गायलेल्या पहिल्या गाण्याचं क्रेडिट लतादीदींच्या ऐवजी एका हिरॉईनला देण्यात आलं होतं

लता मंगेशकर. नाव ऐकताक्षणी मनात आदर आणि अभिमान या दोन भावना दाटून येतात. लता मंगेशकर हा आवाज कधी एकांतात सोबत करतो, तर कधी रात्रीच्या वेळेस ‘लग जा गले’ म्हणत मन शांत करतो. गाण्याची मैफिल असो किंवा गप्पांचा कार्यक्रम. बॅकग्राऊंडला लतादीदींचा आवाज असेल तर आपसूक एक वेगळा माहोल निर्माण होतो.

तसं कला ही प्रत्येक गोष्टीच्या पलिकडे असते. तिला कोणत्याही चौकटीत बांधून ठेवू नये. पण तरीही भाबड्या मनात लता मंगेशकर हे रत्न मराठमोळ्या मातीत जन्माला आलं याचा सार्थ अभिमान वाटतो.

आज भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचा वाढदिवस.

भिडुंनो, लता मंगेशकर यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याबद्दल लिहायला गेलं तर एक स्वतंत्र लेखनमाला तयार होईल. लता मंगेशकर यांची अनेक गाणी मनात जवळची. पण एका वेगळ्या गाण्याचा उल्लेख सुरुवातीला करावासा वाटतो, तो म्हणजे ‘सरणार कधी रण’ या गाण्याचा.

‘शिवकल्याण राजा’ अल्बम मधलं हे गाणं जेव्हा कानावर पडतं तेव्हा अंगावर काटा येतो.

बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानावर आधारित हे गाणं लतादीदींनी ज्या आर्त आवाजात गायलं आहे, ते शब्दात मांडू शकत नाही. पावनखिंडीत घडलेला तो रणसंग्राम आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. हे गाणं ऐकताना डोळ्यांत टचकन पाणी कधी येतं, हेच कळत नाही.

तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण लतादीदींनी आयुष्यात जे पहिलं गाणं गायलं, त्या गाण्यासाठी लतादीदींना क्रेडिट दिलं गेलं नव्हतं.

वडील दिनानाथ मंगेशकर यांच्या निधनामुळे घरची कोसळलेली आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी लतादीदी गायन क्षेत्रात दाखल झाल्या. हा किस्सा १९४८ सालचा. याचवर्षी आलेल्या ‘जिद्दी’ या हिंदी सिनेमात लतादीदींना त्यांच्या आयुष्यातलं पहिलं सोलो गाणं गाण्याची संधी मिळाली.

‘जिंदगी का आसरा समझे’ असे या गाण्याचे शब्द होते.

परंतु या गाण्यासाठी क्रेडिट लिस्टमध्ये लतादीदींच्या नावाचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यांना क्रेडिट देण्यात आलं नव्हतं.

या सिनेमात लतादीदींच्या ऐवजी आशाला क्रेडिट देण्यात आलं होतं.

पण ही आशा… आशा भोसले नव्हती. तर ‘जिद्दी’ सिनेमात देव आनंद, कामिनी कौशल यांसारखे कलाकार होते. कामिनी कौशल यांच्या व्यक्तिरेखेचं सिनेमात असलेलं नाव आशा होतं.

कामिनी कौशल आणि लता मंगेशकर यांचा आवाज थोडाफार एकमेकांशी मिळताजुळता होता.

त्यावेळी लता मंगेशकर यांना प्रसिद्धी मिळाली नव्हती. त्यामुळे जेव्हा हे गाणं म्युझिक कंपनीद्वारे लोकांपर्यंत पोहोचलं, तेव्हा आवाजाच्या सारखेपणामुळे म्युझिक कंपनीने गृहीत धरलं की, हा आवाज कामिनी कौशल यांचा आहे.

कामिनी कौशल तेव्हाची लोकप्रिय अभिनेत्री. त्यामुळे लोकांनाही वाटलं की, सिनेमात कामिनी कौशल यांनी गाणं गायलं आहे.

या गैरसमजामुळे म्युझिक कंपनीतर्फे लतादीदींनी गायलेल्या गाण्याचं क्रेडिट कामिनी कौशल यांना दिलं गेलं. बरं… तो काळ असा होता, की एकदा काम झाल्यावर कलाकार आपल्या वाट्याला निघून जायचे. त्यामुळे लतादीदींनी सुद्धा याची पडताळणी केली नाही. किंवा कामिनी कौशल यांच्यासुद्धा ही गोष्ट नजरेत आली नाही.

हे गाणं संगीतप्रेमींना प्रचंड आवडलं. गाणं हिट झालं.

लोकांनी कामिनी कौशल यांच्या आवाजाचं कौतुक करण्यासाठी त्यांना पत्रं पाठवली.

एका दिवसात आलेली इतकी पत्र पाहून कामिनी कौशल यांना निश्चित आनंद झाला. परंतु सगळी पत्र वाचल्यावर झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. लोकांचा गैरसमज दूर करणं गरजेचं होतं. त्यांनी लगोलग म्युझिक कंपनीला कळवलं की,

‘ते गाणं लता मंगेशकर यांनी गायलं आहे. तुम्ही माझं नाव काढून त्यांना क्रेडिट द्या.’

तसेच त्यांनी शक्यतो सर्व चाहत्यांच्या पत्रांना उत्तर देऊन त्यांना सुद्धा ही गोष्ट कळवली. आणि अशाप्रकारे म्युझिक कंपनीने झालेली चूक ताबडतोब सुधारली आणि लतादीदींना गाण्याचं क्रेडिट दिलं गेलं.

लतादीदींनी गायलेली गाणी अनेक पिढ्यांना घडवत गेली.

लतादीदींनी वेळोवेळी काही गोष्टींवर स्वतःच्या अशा ठाम भूमिका घेतल्या. एक कलाकार म्हणून समाजाप्रती असलेलं कर्तव्य त्या कधीही विसरत नाहीत. लतादीदी या क्रिकेटच्या चाहत्या आहेत. तसेच अभिनेते शिवाजी साटम यांची सी. आय. डी. मालिका आत्ता जरी संपली आली तरी लतादीदींनी मालिकेचा एकही भाग कधी चुकवला नाही.

धावपळीच्या जगात ‘तू जहा जहा चलेगा, मेरा साया साथ होगा’, असं म्हणत जो आवाज कायम आपल्या मनात असतो, अशा आनंदघन लतादीदींना उदंड आयुष्य लाभो, हीच प्रार्थना…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.