लता मंगेशकरांनी खरंच सुमन कल्याणपूर यांचं करीयर संपवलं होतं?

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ आला होता. त्यात एक अतिशय गरीब कपड्यामधील वृद्ध बाई लता मंगेशकरांच “एक प्यार का नगमा है” हे गाण गाताना दिसल्या. नंतर कळाल की त्या पश्चिम बंगालमधल्या कुठल्यातरी स्टेशनवर गाणी गात गुजराण करतात.

बघता बघता तो व्हिडीओ देशभर व्हायरल झाला. लोकांनी त्यांना शोधून काढलं. राणू मंडल असं त्यांच नाव आहे हे कळाल. अनेकांनी त्यांना मदत केली. त्यांना एका रियालटी शोमध्ये गाण्याचा मौका मिळाला. तिथे त्यांचा मेकओव्हर झाला. एक कलाकार म्हणून त्यांना सन्मान मिळाला.

एवढच नाही तर लता मंगेशकर यांच्याप्रमाणे सुरेल आवाज असलेल्या राणू मंडल यांना त्या रियालिटी शोचा जज असलेल्या हिमेश रेशमियाने आपल्या एका नव्या सिनेमामध्ये गाण्याची संधी दिली. काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवर गाणारी गरीब राणू मंडल आता थेट हिमेश रेशमिया बरोबर गाताना पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

त्यांच्या गाण्याची चर्चा लता मंगेशकर यांच्या पर्यंत पोहचली. लतादिदींनी एका मुलाखतीमध्ये तिला वडीलकीचा सल्ला दिला,

“मी गायलेली गाणी गाऊन, माझ्या नावामुळे आणि माझ्या कामामुळे कुणाचं भलं झालं तर मी स्वतःला भाग्यवान समजते. मात्र माझा या गोष्टीवर विश्वास आहे की एखादी गोष्ट कॉपी करुन, नक्कल करुन प्रसिद्धी मिळते मात्र ती प्रसिद्धी ते यश फार काळ टीकत नाही. सध्याच्या घडीला असे अनेक उदयोन्मुख गायक गायिका आहेत जे माझी गाणी खूप चांगल्या प्रकारे म्हणतात. मात्र किती गायक गायिका असे आहेत? ज्यांचं यश स्मरणात राहिलं? मला फक्त सुनिधी चौहान आणि श्रेया घोषाल ठाऊक आहेत “

या वक्तव्यानंतर मात्र लतादिदीवर नेटीझन्सनी जोरदार टीका केली. या निमित्ताने चर्चा झाली सुमन कल्याणपूर यांची, एकेकाळी सुमन कल्याणपूर यांना दुसरी लता म्हणून ओळखलं जायचं. त्यांचा आवाज सेम टू सेम लता दीदींच्या सारखा होता.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला बंगाल मध्ये. पण त्यामुळच्या कर्नाटकातल्या मंगलोरच्या. वडील शंकरप्पा हेमाडी हे तिकडे एका बँकेत मोठ्या पोस्टवर होते. सुमनला लहानपणापासूनचं गाण्याची आणि चित्रकलेची आवड होती. वडिलांची मुंबईला बदली झाल्यावर सुमनच्या आवडीला जास्त वाव मिळाला. चित्रकलेसाठी भारतातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये तिला अडमिशन मिळालं. गाण शिकण्यासाठी देखील केशवराव भोळेच्या सारखा दिग्गज उस्ताद मिळाला. पण तिच्या वडिलांनी सांगितलेलं की शिकायला हरकत नाही पण समारंभात वगैरे गायचं नाही.

आज्ञाधारक मुलीप्रमाणे सुमनने होय म्हणून सांगितलं. पण तिच्या नशिबात काही वेगळंच लिहिलेलं होतं. तिचा आवाज ऐकून कोणीतरी रेडियोसाठी गाणार का असं विचारलं. वडिलांची परवानगी नसताना सुमनने धाडस करून ते गाण गायलं. तिच्या गाण्याचं कौतुक झालं आणि मग सुरु झाला तिचा सांगीतिक प्रवास.

रेडियोतील गाण्यामुळे तिला कार्यक्रमात गाण्याचा आग्रह होऊ लागला. हळूहळू तिची प्रसिद्धी फिल्मइंडस्ट्री पर्यंत पोहचली. शुक्राची चांदणी या मराठी सिनेमामध्ये सुमनला गायला मिळालं. पाठोपाठ मंगू या हिंदी सिनेमामध्ये मोहम्मद शफी या संगीतकाराने गाण्याची संधी दिली.

पुढे जेव्हा जेष्ठ गायक तलत मेहमूद यांच्या बरोबर दरवाजा सिनेमामध्ये सुमन कल्याणपूरनं ड्युएट गायलं त्यानंतर तिचं आयुष्यचं बदलून गेलं. तिच्या नावाची चर्चा सुरु झाली. 

पन्नासच्या दशकातला हा काळ. लता मंगेशकर यांचा सुवर्णकाळ म्हणता येईल. त्या तरुण होत्या. त्यावेळी जबरदस्त गाणी बनत होती. तेव्हाचे संगीतकार रागावर आधारित चाली बनवत असण्यामुळे लता मंगेशकर यांच्यासारख्या शास्त्रीय संगीताचं शिक्षण झालेल्या गायिकेला ते सोपं जात होतं. शिवाय तेव्हाची नूरजहान सारखी सुपरस्टार सिंगर फाळणीनंतर पाकिस्तानला निघून गेली होती यामुळे जास्त स्पर्धा देखील नव्हती. लता दीदींचा आवाज देखील देशभरातल्या प्रेक्षकांना साद घालत होता.

प्रत्येक सिनेमात प्रत्येक गाण्यात लता मंगेशकर यांचा आवाज हवा असा हट्ट निर्माते धरु लागले. लता दीदींच्या आवाजाच्या जोरावर फक्त गाणीच नाही तर सिनेमादेखील हिट होत होता. पण प्रत्येक सिनेमात गाणे दीदींना शक्य नव्हतं.

अशा वेळी ऑप्शन पुढे आला सुमन कल्याणपूर यांचा. जी गाणी लतादिदिंसाठी गात नाहीत ती गाणी त्यांच्यासारखाच आवाज असणाऱ्या सुमन कल्याणपूर यांना मिळू लागली. काही काही निर्मात्यांना लतादीदींचे मानधन मोठे असल्यामुळे त्यांना गायला लावण परवडत नव्हत. ही सगळी गाणी सुमन यांना मिळाली. राग यमन वर असलेल्या त्यांच्या पकडीमुळे यमन कल्याणपूर अशी त्यांची ओळख बनली.

पुढे साठच्या दशकात त्यांची अनेक गाणी गाजली. त्याकाळातल्या सगळ्या संगीतकारासोबत, गायकांसोबत सुमन यांनी काम केलं. कल्याणजी आनंदजी यांच्यासोबतचं “ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे ” हे गाण सुपरहिट झालं. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, रहे न रहे हम अशा गाण्यांनी काळ गाजवला. मराठीतही केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा अशी कित्येक गाणी रसिकांच्या तोंडात आहेत.

पण दुर्दैव असं की लोकांना ही सगळी गाणी लता दिदींनी गायली आहेत असच वाटलं. टीव्हीवर कित्येकदा छायागीतसारख्या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांच्या गाण्याला चुकून लता मंगेशकर यांनी गायलं आहे असं सांगितलं जायचं.  लता दिदींच्या छायेतून त्यांना बाहेरच पडता आलं नाही. शिवाय तो काळ संगीतक्षेत्रातल्या राजकारणाने भरलेला होता.

लता मंगेशकर यांचा त्याकाळात रॉयल्टीवरून म्युजिक कंपन्यासाठी वाद झाला. त्यांनी सर्व कलाकारांना एकत्र करून गायकांना आपला हक्क मिळवून दिला पाहिजे असा आग्रह धरला. याला मितभाषी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद रफी यांनी विरोध केला. त्यांच म्हणण होतं की,

“आपण गाण गाजलं तर त्यातून रॉयल्टी घेत असू तर गाण फ्लॉप झालं तर त्याची नुकसान भरपाई देखील द्यावी लागेल. आणि गाण शेवटी संगीतकाराचं असत व त्यावर सगळ्यात जास्त हक्क त्याचा असतो. गायक फक्त त्याच्यासाठी काम करतो मग रॉयल्टी का घ्यावी? त्यापेक्षा आपण मानधन वाढवून घेऊ.”

यामुळे लतादीदी दुखावल्या. त्यांनी रफींच्यासोबत गाणार नाही असा पवित्र घेतला. दोन दिग्गज कलाकारांच्या वादाचे पडसाद इतरत्र उमटणे साहजिक होतं. लता मंगेशकर जिथे गातात त्या सिनेमात रफी यांच्या ऐवजी महेंद्र कपूर यांना संधी मिळाली तर रफींच्या सोबत लतादीदींच्या ऐवजी सुमन कल्याणपूर यांना चान्स मिळाला. रफी आणि कल्याणपूर यांची जोडी चांगली जमली. दोघांचेही आवाज एकमेकाला पूरक असे होते.

रफी विरुद्ध लता हा वाद बराच काळ चालला. दोघांच्या बरोबर अख्ख्या इंडस्ट्रीचं नुकसान यामूळ होत होतं. अखेर जेष्ठ संगीतकारांच्या मध्यस्थीमुळ हा वाद मिटवण्यात आला. दोघांनी परत एकमेकासोबत गाण्यास सुरवात केली. यामुळे सुमन कल्याणपूर मागे पडत गेल्या. 

असं म्हणतात की रफीना तर लता दिदींनी माफ केलं पण त्यांचा सुमन कल्याणपूर यांच्यावरचा राग कमी झाला नाही. शिवाय आपली नक्कल करते हा गैरसमज देखील त्यांचा झाला असावा. सुमन कल्याणपूर यांना गाणी मिळायचं कमी झालं यामागे लता मंगेशकर यांनी त्यांच्यावर घातलेली अघोषित बंदी होती असंही काही जणांनाच म्हणण आहे. फिल्मफेअर सारख्या अवार्ड वर सुद्धा लता मंगेशकर यांचं वर्चस्व होतं आणि म्हणूनच सुमन कल्याणपूर यांना कधी अवार्ड मिळाला नाही.

सत्तरच्या दशकात लता मंगेशकर हे नाव संगीतातल्या देवीप्रमाणे मोठ झालं होतं. कोणालाही त्यांच्याबरोबर पंगा घेण परवडणार नव्हतं. त्यांची बहीण आशा भोसले यांनी सुद्धा काही ठिकाणी असं म्हटलय की दीदीने मला काम मिळण्यास अडथला केला होता. ती जी गाणी गात नाही ती गाणी गात गात मी स्वतःची स्टाईल डेव्हलप केली आणि म्हणूनच या स्पर्धेत मी टिकले.

खुद्द लता मंगेशकर यांना सुरवातीला नूरजहान यांची नक्कल करतात असे आरोप सहन करावे लागले होते. सुमन कल्याणपूर यांना एकदा विचारण्यात आलं की तुम्ही लतादीदींची नक्कल का करायचा? तेव्हा त्यांनी अतिशय साधेपणान सांगितलं की,

“मी वाढले त्या काळात लता दीदी फेमस झाल्या होत्या. आमच्यासाठी त्या आदर्श होत्या. सगळेच त्यांच्याप्रमाणे गाण्याचा प्रयत्न करायचे. त्यात माझा आवाज अगदी त्यांच्याप्रमाणे पातळ असल्यामुळे आमच्यातील फरकचं कोणाला कळत नाही. “

सुमन कल्याणपूर या लता मंगेशकर, आशा भोसले अशा गायिकांच्या तोडीस तोड होत्या पण दुर्दैवाने त्यांची कारकीर्द लवकर आटोपली. अनेक वर्षांनी लता मंगेशकर यांना विचारण्यात आलं की ,

“तुमच्यावर आरोप होतो तुम्ही सुमन कल्याणपूर यांची कारकीर्द संपवली. हे कितपत खर आहे?”

लता दिदींनी याचा साफ इन्कार केला. त्या म्ह्णाल्या,

“उलट माझ्या मुळे सुमनला मोहम्मद शफी यांच्या कडे गाण्याचा पहिला चान्स मिळाला. ते गाण मी गाणार होते पण आमच्या घरी नेहमी येणाऱ्या सुमनला संधी द्यावी अशी विनंती मीच संगीतकारांना केली होती.”

आज सुमन कल्याणपूर हे नाव विस्मरणात गेलेले आहे. आजही सर्रास त्यांच्या गाण्यांना लोक लता मंगेशकर यांचं गाण समजून कौतुक करतात.  त्यांनी स्वतःची स्टाईल निर्माण करून गायलं असत तर त्यांची कारकीर्द टिकली असती की  खरोखरच त्या हिंदी फिल्मइंडस्ट्रीमधील राजकारणाच्या बळी होत्या ठाऊक नाही. पण राणू मंडल यांच्या निमित्ताने त्यांची चर्चा परत होतीय हे नक्की.  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.