लतादीदी व रफीच्या भांडणात आशा भोसलेंनी संधी साधली आणि गिनीज बुकात नाव नोंदवलं..

भारतीय चित्रपटसृष्टीतुन गाणी हा प्रकार काढला तर चित्रपट क्षेत्राचा आत्मा गायब झाल्याचा फील येतो . जुनी गाणी, नाईंटीजची गाणी, बॉलिवूड सॉंग्स ते आत्ताच पॉप , रॅप पासून सगळं आपली लोकं डोक्यावर घेतात. एकेकाळी गायकांच्या आवाजावर सिनेमा अवलंबून असायचा. जुन्या गायकांचा आवाज आजही आपल्याला भुरळ घालतो.

जुन्या गायकांमधून नाव आठवायची म्हणल्यावर सगळ्यात आधी आपल्यासमोर नाव येत ते म्हणजे लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, आशा भोसले या चौकडीचं. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र पार्श्वगायनाचं काम आहे. मात्र या गाण्यांच्या रेकॉर्डवरून एक प्रचंड मोठा झोल झालेला. याबाबतचा किस्सा आपण सविस्तररित्या बघू.

लता मंगेशकर यांना आपण भारताची गान कोकिळा म्हणतो. आजवर भारतीय चित्रपटाच्या इतिहासात त्यांनी २५००० पेक्षाही अधिक गाणी गेली आहेत. याच गाण्यांच्या प्रकरणावरून मोठा वाद झालेला. लता मंगेशकर यांनी १९७४ साली सर्वाधिक गाणी गाण्याचा रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला होता. १९४८ ते १९७४ या काळात सोलो, ड्युएट आणि कोरस अशी सगळी गाणी मिळून हि गाणी एकूण २० भारतीय भाषांमध्ये होती.

काही काळानंतर भारताचे नंबर वनवर असलेले गायक मोहम्मद रफी यांनी या घटनेवर आक्षेप नोंदवत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला पत्र लिहिलं कि सोलो, ड्युएट आणि कोरस मिळून मी २८००० गाणी गायली आहेत. पण १९८० साली गिनीज बुकचं दुसरं एडिशन येता येता मोहमद रफींचं निधन झालं. परंतु ज्यावेळी १९८७ साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच नवीन एडिशन आलं त्यावेळी त्यात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी या दोघांचं नाव होतं.

रफींच्या निधनानंतरही लता मंगेशकर गात राहिल्या. १९९० पर्यंत त्यांनी ३०००० गाणी गाऊन झाल्याचा दावा केला. यावर मात्र बऱ्याच लोकांचा आक्षेप होता, त्यांच्या गाण्यांचा विक्रम हा आजवर पेपरात छापून आलेले लेख, मासिकं यांच्या आधारावर नोंदवला गेला होता.आणि या गाण्यांची नोंद असल्याचा पुरावा लता मंगेशकरांकडे नव्हता.

यावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने लता मंगेशकरांकडे या विक्रमाचा पाठपुरावा मागितला. यात लता दीदींना पुरावा देण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नव्हतं. कारण गाण्याची रेकॉर्डिंग झाल्यावर लिखित स्वरूपात त्या नोंद ठेवत नसायच्या.

शेवटी १९९१ च्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नव्या एडिशनमधून लता दीदी आणि मोहम्मद रफी अशा दोघांचंही नाव हटवण्यात आलं. १९९१ ते २०१० या काळात हि कॅटेगिरी रिकामीच राहिली.

याच दरम्यान लता मंगेशकरांची लहान बहीण आणि महान गायिका आशा भोसले या गुपचूपणे आपल्या गाण्यांच्या नोंदी ठेवत होत्या. २०१० साली आशा भोसले यांनी १९४८ ते २०१० या काळात त्यांनी गायलेल्या सगळ्या गाण्यांच्या नोंदी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वाल्यांना सादर केल्या आणि स्वतःच नाव वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत समाविष्ट केलं. यात सांगण्यात आलं कि,

१९४८ ते २०१० या काळात आशा भोसले यांनी तब्बल २० भारतीय भाषांमध्ये ११००० गाणी गायली आहे.

२०११ साली आलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नव्या आवृत्तीत आशा भोसले यांच्या नावावर सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम नोंदवण्यात आला.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफींच्या भांडणात आशा भोसलेंनी गुप्तपणे आपला लाभ करून घेतला. हे तीनही गायक आपापल्या जागेवर महान होते. त्यांची गाणी आजही आपण मोठ्या आवडीने ऐकतो. सध्या हा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम दक्षिण भारतातल्या पी सुशीला यांच्या नावावर आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.