयतीनंतर अन्नाच्या माध्यमातून त्याला आठवणीत ठेवलं जात. मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात वारलेल्या माणसाच्या घरी येताना सगळेजण काहींना काही पदार्थ घेऊन येतात. चिकन बिर्याणी, सॅन्डविच, फ्राईड चिकन अशा गोष्टीही आपुलकी दाखवून जातात.

भारतात श्राद्धच्या जेवणाला भरभक्कम परंपरा आहे. आपल्यात श्राद्धाची प्रथा इ. स. पू. पासून सुरु झालेली आढळते. आपले पूर्वज किंवा पितर आपले बरं-वाईट बघत असतात. त्यामुळं त्यांना भरपेट जेवायला घालून खुश ठेवलं पाहिजे ही कल्पना प्राचीन काळापासूनची आहे. ऋग्वेदामध्येही याचा उल्लेख केलेला आहे.

त्यामुळे त्यांना खुश करून आपले हित साधण्याच्या ऍंगलने जुन्या लोकांनी त्यांना काही पदार्थ विधि करून अर्पण करायाला सुरु केलं असावं. आणि पुढे पितरांविषयीच्या प्रेम व  श्रद्धेच्या भावनेतून ते कंटिन्यू झालं असावं असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

पण पुढेपुढे पूर्वजांचे चोचले एवढे वाढलेले दिसतात कि “देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम्” म्हणजे देवाच्या आणि पूर्वजपितरांच्या कामात हेळसांड केली तर याद राख अशी धमकीच उपनिषदांमध्ये दिलेली आहे.

पिंडदान करताना भाताचे गोळे बनवण्याची परंपरा अशीच आहे. त्या गोळ्यांची पेटपूजा करणारा कावळा हासुद्धा धर्माचा मोठा घटक बनला आहे.

कुराणातही मयताच्या घरी अन्न शिजवू नये. पण शेजाऱ्यापाजाऱ्यांनी त्यांना खाऊ घालावे अशी आज्ञा दिली आहे.

जफर बिन अबी तालीब यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच मुहम्मद पैगंबर स.अ.व. यांनी “जफरच्या कुटुंबासाठी जेवण तयार करा” अशी सूचना दिल्याचं अनेक हदीसकारांनी नोंदवलं आहे. या संबंधीचे अनेक हदीस अल-बुखारी पासून अबू बक्र तुरतुशीच्या इतिहासाच्या पुस्तकातही सापडतात.

पण भारतातल्या मुस्लिमांनी त्याला इथल्या स्थानिक संस्कृती आणि चवीची जोड देऊन एका वेगळ्या उंचीवर पोचवलं आहे. हैद्राबादला बिर्याणी, हलीम, कबाब, दहीवडे अशा कायकाय गोष्टी घेऊन लोक मयताच्या घरी येतात.

महाराष्ट्रात गावाकडंही अग्नी दिलेल्या माणसानं १३ दिवस घरात जेवू नये अशी रीत अजूनही पाळली जाते.

बुद्ध धर्मातही शोकाकुल परिवाराला व भिक्खूना जेवायला घेऊन शेजारीपाजारी पांढऱ्या कपड्यात येतात. “दाणे” नावाच्या या प्रथेमध्ये परपु नावाची डाळ, नारळाची कढी भात वाढला जातो .

पण हिंदू धर्मात आढळणारी पितृपक्षाची परंपरा जगात भारीय. इतक्या प्रदीर्घ काळ आपल्या पूर्वजांच्या नावाने जेऊ घालण्याची भक्कम परंपरा दुसऱ्या इतिहासात सापडत नाही. इटलीत सिसिलीच्या बेटांवर ‘सगळ्या आत्म्यांचा दिवस’ म्हणून एक प्रथा पाळली जाते. त्यावेळी त्यांच्यात माझींपॅन म्हणजे बदाम-दही टाकून केलेल्या पोळ्या बनवायची पद्धताय.

मेक्सिकोमध्येपण ‘डे ऑफ द डेड’ म्हणून साजरा करतात. साखरेच्या खोपड्या आणि भोपळ्याचे चेहरे बनवून एन्जॉयमेंट करण्याकडंच त्यांचा कल असतो. पण तेवढंच!

जोनाथन पेरी नावाच्या माणसानं काशीत येऊन एक संशोधन केलं. नेपाळच्या राजाच्या मयताच्या वेळी त्याच्या मृत शरीराला खीर पाजण्यात आली होती असं तो लिहितो. तेराव्याच्या दिवशी बिनमिठाचा भात करण्यात आला होता. श्राद्धामध्ये फक्त शाकाहारी जेवण करायची हिंदूंची पद्धत जाचक असली तरी ती माणसांनी ‘त्या दिवशी शिकार करून खाऊ नये’ या समजातून आलेली असल्याचं तो सांगतो.

आपल्याइकडे माणूस वारल्यावर सगळ्या भाज्या एकत्र करून एक भाजी बनवतात. “घास करणे” असं आडनिड नाव त्याला दिलं जातं. त्यात जास्त मीठमसाला टाकू नये याकडे कटाक्ष असतो. सावडल्यानंतर राख टाकताना तिथंच बसून ही भाजी कोरभर भाकरीच्या तुकड्यासोबत सगळं कुटुंब वाटून खातं. यात धार्मिक भाग कमी पण सामाजिक अनुभूती मोठी असते. घराचा आधार ढासल्यानंतर आता सगळं बरंवाईट सोबत खाल्लं पाहिजे, चांगल्यावाईटाला मिळून राहिलं पाहिजे हा संदेश कुटुंबाच्या मनावर आपोआप वठवला जातो.

त्यांमुळं जेवण करायची हि परंपरा मुळातच माणसाच्या मनाला शांत करण्यासाठीच आहे.

त्यामुळं जसजसा भूगोल बदलत जाईल तसतशी जेवणाच्या पदार्थांची यादीही बदलत जाते. त्यामुळं हे जेवण वशाट असो की शाकाहारी, रुचकर असो की साधं – या सगळ्या जेवणाचं काम एकच – माणसाचं दुःख मोकळं करणं एवढंच होतं.

गोंड आणि भूमिया आदिवासींमध्ये श्राद्धाला तर जबरदस्त पैसा खर्चावा लागतो. पूर्वज हेच देव होत असल्यानं तिथं याच्याकडे जास्त सिरियसली बघितलं जातं. फक्त श्रीमंतच नाही तर गरीबाच्या लोकांनाहि हा विधी करणं भाग पडतं. अनेकांना बैलजोडी विकायला लागायची आणि ५० मैलांहूनही लोकं जेवायला येतात, त्यांचा आदरसत्कार केला जातो.

फक्त माणूस मेला म्हणूनच नाही! तरुण पिढीनं ब्रेकअप झाल्यानंतर पार्ट्या देण्याची गोष्टही याच येते. एक रिलेशनशिप संपल्यानंतर त्याचा शेवट दोस्तांना त्यांच्या आवडत्या खाद्याची पार्टी करून देणे हा विधी पाश्चिमात्त्य जगात जोमाने सुरु झाला. तिकडे यासाठी डिप्रेशनमधून बाहेर काढणारी हॉटेलं सुरु झालीयेत.

ही धर्मसंहिता आपल्याइकडच्या तरुण-तरुणींनी मनावर घेणे ही काळाची गरज आहे.

सनम बेवफा होऊन दुःखात बुडालेल्या दोस्तांच्या मनाला खंबीर आधार द्यायला ब्रेकअपचे श्राद्ध घालण्याची ही परंपरा लवकर यावी असे साकडे आम्ही यानिमित्ताने घालत आहोत.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.