वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंना बक्षीस देण्यासाठी BCCI कडे पैसे नव्हते, तेव्हा लतादीदी पुढे आल्या

भारतात क्रिकेटचं वेड किती आहे हे तर सांगायची गरज नाही. मोठमोठ्या रकमेची तिकिटं काढून मॅच बघायला जाणारे चाहते आणि तिकीट न मिळाल्याने तोडफोड करणारे चाहते यावरून भारतात क्रिकेटची किती क्रेझ आहे हे आपल्याला कळतं. पण एक काळ असा होता की क्रिकेटर लोकांनाच मॅच खेळल्याचे पैसे मिळत नसायचे. त्याबद्दलचा आजचा किस्सा.

आज घडीला बीसीसीआयला सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड समजलं जातं. आयपीएलमुळे तर पैशांचा पाऊस खेळाडूंवर पडू लागला. भव्य दिव्य लाईट्स, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी यामुळे ज्या क्रिकेट प्रकारात पैसे जास्त तिकडे खेळाडू वळू लागले. कैक क्षेत्रातून या अमाप पैशावर टिकासुद्धा झाली पण बीसीसीआय पैशाने गबर झाली.

पण एक काळ इतका भीषण होता की खेळाडूंना पैसे मिळण्याची वाट बघावी लागायची. इतकंच नाही तर १९८३ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर खेळाडूंना मानधन म्हणून काहीतरी द्यावं लागेल असा विचार क्रिकेट बोर्डाचा चालला होता. पहिल्यांदाचं वर्ल्ड कप जिंकून कपिल देव आणि संघाने भीमपराक्रम केला होता. त्यावेळी बीसीसीआय इतकं गरीब कुणी नव्हतं. म्हणजे तेव्हा आयडिया करण्यात आली होती.

बीसीसीआयने आपली गरिबी लपवण्यासाठी लता मंगेशकर यांना या परिस्थितीबाबत सांगितलं आणि विनंती केली कि जर तुम्ही गाण्याचा कार्यक्रम केला तर यातून खेळाडूंना मानधन देता येईलच.

लता मंगेशकरांनी तर उलट आनंदाने संमती दर्शवली. लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. लता मंगेशकरांच्या गाण्याच्या शो चं तिकीट सुद्धा त्यावेळी महाग होतं पण लता मंगेशकरांची त्यावेळी प्रचंड फॅन फॉलोईंग होती त्यामुळे त्यातून भरपूर फायदा बीसीसीआयला झाला.

त्या गाण्यांच्या फंडातून २० लाख रुपये रक्कम गोळा झाली. या फंडाच्या पैशातून वर्ल्ड कपच्या संघातील प्रत्येक खेळाडूला १-१ लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.

हे मानधन सुद्धा घेण्यात खेळाडू संकोच करत असतील पण त्यावेळी १ लाख रुपये ही भरघोस रक्कम मानली जात होती. बीसीसीआयने पुन्हा पुन्हा लता मंगेशकरांचा आभार मानले होते.

यातच दुसरा किस्सा तर भीषण आहे. १९८९ च्या काळातला हा किस्सा. त्यावेळी भारताचे माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे हे भारतीय संघाचे मॅनेजर होते. तेव्हा भारताने मुंबईत एक कसोटी सामना जिंकला होता. त्यावेळी चंदू बोर्डे यांनी कपिल देवला सांगितलं की मी आता पुण्याला जात आहे, पुढच्या कसोटी सामन्यासाठी भेटू. अस म्हणून त्यांनी कपिल देवचा निरोप घेतला.

पण जेव्हा कपिल देव ३ तासानंतर परत आले तेव्हा चंदू बोर्डे सेक्रेटरी बोर्डच्या तिथेच उभे होते. त्यावर कपिल देव यांनी बोर्डेना विचारलं की,

तुम्ही अजून गेले नाही ?

तेव्हा चंदू बोर्डे म्हणाले की,

सेक्रेटरी बोर्डातील दैनंदिन भत्ता देणारे अधिकारी झोपलेले आहेत. ते जेव्हा उठतील तेव्हाच मला दैनंदिन भत्ता घेऊन पुण्याला जाता येईल.

यावरून लक्षात येतं की अगदी छोट्या रकेमसाठी सुद्धा भारतीय संघातील सदस्यांना वाट पाहावी लागायची. हा किस्सा खुद्द कपिल देव यांनी एका कार्यक्रमात सांगितला होता. आजची पैशांची उधळपट्टी पाहताना अनेक जुन्या क्रिकेटर लोकांना त्याचा राग येतो. पण आज क्रिकेट हे एक प्रकारचं ग्लॅमर बनलं आहे त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होते त्यामुळे बीसीसीआय या प्रकाराला प्राधान्य देते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.