मुस्लिम असल्याने लता मंगेशकर यांनी तलत मेहमूद यांच्याबरोबर गाण्यास नकार दिला होता…?

लता मंगेशकर आणि तलत मेहमूद.

हिंदी चित्रपटसृष्टीतली गायनाच्या क्षेत्रातील २ ख्यातनाम नांव. या दोघांनी मिळून चित्रपटरसिकांना अनेक संस्मरणीय गाणी दिलेली आहेत. आजदेखील त्यांची अनेक गाणे चाहत्यांना मंत्रमुग्ध करून टाकतात. पण कधीकाळी एका बातमीवरून या जोडीमध्ये वितुष्ट निर्माण झालं होतं.

साठच्या दशकातला किस्सा आहे. लता मंगेशकर हे नांव त्यावेळी चित्रपटसृष्टीत नावारूपास यायला लागलं होतं. तलत मेहमूद यांनी देखील तोपर्यंत चांगलं नांव कमावलेलं होतं. दोघांचंही चित्रपटसृष्टीतल्या करिअरची गाडी सुसाट चालली होती. त्यावेळी एका चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांना एकत्रित रेकॉर्डिंग करण्याचा प्रस्ताव आला होता. रेकॉर्डिंगची जवळपास सर्व तयारी झालेली होती. पण अचानक काहीतरी घडलं आणि हे रेकॉर्डिंग रद्द झालं.

रेकॉर्डिंग रद्द व्हायचाच तो काय उशीर होता आणि इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे एक बातमी फिरायला लागली. बातमी अशी होती की लता मंगेशकर यांनी मुस्लीम असल्याच्या कारणाने तलत मेहमूद यांच्याबरोबर रेकॉर्डिंग करण्यास नकार दिला. बातमी फिरत फिरत तलत मेहमूद यांच्यापर्यंत देखील जाऊन पोहोचली. मेहमूद यांनी देखील बातमीची खातरजमा न करता त्यावर विश्वास ठेवला. तलत मेहमूद थोडेसे दुखावले देखील गेले. लता मंगेशकर यांच्याकडून त्यांना अशी काही अपेक्षा नव्हती.

काही दिवसांनी एका कार्यक्रमात मेहमूद आणि लता मंगेशकर यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर ज्यावेळी बोलताना हा किस्सा निघाला त्यावेळी गोष्ट स्पष्ट झाली. अर्थातच ही बातमी म्हणजे एक अफवा होती. लता मंगेशकरांनी तलत महेमूद यांना थेटच विचारलं की “ या असल्या फालतू गोष्टीवर तुम्ही विश्वासच कसा ठेवला…? मी मोहोम्मद रफी साहेब आणि नौशाद साहेबांबरोबर कितीतरी रेकॉर्डिंग केल्या आहेत. ते देखील मुसलमान असल्याची तुम्हाला कल्पना नाही का..? मी युसुफ भाईना (दिलीप कुमार) राखी बांधते. अमन अली आणि अमानत खां साहेबांकडून मी गायनाचे धडे गिरवलेत, ते देखील मुसलमान असल्याचं तुम्ही विसरलात वाटतं”

लताजींच्या या उत्तरानंतर मात्र तलत मेहमूद यांचा गैरसमज दूर झाला. एका अफवेमुळे दोघांमध्ये जी कटुता निर्माण झाली होती ती दूर झाली. त्यानंतर या जोडीने अनेकवेळा सोबत रेकॉर्डिंग देखील केलं आणि चित्रपटप्रेमींना अनेक लोकप्रिय गाणी देखील दिली. एवढंच काय तर गायनाच्या रॉयल्टीवरून ज्यावेळी रेकॉर्डिंग कंपनी एचएमव्ही सोबत वाद निर्माण झाला होता त्यावेळी लता मंगेशकर, तलत मेहमूद आणि मुकेश यांनी मिळूनच एका असोशिएशनची स्थापना केली होती आणि सर्वच गायकांना रॉयल्टी मिळावी ही मागणी एचएमव्ही आणि प्रोड्युसर यांच्याकडे केली होती.

1 Comment
  1. विलास झिजोरे says

    टाटा कंपनी बदल सगली माहीती दा

Leave A Reply

Your email address will not be published.