…आणि मुलींनी खांद्यावर तिरडी घेत बुरसटलेल्या परंपरा जाळून टाकल्या

समाज माध्यमांवर सध्या एका बातमी खूपच फिरते आहे. मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये वृद्धापकाळाने आईचं निधन झाल्यावर मुलींनीच आईला खांदा दिला. मृत माउलीला मुलं नव्हती असं नाही. चांगली धडधाकट तीन मुलं असूनही मुलींनी त्यांच्याकडून आईला खांदा देण्याचा हक्क काढून घेतला. हेच या घटनेला बातमी बनवण्यामागंच मुख्य कारण राहीलं.

नेमकं झालं काय?

वीस वर्षांपूर्वी उच्चशिक्षित मुलांनी जन्मदात्या आईला घरातून हाकलून दिलं. त्यानंतर मुलींनी आणि जावयांनीच माय माऊलीचा सांभाळ केला. शेवटच्या काळात तिन्ही मुलांना भेटण्याची इच्छा असूनही मुलं आईच्या भेटीला आले नाहीत. त्यांना कधीही मायेचा पाझर फुटला नाही. अखेर त्या आईने मुलांची वाट पाहत १ जानेवारीला अखेरचा श्वास घेतला.

आईच्या अंत्यसंस्कारालासुद्धा तीन मुलांपैकी दोन मुलांनी पाहुण्यांसारखी हजेरी लावली. मुलांच्या अशा वागण्याने संतापलेल्या मुलींनी आईच्या मृतदेहाला हातही लावू दिला नाही. तिन्ही मुली एका जाऊबाईच्या मदतीने खांद्यावर आईची तिरडी घेऊन स्मशानभूमित गेल्या आणि त्यांनीच अंत्यसंस्काराचे सगळे विधी केले. चंद्रभागाबाई आनंदा साखळे असं मृत पावलेल्या 90 वर्षीय मातेचं नाव. त्यांना सुभद्राबाई टाकसाळे, सुनीता सोने, जिजाबाई टाकसाळे या तीन मुली आणि जाऊबाई छाया शिरसाठ यांनी खांदा दिला.

ही घटना सोशल मिडीयावर चांगलीच पसरली. नेटकाऱ्यांनी मुलींच्या वागण्याचं समर्थन केलं. त्यांच्या अशा वागण्याने अनेकांना सावित्रीबाईंची आठवण झाली आणि साऊंच्या लेकी म्हणून त्यांचं कौतुक केलं. पण समाजाच्या नियमांना फाटा फोडणारी अशी ही पहिलीच घटना आहे का? तर नाही. याआधीही अशा घटना घडलेल्या आहेत.

ज्यादिवशी औरंगाबादमध्ये ही घटना घडली त्याच दिवशी अशीच घटना ओडिसातील पुरीमध्ये घडली. पुरीतील मंगळाघाट इथल्या रहिवासी जाति नायक या 80 वर्षांच्या होत्या. त्यांचं १ जानेवारीला वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांना दोन मुलं आहेत. मात्र, त्यातील एकही आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी हजर राहिला नाही. यावेळी कोणतीही उणीव न भासू देता चार कन्यांनी आपल्या आईच्या पार्थिवाला खांदा दिला.

मंगळघाट ते स्वर्गद्वार असे ४ किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन या मुलींनी आपल्या आईचा अंतिम संस्कारविधी पूर्ण केला. पुरीतील मंगळाघाट परिसरात अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग हजारो लोकांनी अनुभवला.

ऑगस्ट २०२१ मध्येही अशी घटना घडली ती सोलापूरच्या बार्शी तालुक्यात. सासू-सूनचं नातं हे केवळ भांडण्यासाठी आहे, असा समज काहींनी जणू मनोरंजनासाठीच सगळीकडे पसरवून ठेवलाय. याला छेद दिला तो मुंडे कुटुंबानं. दमयंती मुंडे यांचे वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्यविधी निघाली त्यावेळी मृतदेहाला खांदा देण्यासाठी सुना पुढे आल्या. परंपरेला छेदणारा सासू-सुनांच्या नात्यातील हा प्रत्यय सर्वांसमोर दिशादर्शक ठरला.

जून २०२१ मध्ये तर चंद्रपूरमधून समाजाचं धक्कादायक वास्तव अंत्यसंस्काराच्या घटनेतून समोर आलं.

जातपंचायतीनं गोंधळी समाजाच्या एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला. या कुटुंबातील कर्ता पुरुष मरण पावला. प्रकाश ओगले असं त्याचं नाव. त्यांना ७ मुली आणि २ मुलं. मात्र, बहिष्कार टाकल्यामुळे त्यांना खांदा देण्यासाठी समाजातील एकानेही पुढाकार घेतला नाही. शेवटी घरातील मुलींनी आपल्या वडिलांना खांदा दिला. जात पंचायतीला सणसणीत चपराक त्यांनी लगावली.

एक काळ असा होता जेव्हा महिलांवर अनेक नियम आणि अटी लादल्या जात होत्या. त्यांच्या वागणुकीवर मर्यादा घातल्या जात होत्या. काही प्रमाणात त्या आजही आहेत. परंतु काळासह हळूहळू का होईना अनेक गोष्टी बदलत असल्याचं दिसून येत आहे. पुरुषप्रधान संस्कृतीतील बुरसटलेल्या परंपरांना मागे टाकत भारतीय महिला नवीन आदर्श उभा करत आहेत.

सावित्रीबाईंनी भारतीय महिलांना शिक्षणाचा हक्क देऊन त्यांची सदसदविवेकबुद्धी जागी करण्याचं काम आयुष्यभर केलं. सर्व भेदभावांच्या पलीकडे जाणून माणूस म्हणून जगण्याची शिकवण दिली. अन्यायकारक पुरुषप्रधान प्रथांविरुद्ध लढण्यासाठी निरंतर त्यांनी सांगितलं. शोधायला गेलं तर औरंगाबादसारख्या अनेक घटना सापडतील.

या घटना समाज बदलत असल्याचं प्रतिक आहे. अशा घटनांमधून साऊंच्या विचारांची प्रेरणा त्यांच्या लेकी घेतायेत हेच सिध्द होतंय. हळूहळू का असेना, समाज घडतोय हेच यातून दिसतंय.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.